राजेशाही

2989

>> विद्या कुलकर्णी

आपल्या माणसांच्या विश्वाच्या पल्याड पक्ष्यांचे विहंगम देखणे जग मोठं अवर्णनीय आहे. भरपूर हिरवाई, नितळ निळे आकाश, स्वच्छंद विहार करणारे नानाविध आकर्षक पक्षी या जगात आहेत. देखणे, सुंदर, रुबाबदार गप्पू पक्षी. बहुदा त्यांच्या अव्याहत किलबिलाटामुळे त्यांना गप्पू हे नाव मिळाले असावे.

लाफिंगथ्रश ऊर्फ गप्पू या पक्ष्यांच्या 30 पोटजाती आहेत. या लेखात मी त्यापैकी एकत्र वावरणारे ‘व्हाईट क्रेस्टेड, व्हाईट थ्रोटेड आणि स्ट्रैटेड लाफिंगथ्रश’ यांच्या विषयी माहिती देत आहे. हे पक्षी फारसे रंगीबेरंगी नाहीत, परंतु त्यांचा रुबाब राजेशाहीच आहे, पांढरीशुभ्र टोपी किंवा गळा, पांढऱयाशुभ्र रंगाचा अंगावर असलेला शिडकावा मनाला मोहित करतो.

गप्पू हे पक्षी लीओथ्रिचिडी कुटुंबाचे सदस्य आहेत. ते वेगवेगळ्या रंगांमध्ये व आकारात आढळतात. हे उष्ण कटिबंधातील पक्षी असून प्रामुख्याने दक्षिणपूर्व आशियात आणि हिंदुस्थानी उपमहाद्वीपमध्ये आढळतात. या पक्ष्यांचे वास्तव्य 1600 मीटर्स उंचीपर्यंत पर्वताच्या पायथ्याजवळील टेकडीवर विरळ झाडी, झुडपे किंवा वाळवंटामध्ये असते. हे पक्षी फारसे स्थलांतर करत नाहीत. त्यांचे पंख लहान असून त्यांची उडण्याची क्षमता कमी असते. नर व मादी जवळजवळ सारखेच दिसतात. यांचे खाद्य मुख्यत्वे कीटक, पाली, साप, बेडूक असते. हे पक्षी फळे, बियाणे व मधसुद्धा खातात. यांचा प्रजननाचा काळ फेब्रुवारी ते सप्टेंबर असतो. हे वयाच्या दुसऱया वर्षांपासून पुनरुत्पादन करू शकतात. घरटे कपाच्या आकाराचे असून ते झाडावर 2-6 मीटरच्या उंचीवर पाने, गवत वापरून बनवलेले असते. एकावेळी मादी दोन ते तीन शुभ्र पांढऱया रंगाची अंडी घालते. 14-16 दिवसात पिल्लांची वाढ होते. मी या पक्ष्यांचे छायाचित्रण सत्ताल, उत्तराखंडमध्ये केले आहे.

व्हाईट क्रेस्टेड लाफिंगथ्रश हा पक्षी हिरवट तपकिरी रंगाचा असून त्याचे डोके, तुरा, गळा, छातीचा भाग पांढराशुभ्र असतो. डोळ्यापासून कानापर्यंत काळा पट्टा असून मानेच्या मागची बाजू फिक्कट राखाडी रंगाची असते. मानेच्या मागच्या बाजूपासून छातीपर्यंत लालसर नारिंगी रंगाची कॉलर असते. या पक्ष्यांचा आवाज मध्येच किलबिलाट किंवा हसल्यासारखा वाटतो. त्यांची शीळ दोन ते तीन सुरांची असते. या पक्ष्याचा फुलोऱयासारखा तुरा एखाद्या ‘फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफ’सारखा वाटतो आणि म्हणूनच पाहताक्षणी तो नजरेत भरतो.

व्हाईट थ्रोटेड लाफिंगथ्रश हा पक्षी लालसर तपकिरी रंगाचा असून कपाळ थोडेसे तांबूस तपकिरी रंगाचे तर गळा व छातीचा वरचा भाग पांढराशुभ्र असतो. पंखांची टोके पांढरी असून (flight feathers) रंग राखाडी तपकिरी असतो. पोटाचा व खालचा भाग फिक्कट तांबूस तपकिरी रंगाचा असतो. डोळ्यातील बुबुळं पांढरी असून डोळ्याभोवती (lores) काळा रंग असतो. या पक्ष्यांची फोटोग्राफी करतानाचा मजेशीर अनुभव म्हणजे फांद्याफांद्यांवर प्रेमी युगुलेच खूप दिसली. स्ट्रैटेड लाफिंगथ्रश हा पक्षी तपकिरी रंगाचा असून त्याचा तुरा गोलाकार दाट असतो. पिसाऱयाचा रंग फिक्कट ते गर्द लालसर-तपकिरी – तांबूस पिंगट असून त्याच्या डोक्यापासून अंगावर पांढऱया रेषा असतात. या पक्ष्याचा पोटाचा रंग राखाडी – पांढरा असून चोच काळी असते. इतर गप्पू पक्ष्यांच्या तुलनेत हा पक्षी अंगाने बळकट असतो. या पक्ष्याच्या आवाजात कॅकलिंग, शीळ व किलबिलाट समाविष्ट आहेत. लालसर मातीच्या डोंगरावर तुरळक हिमवर्षाव पसरावा तसे काहीसे याचे रूप आहे. त्याचा तुरा तर राजाच्या डोक्यावरील शिरपेचासारखा वाटतो.

हिमालयातील निसर्ग आपल्याला नेहमीच भारावून टाकतो आणि अशा या विलक्षण जगात पक्ष्यांचे रूप अधिकच खुलते. गप्पू पक्ष्यांचा जोडीदाराबद्दलचा उत्कट निःस्वार्थी भाव बरेच काही शिकवून गेला!

आपली प्रतिक्रिया द्या