स्मार्ट आणि विश्वसनीय

>>वसुंधरा देवधर

सध्याचा जमाना ‘ऑनलाइन’ शॉपिंगचा आणि ‘स्मार्ट’ उत्पादनांचा आहे. ग्राहकांचादेखील वाढता कल हा ‘स्मार्ट’ उत्पादनांची ‘ऑनलाइन’ खरेदी करण्याकडे आहे. मात्र आपण ऑनलाइन खरेदी करीत असलेली वस्तू किंवा सेवा खरंच ‘स्मार्ट’ आहे का? स्मार्ट असली तरी ही संपूर्ण प्रक्रिया ‘विश्वसनीय’ आहे का? ऑनलाइन खरेदी करताना आपल्या व्यक्तिगत माहितीचा खजिना विश्वसनीय हातात पडत आहे की तिला ‘पाय फुटले’ आहेत? असे अनेक प्रश्न ‘स्मार्ट’ उत्पादनांच्या ऑनलाइन शॉपिंगमुळे उपस्थित होत आहेत. त्याचा विचार ग्राहकांबरोबरच उत्पादक आणि सेवा पुरविणाऱया कंपन्या यांनीही करण्याची गरज आहे.

जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने दर वर्षी ग्राहक जगताला गृहीत धरणाऱया, ग्राहकांवर अन्याय करू पाहणाऱया, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱया आणि त्यातून नफेखोरी करू पाहणाऱया कळीच्या मुद्यांना हात घालण्यात येतो. सर्वसामान्यपणे या समस्या विकसित समजल्या जाणाऱया देशामधील ग्राहकांच्या आहेत असे भासले, तरी विकासाभिमुख आणि अविकसित देशातील ग्राहकांनाही त्या वेगळ्या प्रकारे त्रास देत असतात, याची जाणीव कंझ्युमर्स इंटरनॅशनल कायम व्यक्त करताना दिसते.

जगभरातील 200 हून अधिक ग्राहक-हितार्थ कार्यरत मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या संस्थांची ही शिखर संस्था! या वर्षी तिने निवडलेला विषय ‘विश्वसनीय स्मार्ट उत्पादने’ असा आहे. अर्थात याचा संबंध संपर्क क्रांती, कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी दुनिया आणि त्यासाठी ग्राहकाच्या हाती असलेली विविध स्मार्ट उपकरणे यांच्याशी आहे. आज घडीला जगभरात 23.1 दशलक्ष स्मार्ट उत्पादने वापरात आहेत. म्हणजे केवळ आपल्या हातात असणारा स्मार्ट फोन नव्हे, तर त्याही पलीकडे असणारी अनेक उपकरणे, ऍप्लिकेशन्स, ज्यांची आपण कदाचित कल्पनाही करू शकणार नाही. आता हेच पाहा ना, घरातलं धुलाई यंत्र आहे की नाही स्मार्ट? खास हिंदुस्थानी वातावरणाची, वस्त्र्ा-प्रावरणांची आणि इथल्या खंडित होणाऱया वीज-पाणी पुरवठय़ाची काळजी घेणारं हे यंत्र. वीज गेली की ती आल्यावर जिथे थांबलेलं असेल तिथून सुरू होणार. पाणी भरून ठेवायला कामी येणार आणि आपण कपडे धुवायला टाकू त्यात तेंव्हा त्याच्या लक्षात असणार की ‘माझ्यात पाणी आहे.’ टायमर लावून ठेवला की त्या वेळी सुरू होणार… हे सगळं म्हणजे एक प्रकारचा स्मार्टनेसच की नाही?

