लेख : मतदान नव्हे; मताधिकार!

5
फोटो प्रातिनिधिक

>> वैजनाथ महाजन

मत देणे आणि मत घेणे हे केवळ सोपस्कार म्हणून पाहावेत असे नाही तर तो एक मूल्याचा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मूल्याचा विचार आहे हे आपण त्रिवार समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मतदान केले अथवा मतदान झाले असे साधक-बाधक पद्धतीने न म्हणता मी मताधिकार बजावला असे म्हणणे यालाच लोकशाही दृढमूल करण्याचा अर्थ प्राप्त झालेला आहे. मानली तर बाब साधी आहे, पण तितकीच मोलाची आहे.

आपण जेवढय़ा लवकरात-लवकर ‘मतदान’ हा शब्द म्हणजेच ही संधी देशातून हद्दपार करू व त्याच्या ठिकाणी ‘मताधिकार’ हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न करू तेवढी आपली लोकशाहीकडे वाटचाल अधिक निर्दोष पद्धतीने सुरू होईल असे वाटते. इंग्रजीत व्होटिंग हा शब्दप्रयोग रूढ आहे. त्याचा अर्थ मत देणे एवढय़ा पुरताच मर्यादित असतो. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी नेमका अर्थ प्राप्त झालेला आहे. पण आपण हिंदुस्थानी मंडळी आपली प्रत्येक रीत व व्यवहार हा आपल्या प्राचीनतम पवित्र परंपरांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करणारी अशी मंडळी असल्यामुळे आपण मतदान असा शब्द रूढ केलेला आहे. पण दान या शब्दात अनेक गोष्टी दडून राहिलेल्या आहेत. अगदी पूर्वांपार प्रथेनुसार जर विचार करायचा झाला तर आपण एकूण दानाचे तीन प्रकार केलेले आहेत. पैकी अन्नदान, स्थावर जंगम दान व सर्वात श्रेष्ठ आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्ञानदान आहे. या तिन्हीमध्ये मतदान हे बसत नाही आणि ते स्वाभाविक आहे. पण मतदान केल्यामुळे आपल्या मनात दान केल्याचा कळत नकळत का होईना, पण एक अहंकार निर्माण होत असतो. कारण त्यातून आपण कुणाला ना कुणाला तरी उपकृत केले आहे ही भावना दृढ होत असते. त्यामुळे दान करणारा आणि दान घेणारा असे दोन सरळ सरळ प्रकार निर्माण होतात. दान घेणाऱया माणसाला उगाचच उपकृत झाल्यासारखे वाटू शकते आणि दान देणाऱयाला स्वतःचा अहंम सुखावण्याची आपसूकच संधी मिळत असते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात दान ही कल्पना निश्चितच पवित्र आहे. तिथे त्याचे महत्त्वही तितकेच अधोरेखित झालेले आहे. पण इथे आपण उमेदवार निवडण्याकरिता मत द्यावयाचे असते. त्यामुळे ते देणे हेच योग्य होय आणि आता याला मताधिकार असा अत्यंत आत्मप्रत्ययाचा शब्द आलेला आहे. त्यातून माणसाला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव होऊन तो अधिक जबाबदार बनतो असे यातून सुचविण्यात आले आहे. त्यातूनही एक माणूस म्हणजे एक मूल्य असे आपल्या घटनेनेच नमूद केलेले आहे. म्हणजे एखाद्या उद्योगपतीलाही एकच मत आणि हमालालाही एकच मत ही फार मोठी समानता मताधिकारातून सूचित होते. एखादा मनुष्य धनाढय़ आहे म्हणून त्याला दहा मते असे होत नाही आणि एखादा मनुष्य अगदीच निष्कांचन आहे म्हणून त्याला एकच मत असे होत नाही. त्यामुळे आपल्याकडे समान नागरी कायदा केव्हा यायचा तो येऊदे, पण मत देण्याच्या पद्धतीतून घटनाकारांनी जी समानता अत्यंत सुदृढपणे सूचित केलेली आहे ती लाखमोलाची आहे. म्हणूनच त्यांनी पुढे जाऊन जो माणूस मत देण्याकरिता ‘चिरीमिरी’ घेतो तो माणूस देशद्रोही आहे असे स्पष्ट नमूद केले आहे. एकदा का अधिकाराची जाणीव माणसाच्यात तीक्र झाली की, त्याला जबाबदारीची जाणीव पण तितक्याच तत्परतेने होत असते असे प्रशासनाचे शास्त्र्ा सांगत आले आहे. त्यामुळे मत देणे आणि मत घेणे हे केवळ सोपस्कार म्हणून पाहावेत असे नाही तर तो एक मूल्याचा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मूल्याचा विचार आहे हे आपण त्रिवार समजून घेतले पाहिजे. त्यामुळे मतदान केले अथवा मतदान झाले असे साधक-बाधक पद्धतीने न म्हणता मी मताधिकार बजावला असे म्हणणे यालाच लोकशाही दृढमूल करण्याचा अर्थ प्राप्त झालेला आहे. मानली तर बाब साधी आहे, पण तितकीच मोलाची आहे. म्हणून अलीकडे निर्वाचन व्यवस्थेमार्फत कटाक्षाने मताधिकार असा शब्दप्रयोग होताना दिसतो आहे आणि ती निश्चितच समाधानाची बाब आहे. अशा गोष्टी आपणाला वर-वरच्या वाटू नये अशी रास्त अपेक्षा आहे. जो मताधिकार बजावतो तो मताच्या मूल्यासमीप असतो आणि त्याला त्याचे राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचा निश्चितच निकोप आनंद प्राप्त होत असतो. निरामय लोकशाहीसाठी मतदान नव्हे तर मताधिकार बजाविण्याकरिता आपण कटिबद्ध होणे हाच याचा खरा अर्थ आहे. दानाने कोण ताठ मानेने जगू शकेल असे वाटत नाही. म्हणून मोकळय़ा मनाने आपल्या लोकप्रतिनिधीला आपण मताधिकाराद्वारे संसदेत अथवा विधानसभेत पाठविणे हेच केव्हाही श्रेयस्कर होय.