पुस्तकांच्या हकीकती

>> विजय बेंद्रे

पुस्तकवेडय़ांचा पुस्तकांवर जसा जीव असतो तसाच पुस्तकांचाही माणसांवर जीव जडतो आणि या शोधात आपसूकच ती योग्य हातात येऊन विसावतात. पुस्तकांच्या अशा कथा सांगणाऱयांपैकी एक पुस्तकवेडा म्हणजे विजय बेंद्रे. अशा कथांच्या शोधात असणारा आणि त्या मांडणारा चिकित्सक वाचक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकशोधाच्या नितळ निवेदनातून वाचनसंस्कृती दर्शवणारा हा लेख.

थकलेल्या मनाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आतमध्ये आलो. लाईट लावली. दरवाजातून आता येतानाच उजव्या बाजूला माझा एक बुकशेल्फ आहे. घरात प्रवेश करताना सगळ्यात आधी माझी नजर त्याच्याकडे जाते. नेहमीप्रमाणे आजही तसंच पाहिलं आणि थबकलो. एक करंगळी एवढी पाल. लालसर आणि थोडीशी पारदर्शक शरीराची. शेल्फच्या खालून दुसऱया रॅकच्या पहिल्या रांगेतल्या पुस्तकांवर. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तीनाओमी क्लेनच्या नो लोगो या पुस्तकाच्या कण्यावर होती. नंतर हळूच माझा पायरव ऐकताच ती त्यावरच्या एडवर्ड सेडच्या कव्हरिंग इस्लाम या पुस्तकावर आली. एक दोन मिनिटे ती त्याच पुस्तकाच्या एका कोपऱयाला ‘कव्हर’ करून होती. मग मी शेल्फच्या एका बाजूच्या किनाऱयावर नॉक केलं आणि त्यात शुक… शुक… असा टिपिकल आवाज मिसळला. ती इटुकली पाल अनिता देसाई (डायमंड डस्ट), कुवर नारायण (आज और आज से पहले ), थोरो (द जर्नल), कुरोसावा (समथिंग लाइक)… अशा आणि अनेक पुस्तकांना ओलांडून ख्रिस्तोफर लंडनच्या बॉम्बे गॉथिक या पुस्तकावर जाऊन थांबली. मी फार गमतीने तिच्याकडे पाहत होतो. कुणीतरी काळ्याभोर फळ्यावर खडूने फळ्याच्या वरील डाव्या काटकोनातून सरळ खालील बाजूच्या उजव्या काटकोनात तिरपी रेघ ओढावी तशी ही पाल तिरपी पळत वरच्या पुस्तकाच्या कोपऱयात थांबली. माझ्या कुठल्याही हलक्याशा हालचालीने ती दर्शनी भागाच्या पहिल्या रांगेच्या पुस्तकांना सोडून त्यामागील पुस्तकांकडे पळणार हे मला माहीत होतं म्हणून मी गप्पपणे उभा होतो, पण पालीला मागच्या पुस्तकांना भेटण्याची भलतीच घाई असावी. ती मागच्या रांगेच्या दिशेने अदृष्य. पाल अदृष्य. कुठे अदृष्य. माहीत नाही. ती नुसती अदृष्य. नितळ अदृष्य. मग मी तिने स्पर्श केलेल्या पुस्तकांवरुन हात फिरवला. दर्शनी भागतील पुस्तकांकडे पाहत मागे ठेवलेल्या पुस्तकांना आठवत राहीलो. मागची पुस्तकं मला पाहता येत नव्हती. पुढची पुस्तकं काही वेळ बाजूला ठेवून पाहता आली असती, पण मग पालीला हुसकावून लावल्यासारखं झालं असतं. तिने माझी पुस्तकं नीट पाहिली नसती. कारण मला नेहमी वाटतं घरी आलेल्या ‘कोणालाही’ माझा बुकशेल्फ आनंदाने दाखवावा. फक्त वाळवी आणि सिल्व्हर फिशला मनाई आहे. त्यांनी तर माझ्या शेल्फच्या आजूबाजूला फिरकूही नये. तर ती पाल आता मागे कुठल्या पुस्तकांवर भटकत असेल याचा विचार करत होतो. तिने आता निवांतपणे माझ्या शेल्फमध्ये भटाकावं असं वाटलं. मग तिच्यासाठी एक प्रार्थना केली. तिची कधीच शेपटी तुटू नये. कुणाच्या अंगावर पडलीच तर तिला कुणी झटकू नये. तिला तिच्या सगळ्या पालीयननी आदर सन्मान द्यावा. घरातल्या सगळ्या भिंतींचा सातबारा तिच्या नावे व्हावा. कारण ती पाल माझ्या पुस्तकांच्या स्पर्शाने काठोकाठ भरलेय.

पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी मला बऱयाचदा संमोहित केलंय. काही पुस्तकं तर मी फक्त मुखपृष्ठ आवडलं म्हणून घेतलीत. सरासरी 100 पुस्तकांत पाच पुस्तकं मी मुखपृष्ठ आवडलं म्हणून घेतो. मुखपृष्ठ आवडलेलं पुस्तक मी वाचेनच असं नाही. त्या पुस्तकांशी माझा संबंध फक्त मुखपृष्ठापर्यंतच असतो. कधी उदास वाटलं आणि त्याचवेळी खास आवडती अशी मुखपृष्ठ असणारी पुस्तकं आजूबाजूला असतील तर ढगाळ मन निरभ्र होतं. असे योगायोग फार कमी घडतात जेव्हा अत्यंत आवडतं पुस्तक सुंदर मुखपृष्ठासह सापडतं.

