ग्रामीण हिंदुस्थानचा पोस्टकार्ड मॅन

124

>> शुभांगी बागडे

प्रदीप लोखंडे, एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांना ‘पोस्ट कार्ड मॅन’, ‘सेल्फमेड मॅन’ असं ओळखलं जातं. ग्रामीण हिंदुस्थानात राहून, ग्रामीण लोकांच्या मदतीने त्यांनी ‘रुरल रिलेशन्स’ ही एक संस्था उभी केली; ज्याची दखल देशी-विदेशी कंपन्यांनी घेतली आहे. ग्रामीण महाराष्ट्राला जगभरातील कंपन्यांनी जोडणाऱया या हरहुन्नरी व्यक्तिबद्दल व त्याच्या कार्याबद्दल जाणून घेऊया.

वाई गावातील एक साधं कुटुंब आणि त्या कुटुंबातील चार मुलांमधील सर्वात थोरला मुलगा. इतकी साधीशी ओळख तुम्हाला स्वप्नं दाखवण्यासाठी पुरेशी असते का? म्हटलं तर असते किंवा म्हटलं तर नाहीही. या कुटुंबातील याच थोरल्या मुलाने आज स्वतःच्या नावाच्या अनेक व्याख्या तयार केल्या आहेत. रुरल मॅन, स्वयंरोजगाराचे प्रेरणास्थान, रुरल मार्केटिंगचा प्रणेता, बिझनेस मॉडेलची खरी ओळख, सेल्फमेड मॅन, पोस्ट कार्ड मॅन अशा असंख्य व्याख्यांपुढे प्रदीप लोखंडे हे नाव आपसूक विराजमान होतं. ग्रामीण हिंदुस्थानात राहून, ग्रामीण लोकांच्या सोबतीने त्यांनी रुरल रिलेशन्स ही संस्था उभी केली. या संस्थेची दखल अनेक देशी-विदेशी कंपन्यांनी घेतली आहे.

प्रदीप लोखंडे यांनी मार्केटिंग आणि ग्रामीण विकास यांचा पायंडा रचला. या वेगळ्या वाटेवर चालण्याची सुरुवात अपार कष्टांनी झाली. कौटुंबिक परिस्थिती बेतास बेत असल्याने शाळेत असतानाच प्रदीप यांनी गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. आयुष्यातला व्यवहार म्हणजे नेमकं काय, हे शिकण्याची ही पहिली वेळ असं प्रदीप लोखंडे सांगतात. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील आयएमडीआर महाविद्यालय गाठलं. इथंच कच्चं इंग्रजी फडर्य़ा होण्यासाठीचा आत्मविश्वास त्यांनी मिळवला आणि कॅम्पस इंटरह्यूमध्ये अव्वल ठरत जॉन्सन अँड जॉन्सनसारख्या प्रथितयश कंपनीत त्यांचा प्रवेश झाला.

नोकरीमध्ये प्रगती तर साधली जात होती पण स्वतः काहीतरी केल्याचं समाधान नव्हतं. याचा शोध घेतच प्रदीप लोखंडे यांनी स्वतःचा मार्केटिंगचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात यश होतं. नाव होतं आणि पैसाही होता पण प्रदीप यांचा मार्ग निश्चितच वेगळा होता. याबाबत ते सांगतात की, चुकतमाकत मार्केट्रिंगच्या व्यवसायाला आकार मिळत होता. नोकरीतला अनुभव व्यवसायात कामी आला. मात्र या प्रवासात स्वतःची वाट सापडल्याचं समाधान मिळत नव्हतं. याच दरम्यान गुरुचरण दास यांचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला. गुरुचरण दास यांना मार्केटिंगचा गुरू मानलं जातं. त्यांच्या त्या व्याख्यानाने माझ्या विचारांची दिशा बदलली.

