सातारा ते दिल्लीची गगनभरारी

>> सुवर्णा क्षेमकल्याणी

सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली असतानाही स्वत:चा उद्योग उभारण्याचं स्वप्न बाळगलं आणि त्यातूनच आकारास आला ‘भारत विकास ग्रुप’ अर्थात बीव्हीजी. शेकडो हातांना रोजगार उपलब्ध करून देणारं हे उद्यमी व्यक्तिमत्त्व म्हणजे हणमंतराव गायकवाड. त्यांचा प्रेरणादायी प्रवास मांडणारं हे शब्दचित्र.

एखादी व्यक्ती केवळ स्वतःपुरता विचार न करता समस्त जनतेचं कल्याण कसं करता येईल असा ध्यास घेते आणि प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत यांच्या जोडीने हे प्रत्यक्षात साकारतेसुद्धा! असाच काहीसा प्रवास आहे BVG अर्थात ‘भारत विकास ग्रुप’चे संस्थापक, सर्वेसर्वा माननीय श्री. हणमंतराव गायकवाड यांचा!

हणमंतराव हे सातारा जिह्यातल्या रहिमतपूरचे. त्यांचं लहानपण अतिशय हलाखीत गेलं. 10 बाय 12 च्या लहानशा घरात राहून जिथे बऱयाचदा वीज नसायची अशा परिस्थितीत शिक्षणात उत्तम गती मिळवत ते पुढे गेले. घरच्या नाजूक परिस्थितीमुळे मिळेल ते काम त्यांनी केलं. रहिमतपूर रेल्वे स्थानकावर त्यांनी आंबे विकण्यासाठीही प्रचंड मेहनत केली. त्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी मार्गक्रमण सुरू केलं. हणमंतराव यांचा गणित विषय पक्का होता. इयत्ता 4 थीत असताना त्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा त्यांना शिक्षणाचं महत्त्व जाणवलं. आपल्या मुलाला उत्तम प्रतीचं शिक्षण मिळावं अशी वडिलांची इच्छा होती. मिळालेल्या संधीचा लाभ घेत त्यांनीही अभ्यास करून 10 वीत चांगले गुण (88 टक्के) मिळवले. त्यानंतर 11 वी न करता त्यांनी डिप्लोमाला प्रवेश घेतला. 3 वर्षांत शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर चांगली नोकरी मिळवून घरखर्चात थोडा हातभार लावता येईल हा त्यामागचा हेतू होता. कारण तोपर्यंत घरखर्चाचा सगळा भार त्यांच्या वडिलांवर होता. खरं तर त्यांना प्रशासकीय सेवेत जायचं होतं. त्या परीक्षेसाठी किमान पदवी लागते. त्यामुळे डिग्री करायचं हे त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी बी.ई.ची ही पदवी घेतली. त्यादरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झालं.

घरातली परिस्थिती समजून घेत इंजिनियरिंग पूर्ण होताच त्यांनी टेल्कोमध्ये नोकरी स्वीकारली. टेल्कोमध्ये काम करत असताना हणमंतराव यांच्या कारकिर्दीला नवीन आयाम प्राप्त झाले. त्यांनी टेल्को कंपनीच्या गोदामात वर्षांपासून पडून असलेल्या केबल वायर्सचा पुनर्वापर केला गेल्यामुळे टेल्को कंपनीचं कित्येक कोटींचं नुकसान टळलं. ही बाब कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत पोहोचली. टेल्कोच्या व्हाइस प्रेसिडेंटनीसुद्धा हणमंत यांचं कौतुक करत विचारलं की कंपनी त्यांच्यासाठी काय करू शकते? हे सांगताना हणमंतराव म्हणाले की, माझ्या गावातल्या बेरोजगार मित्रांना काही काम देता आलं तर बरं होईल. इथून एका नव्या वाटचालीस सुरुवात झाली. हणमंत तिथलेच कर्मचारी असल्यामुळे त्यांना कुठलं कंत्राट देणं शक्य नव्हतं. तेव्हा भारत विकास ग्रुप या संस्थेचं नाव हणमंतरावांच्या मनात आलं. कारण ही संस्था त्यांनी काही वर्षांपूर्वीच स्थापन केली होती. त्या संस्थेला हे कंत्राट मिळालं. 22 मे, 1997 मध्ये मिळालेल्या इंडिका प्लांटच्या कंत्राटावरून हणमंतराव यांची यशस्वी व्यावसायिकाची घोडदौड सुरू झाली. या कंत्राटाने हणमंत यांची झपाटय़ाने प्रगती होत गेली. या संस्थेला पहिल्या वर्षी आठ लाख, दुसऱया वर्षी 30 लाख, आणि तिसऱया वर्षी जवळपास 60 लाखाचं उत्पन्न मिळालं. दरम्यान 1999 मध्ये त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर ‘भारत विकास प्रतिष्ठानला’ मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी नोकरीला रामराम ठोकून आपलं संपूर्ण लक्ष व्यवसायात केंद्रित करायचं ठरवलं.

त्यांच्या या निर्णयाबाबत सुरुवातीस घरच्यांनी विरोध केला, पण संस्थेचा प्रांजळ हेतू पाहून त्यांचाही विरोध मावळला. आईच्या आशीर्वादानंतर हणमंतरावांचा उत्साह वाढला. त्यांनी व्यवसायात स्वतःला झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली आणि कंपनीचं ‘भारत विकास सर्व्हिसेस’ असं नामकरण केलं. या संस्थेनी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचं काम सुरू केलं. गरजेनुसार त्यांनी साफसफाई करणाऱया अद्ययावत मशीनरीज् खरेदी केल्या. यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा झपाटय़ाने विस्तार होत गेला. हणमंतरावांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱयांनी फक्त ऑफिसेस, भवन, इमारती यांनाच चमकवलं नाही तर आपल्या कंपनीचं नावही खूप मोठं केलं. ‘भारत विकास सर्व्हिसेज’ यांच्या दर्जेदार कामाची चर्चा देशाच्या कानाकोपऱयात होऊ लागली.

2004 मध्ये भारत विकास सर्व्हिसेसला भारतीय संसद भवनाचं काम मिळालं. हे काम देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या कामाचं कंत्राट भारत विकास सर्व्हिसेसला मिळालं. पुढे पंतप्रधान कार्यालयाचं कामही या संस्थेला मिळालं. शिवाय देशातल्या मोठमोठय़ा संस्थांची कामं त्यांना मिळाली. सरकारी भवन, रेल्वेगाडय़ा, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट, कॉर्पोरेट भवन, महाराष्ट्रातली मानाची देवस्थानं यांसारख्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. आरोग्य क्षेत्रातही ‘108’ हेल्पलाईन क्रमांक डायल करून त्वरित उपचार व्हावेत यासाठी अत्यावश्यक ऍम्ब्युलन्स सेवा पुरवण्यात आली. शस्त्रक्रियेविना मोतीबिंदू नष्ट करण्यासाठी त्यांनी एक औषध शोधून काढलं असून कर्करोगासारख्या आजारावरही संशोधन सुरू आहे. याशिवाय त्वरित पोलीस सेवा, कृषी क्षेत्रातही त्यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत.

BVG अंतर्गत आजवर वेगवेगळ्या सेवा पुरवण्यासाठी जवळपास 70,000 हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. येत्या काही वर्षात 10 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचं हणमंतराव यांचं स्वप्न आहे. कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम असलं की आपल्याला हव ते मिळतंच हा विचार मनात बाळगून हिंदुस्थानला एका वेगळ्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या या ध्यासाला सलाम.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या