आता मोटारी आल्यात, त्या आपल्या आपण चालणारेत. आज अशा पण आहेत की तुमचे लक्ष नसताना मोटार रस्त्याच्या अगदी बाजूला असणाऱया रेषेवर गेली तर धडधड आवाज करतात आणि इशारा देतात. सफाईची यंत्रे आहेत. ती पण हातात धरायला नकोत. घरभर फिरून कचरा गोळा करतील. साफ करायला झाली तर काहीतरी आवाज काढून ‘माझ्याकडे बघा’ असे सुचावतील. अशी खूप खूप साधने आहेत, जी आपले जगणे आरामदायी/सुखकर आणि कदाचित आळशी (?)सुद्धा बनवतात. आपल्या हातातला स्मार्टफोन तर आपणच स्मार्ट झालोय असं वाटायला लावतो आपल्याला! आता बोलण्यापेक्षा फोटो, नकाशे, व्हिडीओ, गप्पाटप्पा, online चर्चासत्रे यासाठी सहज वापरतोय. शिवाय विविध apps च्या सहाय्याने घरापासून ते जीवनसाथीपर्यंत काहीही शोधणे, वस्तू विकत घेणे, विकणे, शिकणे, शिकवणे आणि खेळणे असं काय काय करू शकतो आपण आणि खूष होतो स्वतःवरच!

आभासी दुनियेचा अनुभव सामान्य ग्राहक गेमिंगमध्ये घेतो, तसाच लुटुपुटुचे विमान उडविणे, उतरविणे, यासारख्या अनुभवासाठी सुद्धा तो घेता येतो. विशिष्ट परिस्थितीचा आभास निर्माण करून त्या वेळेचा अनुभव देऊन अनेक प्रशिक्षणेही केली जातात. पण लहान मुलांना सांभाळणारी, त्यांच्याशी बोलणारी जणू काही खरीच जिवंत वाटणारी खेळणी आहेत. त्यांच्या सोबत वाढणारी मुले मानसिकदृष्टय़ा कशी विकसित होत आहेत, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. पण एक गोष्ट उजेडात आली आहे, ती म्हणजे ही खेळणी म्हणजे जणू काही घरातला गुप्तहेर! huggybug या नावाचे हे बाहुलासदृश खेळणे सतत कोणत्या ना कोणत्या इंटरनेटला जोडलेलेच राहते. बाळाचे मनोरंजन करताना, त्याला प्रतिसाद देताना ते तसे असावेच लागते. पण त्यामुळे ते घरात जिथे कुठे असेल, तिथे जे काय बोलले जाईल ते सगळे त्यात रेकॉर्ड होते आणि हे पटकन लक्षात येत नाही. आता हा तर आमच्या वैयक्तिक आयुष्यात घुसखोरीचाच प्रकार झाला ना! ती माहिती (Data) कुणाच्या हातात पडेल आणि कोण तिचा

कशासाठी उपयोग करेल, यावर कुणाचा अंकुश असेल?…प्रश्न आणि प्रश्न. म्हणून उत्पादनांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उठणारच!

दुसरीकडे ग्राहक हादेखील आता ‘ऍलर्ट’ आणि आपल्या हक्कांबद्दल जागरूक होऊ लागला आहे. या हक्कांवर कशाही प्रकारे गदा येणार असेल तर त्याबाबत जाब विचारण्याची प्रक्रिया काय आहे, ग्राहक रक्षणासाठीच्या संघटना कोणत्या आहेत, त्यांच्या माध्यमातून कशी तक्रार करता येते अशा सर्व गोष्टींची जाणीव सध्याच्या ग्राहकवर्गात वाढत्या प्रमाणात दिसून येते. ‘जागो ग्राहक जागो’ या सरकारी आवाहनानुसार हल्लीचा ग्राहक ‘जागा’ होत असलेला दिसत आहे. फक्त प्रश्न आहे तो ग्राहकांमधील या वाढत्या ‘जाणिवे’ची कल्पना उत्पादने करणाऱया आणि पुरविणाऱया कंपन्यांना आहे का? त्याचा विचार या कंपन्या, उत्पादक करतात का? शेवटी ‘स्मार्ट’ उत्पादन ‘विश्वसनीय’देखील आहे, ही गोष्ट जशी ग्राहकांच्या हिताची आहे तशी उत्पादकांच्याही फायद्याची आहे.

