आधार देणारी पॅलेटिव्ह केअर सेंटर

87

>> स्वप्नाली अभंग

आजारी व्यक्ती आणि त्यांची काळजी घेणारे सदस्य अशी सर्वांचीच फरफट होत असते. म्हणूनच अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी, रुग्णांची योग्य ती वैद्यकीय काळजी घेण्यासाठी, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण करण्यासाठी पॅलेटिव्ह सर्व्हिसेस अस्तित्वात आहेत. विदेशाच्या धर्तीवर आधारित असलेली ही संकल्पना हिंदुस्थानात काही नवी नाही, परंतु सध्याची गतिमान जीवनशैली आणि संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे या पॅलेटिव्ह केअर सेंटरकडे लोकांचा कल वाढला आहे.

जागतिकीकरणामुळे गतिमान झालेलं आयुष्य, पर्यायाने विविध आजारांनी काढलेलं वर डोकं अणि संयुक्त कुटुंब पद्धती यामुळे अनेकदा आजारपणात वृद्ध-ज्येष्ठ व्यक्तींना मानसिक, शारीरिक मदत मिळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. हिंदुस्थानातील ज्येष्ठांची आकडेवारी बघण्यासाठी एकदा सहज गुगल सर्च केलं. 2001च्या जनगणनेनुसार ज्येष्ठांची संख्या 7.7 कोटी होती आणि 2011 मध्ये दहा कोटीहून अधिक झाल्याची माहिती समोर आली. समाजात दिवसेंदिवस वेगाने वृद्धांची संख्या वाढत आहे आणि त्याच वेगाने एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे.

गतिमान आयुष्य, नोकरी-व्यवसायातली स्पर्धा यामुळे घरातल्या तरुण मुलांना वृद्ध आईवडिलांकडे लक्ष देण्यासाठी तितका वेळ देणं शक्य नसतं. त्यात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांची काळजी घेणं तर आणखी कठीण. आपल्याकडे तर वृद्ध आईवडिलांची तरुण मुलं काळजी कशी घेतात यावरच त्यांचे संस्कार ठरतात. अनेकदा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तींमुळे अख्खं घर कोलमडून पडतं. या आजारातून ते कधीही बरे होणार नाहीत हे माहीत असताना त्यांची वर्षानुवर्षे सेवा करताना आर्थिक, शारीरिक, भावनिक अशा विविध पातळ्यांवर कुटुंबीयांची कसोटी लागते.

आजारी व्यक्ती आणि त्यांची काळजी घेणारे सदस्य अशी सर्वांचीच फरफट होत असते. म्हणूनच अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी, रुग्णांची योग्य ती वैद्यकीय काळजी घेण्यासाठी, त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण करण्यासाठी पॅलेटिव्ह सर्व्हिसेस अस्तित्वात आहेत. रुग्णांच्या वेदना कमी करून रुग्ण आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचं उर्वरित आयुष्य आनंदी करणं हा यामागचा उद्देश आहे. विदेशाच्या धर्तीवर आधारित असलेली ही संकल्पना हिंदुस्थानात काही नवी नाही, परंतु सध्याची गतिमान जीवनशैली आणि संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे या पॅलेटिव्ह केअर सेंटरकडे लोकांचा कल वाढला आहे.

अनेकदा घरातील वयोवृद्ध दुर्धर आजाराने ग्रस्त असतात. या व्यक्ती पूर्णपणे दुसऱयांवर अवलंबून असतात. कुटुंबातल्या सदस्यांना 24 तास त्या व्यक्तींची शुश्रूषा करणं शक्य नसतं. अशावेळी वृद्ध रुग्णांची योग्य काळजी घेणारी, त्यांना 24 तास वैद्यकीय सेवा पुरवणारी पॅलेटिव्ह केअर सेंटर आजारी, पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासाठी वरदान ठरत आहे.

पुण्यातली स्पंदन केअर सेंटर ही एक अशीच एक संस्था. 2003 साली जेव्हा डॉ. प्रसाद सोनीस यांनी हे केअर सेंटर सुरू केलं तेव्हा सामान्य लोकांमध्ये या कन्सेप्टबद्दल फारशी माहिती नव्हती. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना आलेले अनुभव आणि काळाची गरज ओळखून डॉ. सोनीस यांनी हे सेंटर पुण्यात सुरुवातीला वडगाव इथं सुरू केलं खरं, पण या सेंटरचं उद्घाटन होण्याआधीच त्यांना तिथून पळ काढावा लागला. लोकांनी मोर्चा काढून या सेंटरला विरोध केला. कारण या सेंटरमुळे या भागात रोगराई पसरेल की काय अशी भीती लोकांच्या मनात होती. मात्र लोकांमध्ये आता बऱयापैकी जागृती निर्माण झाली आहे. सध्या पाळणाघरे कशी मस्ट झालीत तशीच ही केअर सेंटरही शहरात मस्ट झाली आहेत असं स्पंदन केअर सेंटर संस्थापक डॉ. सोनीस म्हणतात.

वृद्ध आईवडील हे जरी मुलांची जबाबदारी असले तरी ते त्यांनी त्यांना इथं आणून टाकलेलं नसतं. परिस्थितीपुढे ते हतबल असतात. मुलांनी त्यांची शुश्रूषा केली नाही म्हणून ते नालायक ठरत नाहीत. आपल्या समाजात अजूनही काही प्रमाणात ही मनोवृत्ती आहे, पण इथं आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱयावर तुम्हाला समाधान नक्कीच पाहायला मिळेल असं ते म्हणतात.

पॅरालिसिस, पार्किन्सन यांसारख्या आजांरामध्ये रुग्ण बेडरिडन असतात. दैनंदिन सेवेबरोबर त्यांना वेळोवेळी आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळणंही तितकंच गरजेचं असतं. घरी जाऊन अशा रुग्णांना सोबत करणं किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी माणसं पुरवणारे ब्युरोही उपलब्ध आहेत, पण अनेकदा काळजी घेण्यासाठी पाठवलेले हे सेवक प्रशिक्षित नसतात. शिवाय रुग्णांना काय होतंय, त्रास होत असताना नेमकं काय केलं पाहिजे याचं ज्ञान त्यांना नसतं. शिवाय हा पर्याय अनेकदा खर्चिकही आहे. उलट केअर सेंटरमध्ये प्रशिक्षित नर्सेस, डॉक्टर फिजिओथेरपिस्ट असतात. त्यांना वेळेवर वैद्यकीय उपचारही मिळतात. पीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देणारी पॅलेटिव्ह केअर सेंटर काळाची गरज बनली आहेत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या