गेले घ्यायचे राहुनी…


>> श्रीनिवास बेलसरे

कादर खान यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर फार दुःख वाटले. मी 2012 साली मुक्त विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असतानाचा त्यांचा एक व्यक्तिगत अनुभव आठवला.

कादर खान यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर फार दुःख वाटले. मी 2012 साली मुक्त विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असतानाचा त्यांचा एक व्यक्तिगत अनुभव आठवला. तत्कालीन तरुण कुलगुरू डॉ. आर कृष्णकुमार यांनी समाजातील वंचित घटकांसाठी नव्यानेच खास शिक्षणक्रम विकसित करून ते मोठय़ा उत्साहाने सुरू करण्याचा अक्षरशः सपाटाच लावला होता. त्यावेळी मोलकरणीसाठी कौशल्याचा अभ्यासक्रम, मालेगावच्या यंत्रमाग कामगारांसाठी शिक्षणक्रम, मुंबईच्या डबेवाल्यांना संगणकाचे प्रशिक्षण असे विविध शिक्षणक्रम ते सर्व प्रकारच्या अंतर्गत विरोधाला टक्कर देत विकसित करीत होते.

खास टॅक्सीचालकांसाठी विकसित केलेल्या विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन टॅक्सीचालकांची संख्या मुंबईत अधिक असल्याने मुंबईत करावे असे ठरले. व्यापक प्रसिद्धीसाठी उद्घाटन एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते करायचे असल्याने मुंबईतील मनोरंजन क्षेत्रातील अशी लोकप्रिय व्यक्ती निश्चित करण्याचे काम माझ्याकडे आले. सिनेमातील अनेक कलाकारांना मी विनंती केली काही व्यस्त होते, तर काहींनी लाखभर रुपये मानधनावर यायला तयार आहोत असे सांगितले.

याचदरम्यान कादर खान यांचे स्वीय सहाय्यक हमीदभाई यांना भेटून मी कादर खान यांची वेळ मिळवली. कादरखान यांना भेटून मी ‘सरकारचे हे विद्यापीठ अतिशय माफक किमतीत टॅक्सीवाल्यांसाठी हा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे’ सांगितले. तसेच तुम्ही स्वतःच अनेक सिनेमांत टॅक्सीवाल्याची भूमिका केलेली असल्यामुळे उद्घाटन तुमच्या हस्ते करणे सर्वात जास्त उचित होईल अशीही पुस्ती जोडली. तुमची या कार्यक्रमातील उपस्थिती हीच टॅक्सीवाल्यांना त्यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी एक आगळी शिफारस ठरेल आणि समाजातील या अर्धशिक्षित, वंचित वर्गाला दूरशिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणता येईल असे सांगतात त्यांनी लगेच संमती दिली. शिवाय ‘मी ही कॅनडातील माझ्या संस्थेमार्फत असेच काम करीत असल्याचेही’ अभिमानाने सांगितले. या अतिशय दिलदार कलाकाराने कार्यक्रमाला येण्यासाठी काहीही मानधन मागितले तर नाहीच उलट विद्यापीठ पाहायला नाशिकला येताना आम्ही देऊ केलेले वाहनही नाकारले. इतकेच काय अनेकजण स्वतःहून पेट्रोल खर्चाच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल करतात तीही घेतली नाही. मी आमची अभ्यासक्रमाची पुस्तके त्यांना दाखविली तेव्हा तर ते असेही म्हणाले होते, ‘आप इस प्रोग्रामकी सारी किताबे ऑडीओ फॉर्ममे बनाईयेगा. मैं खुद व्हाइस ओव्हर दुंगा. ये लोग सिखेंगे तो सिर्फ इनकाही नही, बल्की सारी सोसायटी का फायदा होगा.’ या सगळय़ा प्रकाराने विद्यापीठातील दृश्राव्य विभागाची मंडळी इतक्या मोठय़ा सिनेकलावंताबरोबर काम करायला मिळणार म्हणून अतिशय आनंदित झाली. नंतर मात्र कुलगुरू कृष्णकुमारसरांचे दुःखद अकाली निधन झाल्याने ते काम कायमचे थंडावले.

खरे तर एक अत्यंत लोकप्रिय कलाकार असलेल्या श्री खान यांच्या आवाजात पूर्ण पुस्तके ध्वनिमुद्रित करून घेणे हे लाखो रुपयांचे काम होते. आमच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ते असे भरपूर वेळ घेणारे काम विनामूल्य करायला तयार होते. आता विचार येतो जर सरकारी कार्यपद्धती बाजूला ठेवून आम्ही आमची ती पुस्तके त्यांच्या आवाजात त्वरित ध्वनिमुद्रित करून ठेवली असती तर विद्यार्थी किती आवडीने अभ्यास करू शकले असते. अनेकदा देणारा दिलदार दाता केवळ दानच नव्हे तर आपले दानशूर हातही आपल्या हातात देत असतो, पण कधी कधी घेणाराच करंटा निघतो त्याला कोण काय करणार? अशा वेळी म्हणावेसे वाटते ‘गेले घ्यायचे राहुनी!’

[email protected]