आपल्याला पुढील काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात –
– ‘ऑनलाइन’च्या म्हणजे इंटरनेटच्या महाजालातून सामान्यपणे काहीही पुसले जात नाही- डिलीट होत नाही. अगदी तुम्ही काही ‘डिलीट’ करता, त्या वेळी ते कुठेतरी शिल्लक असतेच आणि कुणीतरी त्याचा कधीतरी उपयोग करू शकतो
– आपण ज्यांच्याशी मैत्री-जिथून खरेदी करतोय ती मंडळी नक्की कोण आहेत, याची खातरजमा करणे कठीण! याला अनेकदा किशोरवयीन मुले बळी पडतात.
– आभासी जग हेच खरे जग वाटावे, अशी मनोधारणा होऊन त्यातून समस्या निर्माण होतात. जसे की एखादा खेळ खेळताना आपल्या जबाबदाऱया तर ती व्यक्ती विसरतेच, पण स्वतःलाही विसरते.
– महाजालातील माहिती खरीच असेल असे नेहमी असत नाही. मात्र ग्राहकांनी दिलेली त्यांची माहिती चोरून, तिचा उपयोग त्यांच्यावरच केला जातो व ग्राहकांचे मतपरिवर्तन करण्यापासून ते आर्थिक निर्णयापर्यंत अनेक बाबतीत परिणाम केला जाऊ शकतो व त्यांचे नुकसान होते.
– या उत्पादनाद्वारे (लक्षात घ्या की विविध apps ही पण उत्पादनेच आहेत) केल्या जाणाऱया व्यवहारातून काही नुकसान झाले तर त्याला नक्की कोण जबाबदार हे ठरविणे कठीण असते. याचे कारण या व्यवहारांची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि त्यांचे जागतिक स्वरूप.
– विकसनशील देशात या सेवा नवीन, काहीशा आश्चर्यकारक आणि सतत, सर्वत्र उपलब्ध नसतात. त्याचा फायदा सेवा पुरवठादार घेतात. त्या एकतर महाग तरी करतात अगर त्याद्वारे मिळालेली माहिती सुरक्षित हाती राहील याची खबरदारी घेत नाहीत.
– जितके उपकरण अगर उत्पादन स्मार्ट, तितके वापरायला सोपे वाटते, पण अधिक गुंतागुंतीचे असते. त्यामुळे ग्राहक स्मार्ट होणे, जागरूक होणे आणि त्याने सतत दक्षच राहणे याला
पर्याय नाही.

इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञानाने विविध उपकरणे जोडली जातात. ती तुमच्या घरातली असतील किंवा मग आरोग्य सेवेशी अगर वाहतुकीशी संबंधित असतील. आरोग्य सेवा अगर वाहतूक किंवा इतर सार्वजनिक सेवासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. एकट्या अगर अपंग व्यक्तीसाठी हे वरदानही ठरू शकते. पण चांगल्यासाठीच त्याचा वापर होईल अशी ग्वाही देता येत नाही. कारण इथेही व्यक्तिगत माहितीचा खजिना कुणाच्या तरी हाती पडणार आहे. आज मी दिल्लीचे online तिकीट काढले रे काढले की दिल्लीच्या हॉटेल आणि दुकानांच्या जाहिराती आपोआप माझ्याकडे यायला लागतात. मग माझ्या घरातली विविध उपकरणे आणि माझ्या हातातील स्मार्ट उपकरण जोडले की मी कुठे आहे (ते तर आजसुद्धा फोनवरील नकाशे-लोकेशनमुळे कुठेतरी नोंदले जातेच आहे.) आणि घरात काय चालू आहे या सगळ्याची नोंद होत राहणारच आहे. ही माहिती विश्वसनीय हातात असावी. म्हणजेच माझे उपकरण व मी वापरत असलेले उत्पादन स्मार्ट तर हवेतच, पण विश्वसनीयदेखील हवे आहे ते यासाठीच!

(लेखिका मुंबई ग्राहक पंचायत शिक्षण विभागाच्या प्रमुख आहेत.)