यंगिस्तान : प्लॅस्टिकमुक्तीचा नारा

>>  स्वप्नील साळसकर

‘युज अँड थ्रो’ प्लॅस्टिकची समस्या देशातील न संपणारा विषय आहे. त्यातून आता महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळख असणारे कळसूबाई शिखरही सुटलेले नाही. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेले हर्षद ढगे आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी ‘प्लॅस्टिकमुक्ती’चा नारा देत व्यापक जनजागृतीचा विडा उचलला आहे.

मीरा-भाईंदरमधील समुद्रकिनाऱयांची स्वच्छता आणि खारफुटी संवर्धनासाठी वारंवार पुढाकार घेणाऱ्या ‘फॉर फ्युचर इंडिया’ संस्थेचे हर्षद ढगे यांनी न थकता 35 ट्रेकिंग केले आहेत. कळसूबाई शिखरावरील ट्रेपिंगचा त्यांचा यावेळचा अनुभव वेगळा होता. तिथे त्यांना पर्यावरण संस्थेला धोक्यात आणणारी प्लॅस्टिकची समस्या प्रकर्षाने जाणवली. या वेळी त्यांच्या टीममधील सदस्यांनी स्वतः काही वेळ स्वच्छता करत येणाऱया-जाणाऱया ट्रेकर्सना प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन केले. आतापर्यंत तीनवेळा हे शिखर सर केल्यानंतर साफसफाईची मोहीम राबवण्याबरोबरच स्थानिक, व्यावसायिक आणि ट्रेकर्स यांना असा कचरा विल्हेवाट लावण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.

पूर्वी कळसूबाई शिखरावर रात्रीच्या ट्रेकिंगला बंदी होती. मात्र आता पायथ्यापासून अगदी शेवटपर्यंत पथदिव्यांची जागोजागी सोय करण्यात आली आहे. शिवाय जुन्या लोखंडी शिडय़ा बदलल्याने ट्रेकिंगला एक मजबूत आधार मिळाला आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली. शिखर सर करताना सोबत प्लॅस्टिक पाणी बॉटल, वेफर्स व इतर खाद्य पॅकिंगसाङ्गी वापरले जाणारे कागद सहज फेकून दिले जात आहेत. यामुळे परिसरालाही बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
हर्षद ढगे आणि ट्रेकिंग पार्टनर विराज कांदळगावकर, विशाल कांदळगावकर, धैर्य होनराव, ज्योती धाडसे, सौरभ नाईक, प्रसाद, वैभव आणि त्यांच्या टीमची शिखर सर करण्याची ही तिसरी वेळ होती. मात्र प्रत्येक वेळी ट्रेकिंग एक वेगळा अनुभव देऊन जात होती. ठिकठिकाणी विश्रांतीसाठी स्थानिकांनी हॉटेल उभारून खानपानाची सोयही केली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने प्लॅस्टिकच्या भस्मासुराची समस्या वाढली असल्याचे टीमच्या निदर्शनास आले. त्या वेळी प्रवासादरम्यान भेटणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला प्लॅस्टिक समस्येबाबत मार्गदर्शन करत पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. मित्रमंडळींनो, गडकिल्ल्यांवर असलेला कचरा खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करा, परिसर स्वच्छ राखण्यास मदत करा, असे आवाहन हर्षद ढगे यांनी केले आहे.

सफर करताना निसर्गाची काळजी घ्या

स्थानिकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे त्यांच्याकडून जाळला जाणारा प्लॅस्टिक व इतर कचरा जैवविविधतेवर मोठा परिणाम करत आहे. तुम्ही प्राकृतिक सौंदर्य, उंच पर्वतांच्या रांगा पाहण्याचा आनंद घेऊ शकता. या सर्वांच्या अनुभवातून जीवनात येणाऱ्या लहानमोठय़ा संकटांवर मात करण्याची तयारी मनातून होऊ शकते. निसर्गासोबत वेळ घालवताना एक वेगळी ऊर्जा मिळते. मात्र सफर करत असताना निसर्गाची काळजी घेणे ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे, असा संदेश हर्षद यांनी यानिमित्ताने दिला.