मुलांचं ‘बोलणं’ आपण खरंच ऐकतो का?

>> वर्षा आठवले

मुलांच्या मनात शिरायचं तर पालक, शिक्षक आणि मुलांच्या आजूबाजूला वावरणारा समाज सर्वांनीच थोडं जागरूक राहायला हवं. त्यांच्याशी नुसता संवाद वाढवायला हवा. नव्हे, मुलांनाच बोलू द्यायला हवं. हे सांगत मुलांचं मन जाणून घेणारा हा लेख.

एका चित्रकला स्पर्धेत मुलांना त्यांच्या मनाला येईल ते चित्र काढायला सांगितलं होतं. नंतर सगळ्यांची चित्र बघताना एका मुलाचं चित्र जरा वेगळं जाणवलं. त्याचं बॅकग्राऊंड पूर्ण काळं होतं. शेवटी त्याच्याशी जरा गप्पा मारल्या तेव्हा कळलं की, त्याच्या घरी आनंदी वातावरण नव्हतंच. तेच त्याच्या चित्रातून उमटलेलं होतं. शाळेतून घरी गेलं की आईवडिलांची खूप भांडणं सुरू असायची. ती याच्या कानावर पडू नयेत म्हणून याला खोलीत बंद करून ठेवलं जायचं. त्याच्या कानावर भांडणं पडू नयेत म्हणून जरी हे होत असलं तरी तो एकटा पडत होता. मुलांना काय वाटतं आहे, काय सांगायचं हे मुलं वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतात. हे आपण ओळखायला हवं.

नुकतंच चाईल्ड लाइनवर 53 लाख सायलेंट कॉल आले ही बातमी जवळपास सगळ्या वर्तमानपत्रात येऊन गेली. दोन दिवस त्यावर चर्चा झाली. अजूनही होते आहे, पण या सगळ्या चर्चेतून फलित काय हाती येईल? कारण मुलांविषयी आपला समाज जागरूक नाही. त्यांचे हक्क, अधिकार आपल्याला माहीत नाहीत आणि ते माहीत करून घ्यायचीही कुणाचीच इच्छा नाही. ही सगळी पार्श्वभूमी बघता असं वाटतं की, या मुलांना चाईल्ड लाइनला फोन करायची का वेळ येते. तर घरात, आजूबाजूला, शाळेत, पाळणाघरात मुलं वावरतात अशा कुठल्याच जागी चाईल्ड फ्रेंडली वातावरण नाही. कुणीही त्यांचं काही ऐकून घेत नाही. त्यांना मोकळं व्हायला कुठं जागाच नाही.

रायगड जिह्याचे बाल कल्याण समिती अध्यक्ष तानाजी पाटील नुकतंच त्यांच्याकडे आलेल्या केसचं एक उदाहरण देतात. एक महिला त्यांना भेटायला आली. नवरा खूप मारतो म्हणून तिनं घर सोडलं होतं. मुलांनाही मारतो म्हणून तीही सोबत होती. आता कुठल्यातरी कंपनीत तिला साफसफाईचं काम मिळालं होतं. काम करून घर चालवत होती. आठ आणि नऊ वर्षांची दोन मुलं. या मुलांकडे बघायला कुणी नव्हतं. म्हणून कामावर जाताना मुलांना घरात ठेवून ती बाहेरून कुलूप लावून जात होती. असं किती दिवस करायचं म्हणून तिचं म्हणणं होतं की, मुलांना कुठंतरी संस्थेत ठेवा. पाटील तिला म्हणाले की, ‘आपण पोलीसात तक्रार दाखल करू. मी तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका’. पण तिचं एकच. त्या फंदात मला पडायचं नाही. तुम्ही फक्त मुलांची सोय करा. तानाजी पाटील म्हणतात, “या सगळ्यात तिला मुलांना काय वाटतं हे पाहायचं नव्हतंच. हा विचारही नव्हता. खरंतर आठ वर्षांच्या कुठल्याही मुलाला वाटतं की आईजवळच राहायला हवं.’’

डॉ. श्रुती पानसे या बालमानसतज्ञ म्हणतात की, “लहान मुलांच्या मनातला हा सगळा व्यवहार वेगळा आहे. प्रौढांच्या दुनियेत शिरलेल्यांना फार क्वचितच ऐकू येईल लहान मुलांचं बोलणं असं वाटतं. छोटय़ांकडे असलेली मन नावाची गोष्ट एकदम जिवंत असते. सगळं काही टिपत असते. बाहेरचं प्रत्यक्षातलं बोलणं आणि मनातलं बोलणं याची सतत सरमिसळ चालू असते. हळूहळू वाढत्या वयात केव्हातरी ही सरमिसळ थांबते. आतलं जग वेगळं आणि बाहेरचं जग वेगळं असे स्वच्छ कप्पे पडतात. तेव्हा मन प्रौढ होतं, असं म्हणत असावेत. आणि एकदा का प्रौढ झालं की मग मुलांचं सगळंच बालिश वाटू लागतं! या बालमनात केवढी घालमेल चालू असते, दंगामस्ती चालू असते हे विसरलंच जातं हळूहळू. त्यांच्या बोलण्याचा, काहींना तर आवाजाचाही त्रास व्हायला लागतो. मात्र प्रत्येकाने आपलं बालपण कधीच विसरायला नको आणि आजही मनात असलेल्या छोटय़ाला जागा दिली पाहिजे. मुलं बोलायला लागली की त्यांचं सर्वकाही ऐकून घेणं हे आपलं मुख्य काम व्हायला हवं. या बोलण्यात काय नसतं? त्यांचा फुलत जाणारा इगो असतो, त्यांचं स्वप्नरंजन असतं, कल्पनेच्या भराऱया असतात. मी म्हणजे किती महत्त्वाचा, ‘मी’ म्हणजे कोण, असा एक ‘मस्त’ भाव असतो. शब्दांच्या गमतीजमती तर असतातच, पण स्वतःच्या बुद्धीने बेधडक अर्थ लावत असतात. मुलांच्या मनातलं ओळखण्यासाठी त्यांचं जाणीवपूर्वक ऐकून घ्यायला पाहिजे.’’