गुरुचरण दास यांनी व्याख्यानात ग्रामीण हिंदुस्थानाबाबत जे जे सांगितले ते लक्षात ठेवत प्रदीप यांनी आपल्या नव्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामीण हिंदुस्थान हाच असेल हे मनात योजलं. आपला व्यवसाय भावाच्या हाती सुपूर्द करत आपल्या नव्या प्रकल्पाची सुरुवात त्यांनी केली. या प्रवासात हिंदुस्थान आणि इंडिया यातला फरक त्यांच्या लक्षात आला. या ग्रामीण हिंदुस्थानाला इंडियाच्या दिशेने न्यायला तर हवं पण यात त्यांचा विकास साधला गेला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. मोठमोठय़ा कंपन्यांचा ग्राहकवर्ग जसा शहरात होता तसा ग्रामीण भागातही व्हायला हवा. ग्रामीण भागातील लोकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी वेगळा उपक्रम राबवला. या ग्रामीण हिंदुस्थानाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली पाहिजे अशा स्वरूपाचं काम त्यांनी सुरू केलं. यासाठीची सुरुवात महाराष्ट्रापासूनच केली.

याबाबत ते सांगतात, महाराष्ट्राचाच विचार करायचा तर इथे चाळीस एक हजार खेडी आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचायचं तर त्यांची नीट विभागणी केली पाहिजे. यासाठी 10 हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावं आधी निवडली. या सहा हजार गावांपर्यंत पोहोचण्यासाठी तेव्हा इंटरनेट, टेलिफोन असा कोणताच संपर्क उपलब्ध नव्हता. यासाठी टपाल विभागाची मदत घ्यायचं ठरवलं आणि तिथूनच पोस्टकार्ड ही आमच्या कामाची ओळख ठरली.
साधारण लोकसंख्या असलेल्या गावात पोस्ट ऑफिस असतेच. या गावातील मुख्याध्यापक, पोस्टमास्तर आणि सरपंच यांच्याशी पोस्टकार्डने संपर्क साधत त्यांच्याकडून गावाची साधारण माहिती मिळवली जात असे. पोस्टकार्डासोबतच्या जोडकार्डावर ही माहिती प्रदीप लोखंडे यांना पाठवली जात असे. ग्रामस्थांनी दिलेली ही माहिती एकत्र करून वेगवेगळ्या कंपन्यांकडे पाठवली जाऊ लागली. या माहितीचा उपयोग या कंपन्यांना आणि पर्यायाने गावाला झाला. आपलं उत्पादन गावात रुजवण्यासाठी या माहितीचा उपयोग करता आला. कंपनीला नवी बाजारपेठ मिळाली आणि त्यायोगे गावाचा विकासही झाला.

या योजनेला प्रतिसाद मिळत पुढे रुरल रिलेशन्स या संस्थेचा जन्म झाला, असं प्रदीप लोखंडे सांगतात. रुरल रिलेशन्सच्या कामाचा आवाका सांभाळताना सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून त्यांनी ग्यान की लायब्ररी हा उपक्रमही गावागावांतून सुरू केला. या उपक्रमांतर्गत सध्या 4000 पेक्षा अधिक ग्रंथालयं सुरू करण्यात आली आहेत. सहा लाखांपेक्षा अधिक पुस्तकं भेट देण्याचा विक्रम प्रदीप लोखंडे यांच्या नावे आहे. ज्याचा फायदा अनेक मुलांना होत आहे. प्रदीप लोखंडे ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना एक पुस्तक आणि पोस्टकार्ड जरूर भेट देतात. या पोस्टकार्डवरील पत्त्यावर पुस्तक वाचणारा प्रत्येकजण उत्तरं देतोच. प्रदीप लोखंडे, पुणे – 13 या पत्त्यावर अशी असंख्य पत्रं येतात. डिजिटल हिंदुस्थानातील अशी अनेक स्वप्नं या पोस्टकार्डच्या माध्यमातून प्रदीप लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचतात.

बिकट वाटेवरचा प्रवास सोपा कधीच नसतो, हे प्रदीप लोखंडे यांच्या प्रवासावरून लक्षात येते. पण आता हाच प्रवास अनेकांना मार्गस्थ करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या