आपला समुद्र

451

>> स्मिता पोतनीस

10 जूनला जागतिक समुद्र दिन आहे. दिन हे नेहमी त्या एका दिवसापुरतेच असतात, पण किमान यानिमित्ताने तरी आपल्या मुंबईच्या सागरी अंतरंगात जरा डोकावूया…

मुंबई बाहेरील लोकांचं मुंबईतला समुद्रकिनारा पाहणं &ं हे स्वप्न असतं. खरंच आहे ना, समुद्रावर फिरायला गेलं की, येणारी खारी, गार हवा मन प्रसन्न करते. समुद्राचे रंग चित्रात बघतो आपण, पण मुंबईला बघितलं तर पाणी गढूळलेलं बघायला मिळतं आणि वाळूची मऊसुतता कळायच्या आधी पायाखाली येतो तो भरपूर पसरलेला कचरा, सिगारेटची थोटकं, प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्स वगैरेच्या पिशव्या, कागद. हा इतका कचरा समुद्रकिनाऱयावरचा. मुंबईतल्या नद्या आजूबाजूच्या झोपडपट्टीतून येणाऱया नाल्यातील सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या असतात. त्याचे पाणी समुद्रात येऊन मिळाल्यावर समुद्रकिनाऱयावर फिरायला आलेल्यांना समुद्राच्या प्रदूषित झालेल्या पाण्यात पायही बुडवावेसे वाटत नाही.

समुद्राचं पाणी प्रदूषित होतं ते नेमकं कशाने? त्याची सुरुवात जमिनीवरूनच होते. शेतीसाठीच्या जमिनीत रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर होतो. पावसाळ्यात ती माती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नदीत येते आणि नदीतून समुद्रात हे प्रदूषित पाणी येते. हरितगृहातून मिथेन, अमोनियाची होणारी गळती समुद्राच्या पाण्यावर परिणाम करते. कारखान्यातून आलेले सांडपाणी, विषारी रसायने यावर प्रक्रिया न करता ते समुद्रात सोडतात. वीज केंद्रे तसेच औद्योगिक उत्पादकांद्वारे कूलंट म्हणून वापरले जाणारे पाणी पुन्हा परत सोडताना ते उच्च तापमानाचे किंवा शीतल पाणी तसेच पाण्यात सोडतात. तसे केल्याने पाण्याचे तापमान बदलते. काही जलचरांना काही खास तापमान कायम असण्याची गरज असते. ते त्या अचानक बदललेल्या तापमानात जिवंत राहू शकत नाहीत. माणसांचा प्लॅस्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्या प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात लोटला जातो. समुद्रात असलेल्या प्लॅस्टिकमुळे पॅसिफिक महासागरात प्लॅस्टिक कचऱयाचे बेट तयार झालेले आहे. ते सुमारे प्लॅस्टिकचे दोन ट्रिलियन तुकडे आहेत, तर हिंदी महासागरात एक ट्रिलियन आहेत. हे खरोखरीच भीतीदायक आहे. पाण्यातली कासवे, डॉल्फिन, शार्क, खेकडे, जलपक्षी, मगरी, इतर जलचर प्लॅस्टिकला आपले अन्न समजून खातात. त्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात. त्यात त्यांचा मृत्यूही होतो.

समुद्राच्या जवळ बांधलेली टुरिस्ट रिसॉर्टस्, समुद्रकिनाऱयावर येणारे लोक यामुळेही समुद्राच्या पाण्याचं प्रदूषण वाढते. सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडसारखी संयुगे हवेत सोडली जातात. ती वातावरणात बरीच वर जातात. तिथे ती संयुगे पाणी, ऑक्सिजन आणि इतर रसायनात मिसळून त्याचे आम्ल पावसात रूपांतर होते. ते पाणी विविध मार्गे समुद्रात मिसळते. पाण्यात जास्त प्रमाणात नायट्रेट, फॉस्फेट्स या रासायनिक पोषक तत्त्वांचे प्रमाण वाढते तेव्हा ते प्रदूषण निर्माण करते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याची गुणवत्ता कमी करते. पृथ्वीच्या वातावरणापासून कार्बन डायऑक्साईड समुद्राकडून शोषून घेतला जातो. वातावरणात कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे समुद्राच्या पाण्यात आम्लता वाढते. त्यामुळे समुद्रातील कॅल्शियम कॉर्बोनेट संरचनेच्या खडकांचे विघटन होते. जहाजांचे थांबे, त्यातून आलेले सांडपाणी, मैला तसेच त्यातील तेलाची गळती होऊन ते समुद्रात पसरण यामुळे समुद्र प्रदूषित होतो.

मानवनिर्मित पाण्याखाली केलेल्या अतिशय जास्त आणि दीर्घकाळ होणाऱया आवाजाच्या प्रदुषणाने माशांवर परिणाम होतो. त्यांची पुनरुत्पादनाची क्षमता, संवाद साधण्यासाठीची, शिकार करणाऱयांना टाळण्याची क्षमता यावर गंभीर परिणाम होतो. व्हेल माशाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्याचा अंतर्गत रक्तस्राव, मृत्यू होऊ शकतो. हिंदुस्थानात मूर्ती विसर्जनाच्या मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनलेल्या असतात. मूर्तीच्या रंगात असणारी रसायनं पाण्यात गेल्यावर पाणी प्रदूषित होते. जलचरांना खाणाऱयांकडे ते विषारी पदार्थ जाऊ शकतात. जमिनीवरील प्राण्यांवर, पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो. हे सारं टाळण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. पूर्वी अधिकारी समुद्राच्या पाण्याचे नमुने एकत्र करून प्रदूषणाच्या प्रमाणाचं परीक्षण करायचे. आता तरंगत्या बुवीची (buoy) नवीन पद्धत समुद्री प्रदूषणाची अचूक माहिती देऊ शकते.

अथांग पसरलेला समुद्र शांत असताना पोटात टाकलेलं सगळं साठवतो. तोच रौद्र झाला तर सगळं बाहेर आपल्याकडे फेकेल. ते आपल्याला झेपणारं नसेल याची जाणीव ठेवायला हवी.

प्रदूषण होऊ नये म्हणून…
 पाण्यात जाताना प्लॅस्टिकच्या वस्तू नेऊ नयेत. पुन्हा वापरता येतील अशाच प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर करावा, पण तोही मर्यादित.
 वीज केंद्रे, कारखान्यातून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न केलेली रसायनं नदी, समुद्रात जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
 शेतकऱयांनी रासायनिक खत, कीटकनाशकांचा वापर बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळावं.
 सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर कार्बन पदचिन्ह (कार्बन फूटप्रिंट) म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी केल्यास समुद्राची आम्लता वाढणार नाही.
 समुद्राच्या पाण्यात तेल वा रासायनिक गळती थांबवल्यास पाणी स्वच्छ राहायला मदत होईल.
 समुद्रकिनाऱयाचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या