मुलं बोलत असताना आपण त्यांचं नक्की ऐकतो आहोत का? की एका बाजूला आपलं दुसरंच काहीतरी चाललं आहे हेही आपण बघायला हवं. मुलं बोलत असताना किंवा ती शांत असतात तेव्हाही त्यांचं वागणं, हालचाली यातून ती व्यक्त होत असतातच. ते आपण बघायला हवं. मुलांशी चर्चा करता यायला हवी आणि त्यांच्यात चर्चा घडवायला हवी हेही जमायला हवं. मुलांवर विश्वास असला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं.

बालमानसतज्ञ गौरी घारपुरे म्हणतात की, “मुलांचं बोलणं नुसतं ऐकणंही महत्त्वाचं नाही. तर त्यांच्यासोबत त्यांचं जग अनुभवायची आणि ते स्वीकारण्याची तयारी पालक म्हणून असायलाच हवी.’’

चाईल्ड राइट ऑक्टिव्हिस्ट विकास सावंत सांगतात, “आपण मोठी माणसं मुलांचं ‘आपल्याला पाहिजे तसं’ ऐकतो. त्यामुळे जे काही त्यांना सांगायचं असतं त्यातला खूप महत्त्वाचा भाग आपण सोडून देत असतो. कारण ते काय बोलणार याचा अंदाज आपण अगोदरच बांधलेला असतो. त्यामुळे त्या अंदाजाच्या अंदाजाने त्यांना काय म्हणायचं आहे हे आपण गृहित धरतो, पण प्रत्यक्षात मुलांना जे सांगायचं असतं ते त्यापलीकडेही जाऊन सांगायचं असतं. काहीवेळा त्यांच्या वयानुरूप संकल्पना स्पष्ट झालेल्या नसतात पण त्यांना काहीतरी संकल्पना मांडायची असते आणि ही संकल्पना, मतं त्यांना अजमावायची असतात. अशावेळी आपण आपल्या पूर्वग्रहातून जे ऐकतो त्यातून आपण म्हणतो की हे असं नाही, ते तसं नाही, तर ते तसं असायला हवं. यातून काय होतं की, मुलांना वेगळ्या पद्धतीने मांडणी करायची असते, वेगळं काही मत मांडायचं असतं ते आपण लक्षातच घेत नाही.’’

त्यांची मतं आपण ऐकून घेतो असं आपण म्हणतो, पण आपण त्यांना कसं विचारतो यावर ते अवलंबून आहे. त्यांना पूर्णपणे बोलण्याची, मत मांडण्याची संधी मिळाली आणि ते बोलले तर त्यांचं म्हणणं आपल्याला कळेल आणि त्यांची मतं आपल्याला कळली असं ते होईल.

दुसऱया एका प्रसंगात विकास यांच्या मुलीच्या मैत्रिणीचाच किस्सा ऐकण्याजोगा. ही मैत्रीण मोठी. म्हणजे 16-17 वर्षांची. थोडीफार कळत्या वयाची. ती म्हणत होती की कुणी रस्त्यात छेडछाडीचा प्रयत्न केला तर काय करायचं. आजूबाजूला लोकं आहेत, संध्याकाळची वेळ आहे. एकजण म्हणाली, आपण ओरडायचं वाचवा…वाचवा. म्हणजे लोकं गोळा होतील. तर मैत्रिणीचं म्हणणं हल्ली असं ओरडलं तरी लोकं येतच नाहीत वाचवायला. आधी लांबूनच बघतात काय चाललं आहे. आणि मग ठरवतात या फंदात पडायचं की नाही ते. त्यापेक्षा आपण साप… साप असं ओरडायचं. आता हा अतिशय वेगळा मार्ग तिनं शोधला होता. विचार केल्यावर जाणवतं की हा वेगळा प्रकार आहे. तो माणूस मला काही करणारा असेल तर तो पण गोंधळून जाईल. आणि आजूबाजूचे लोक साप वगैरे असं काही आहे की लगेच येतील. तेवढय़ा वेळात मला तिथून निघून जाता येईल. आता ही क्रिएटिव्हिटी आहे. अशा संकटाच्या वेळी कसं वागायचं, काय करायचं ते पर्याय मुलांनी शोधावेत. आपण त्यांना मदत करावी, भर घालावी. पण आधीच असं कर, तसं कर हे नको.

एकूणच मुलांच्या मनात शिरायचं तर पालक, शिक्षक आणि मुलांच्या आजूबाजूला वावरणारा समाज सर्वांनीच थोडं जागरूक राहायला हवं. त्यांच्याशी नुसता संवाद वाढवायला हवा. नव्हे, मुलांनाच बोलू द्यायला हवं.

[email protected]