स्वच्छंद : अखंड बडबड

568

>> विद्या कुलकर्णी

लांबलचक शेपटी, रंगीबिरंगी रुपडं आणि दमदार आवाजाचा हा पक्षी परदेशात अत्यंत शुभ मानतात.

उत्तराखंडमध्ये आम्ही सत्तालकडे गाडीने निघालो होतो. माझ्याबरोबरील मैत्रिणीने गाडी थांबवण्यास सांगितली. मी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा लांबच लांब शेपटीचा सुंदर पक्षी उंच झाडावर एका फांदीवरून दुसऱया फांदीवर उडत होता. त्याच्या डौलदार शेपटीमुळे चटकन ओळखता येत होता. त्याची शेपटी पूर्णतः कॅमेऱयामध्ये सामावून घेणे हीच मोठी परीक्षा होती. निळसर रंगाचा पिवळय़ा चोचीचा हा पक्षी मॅगपाय होता. नंतर सत्तालमध्ये गेल्यावर लाल चोचीचा मॅगपाय दिसला. या दोन्ही पक्ष्यांचा आवाज अतिशय दमदार आहे म्हणूनच की काय, जर कोणी जास्त बडबड करत असेल तर त्याला ‘मॅगपाय’ म्हणून संबोधतात. हे पक्षी सामान्यपणे युरोप, आशिया व पश्चिम उत्तर अमेरिकेच्या समशीतोष्ण प्रदेशांमध्ये आढळतात. तिबेट आणि हिंदुस्थानच्या उंच भागात आणि पाकिस्तान येथेदेखील त्यांचे वास्तव्य आहे. पूर्व आशियाई संस्कृतीत मॅगपाय हा एक लोकप्रिय पक्षी आहे व बऱयाच कविता आणि चारोळय़ांमधून याचा उल्लेख आढळतो. हा पक्षी ‘चांगले भाग्य आणि भविष्य’ याचे प्रतीक मानतात. मॅगपाय हा कोरियाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

‘मॅगपाय’ पक्षी मुख्यत्वे दाट जंगलात राहणारे असले तरी शेतात किंवा टेकडीवरसुद्धा दिसू शकतात. ते जमिनीवर अन्न शोधताना शेपटी जमिनीला टेकू नये म्हणून वरती उंच उभी ठेवतात. साधारणतः 7 – 8 पक्ष्यांच्या समूहाने वावरतात. एखादे राहण्याचे ठिकाण निवडले की ते आसपासच्या भागातच फिरतात. हे पक्षी पर्वतांच्या रांगांमधून उडत असताना त्यांच्या हवेत उडणाऱया शेपटय़ा व पंखांमधून दिसणारा प्रकाश सगळेच जादुई वाटते.

पिवळय़ा चोचीचा निळा मॅगपाय
डोके, मान आणि छाती काळी असून मानेच्या मागच्या बाजूला पांढरा पट्टा असतो. खालचा भाग पांढरा व त्यावर फिक्कट जांभळय़ा रंगाची झलक असते. वरचा भाग मात्र जांभळा-निळा असून पंख व शेपटी चमकदार असते. पंखांमध्ये पांढऱया रंगांचे पट्टे असतात. पंखांची पिसे निळी असून टोकावर रुंद पांढरे पट्टे असतात. या पक्ष्याचे पाय नारिंगी असतात.

संपूर्ण हिमालयात व ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाने पिवळय़ा चोचीचा निळा मॅगपाय पक्षी आढळतो. हे पक्षी स्थानिक असले तरीही हिवाळय़ामध्ये ते कमी थंडी असलेल्या प्रदेशात स्थलांतर करतात. छोटे सस्तन प्राणी, इतर पक्ष्यांची अंडी व पिल्ले, कीटक, जंगली फळे आणि विविध प्रकारची बोरे हे त्यांचे खाद्य असते. या पक्ष्याचा आवाज ‘गोंधळा’ सारखा वाटतो तर कधी अतिशय कर्कश्श वाटतो. कधी कधी वेगवेगळय़ा स्वरात मधुरही गातो.

हे पक्षी फांद्यांच्या खपच्यात मध्यम आकाराचे घरटे बांधतात, पण दाट झाडीमुळे ते सहजासहजी दिसत नाहीत. घरटे बारीक गवत, मुळे आणि तंतूंच्या अस्तराने बनवलेले असून मोठय़ा कपासारखे दिसते. मादी एकावेळी 3-4 अंडी घालते.

लाल चोचीचा निळा मॅगपाय
लाल चोचीचा निळा मॅगपाय 65-68 सें. मी. लांब असून वजन 196-232 ग्रॅम्स असते. डोके, मान आणि छाती काळी असून डोक्याच्या वरच्या भागावर निळसर रंगांचे ठिपके असतात. खांदे व पार्श्वभाग फिॊकट निळय़ा रंगांचे तर खालचा भाग पांढऱया रंगाचा असतो. लांब शेपटी चमकदार निळी असून टोकावर रुंद पांढरे पट्टे असतात. पाय व चोच नारिंगी लालसर रंगाची असते.

हे पक्षी त्यांचे घरटे झाडावर किंवा मोठय़ा झुडपात बांधतात. एकावेळी मादी 3-5 अंडी घालते. ते झाडे आणि जमिनीवर अन्न शोधतात. हे पक्षी अळय़ा, गांडूळ, इतर लहान प्राणी, इतर पक्षांच्या घरटय़ातील अंडी व पिल्ले, फळे आणि बियाणे असे विविध प्रकारचे अन्न खातात. हे पक्षी वेगवेगळे आवाज काढू शकतात व नक्कलही करू शकतात. त्यांचा आवाज कधी कर्कश्श तर कधी बासरीतील तीव्र शीळेसारखा वाटतो.

या दिमाखदार पक्ष्यांनी माझ्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. याची भाषा जर मला कळली असती तर त्याला मी नक्कीच विचारले असते, ‘तुला तुझ्या रुबाबदार सौंदर्याची जाणीव तरी आहे का ?’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या