एखाद्या अनोळखी गावात हिंडत असताना काही घरं दिसतात जी मला उगाच फार आवडतात. त्या घरांशी माझा कसलाही संबंध नसतो. कधीतरी कुठल्यातरी ओढीने त्यातल्याच एखाद्या घराजवळ जावं असं वाटतं. मग अशी ओढून घेणारी घरं पाहत राहणं सुरूच राहतं. घराचा परिसर आवडतो. घरात जाण्याचा प्रश्न नसतोच. त्या घराच्या आजूबाजूला असणाऱया कुंपणाला किंवा कुंपणसदृष बांधांना, फुलझाडांना-बागांना मनसोक्त पाहून घेतो. घराच्या ओसऱया, खिडक्या, परसबाग, घरातून बाहेर येणारे गप्पीष्ठ आवाज, दारं, कौलांवर पडलेला पानांचा खच. असं कितीतरी. तर कधी निव्वळ ओसाड परिसर, कुलूप लावलेलं दार, उकरलेलं अंगण. हे सगळं मला आपलंसं वाटतं. विलक्षण वाटतं. अगदी म्हणजे अगदी. या आणि अशा अनेक गोष्टींचा थेट संबंध नसला तरी फक्त मुखपृष्ठ आवडण्यामागचा नेणीवेचा प्रवाह यातूनच वाहत राहतो याची जाणीव अधूनमधून माझी ‘मलाच’ होत राहते.

अगदी मागच्या आठवडय़ाची गंमत पाहा. पेपरबॅक आणि हार्डकव्हर अशी दोन्ही पुस्तकं एकत्रित समोर असतील तर मी आधी हार्डकव्हर पुस्तक निवडेन. हार्डकव्हर पुस्तकाची धुंदी वेगळी असते. हार्डकव्हर पुस्तकं जमा करणाऱया पुस्तकप्रेमींच्या अनेक कथा आहेत, पण तो स्वतंत्र विषय. तर माझ्या समोर ओरहान पामुक यांचं अदर कलर्स हे पुस्तक होतं. पेपरबॅक आणि हार्डकव्हर. अगदी दोन्हीही शेजारी. आता काय करावं? मी पेपरबॅक घेतलं. चक्क पेपरबॅक. तेही हार्डकव्हर आवृत्ती समोर सहज मिळत असताना. कारण पेपरबॅक आवृत्तीचं मुखपृष्ठ इतकं खास वाटलं की हार्डकव्हर घ्यावं असं वाटलंच नाही. मुखपृष्ठावर स्वतः लेखक पामुक यांचं तरुणपणीचं छायाचित्र आहे. फार सुंदर छायाचित्र. मुखपृष्ठाच्या प्रेमातच पडलो. फार विलक्षण. फारच विलक्षण. पामुक चित्र काढताहेत. अगदी मग्न होऊन. (माझ्या अंदाजानुसार ते चित्रच काढत असावेत.) डावा हात टेबलावर ठेवून त्या हाताच्या कोपरावर भार देऊन पुढय़ातल्या टेबलावर झुकून शांतपणे समोरील कागदावर चित्रसदृष रेखाटन चालू आहे. पामुक यांचं हे छायाचित्र पाहणं एकूणच त्यांच्या अदर कलर्स ह्या पुस्तकांच्या नावाला साजेसे आहे. अदर कलर्स घरी आल्या नंतर वाचायला सुरुवात केली ते मधूनच. बुक्स अँड रिडिंग असा एक विभाग या पुस्तकात आहे. पामुक यांनी एकूणच त्यांच्या वाचनाविषयी आणि पुस्तकांविषयी टिपणं, निबंध, परीक्षणे आणि आठवणी असं सगळं त्यात समाविष्ट केलं आहे. याच भागात पृष्ठ क्र. 117 वर पामुक यांनी Nine Notes on book covers या शीर्षकाखाली पुस्तकांच्या मुखपृष्ठांविषयी नऊ नोंदी लिहिल्यात. मुखपृष्ठ आवडलं म्हणून मी पेपरबॅक आवृत्ती घेतली आणि या नऊ नोंदी वाचून माझा पेपरबॅक आवृत्ती घेतल्याचा आनंद द्विगुणीत झाला.

माझ्या होम लायब्ररीमधील पुस्तकांची संख्या वाढतच जाते. काहीवेळा काही पुस्तकं कायमची निघून जातात, पण त्याच वेळी त्यांच्या जागी इतर पुस्तकं येऊन त्यांची जागा पटकावून बसतात. पण माझा हात सोडून पुस्तक नावाची गोष्ट कुठेही जात नाहीत. पण माणसांच्या आपुलकी आणि प्रेमाची गोष्टीबाबत तसं घडत नाही. माणसं आधी हातातून निसटतात. मग मनातून. आणि मग ती माझ्या बुकशेल्फमधून गायब होतात. (जणू अशा माणसांना माझी पुस्तकं दूर करतात माझ्यापासून.). जशीजशी पुस्तकं वाढतात आणि त्यातीलच काही नव्याने सावकाशपणे वाचली जातात तसतशी माझ्या आयुष्यातील माणसं कमी होत जातात. त्याच्या जागी नवी माणसं जोडली जातात आणि तीही तशीच निघून जातात. हे विचित्र समीकरण आहे. किंवा असं समजतो की जितकी माणसं मोजकी तितकी माझ्या मनात पुस्तकांना जागा जास्त. मग कळत द हाऊस ऑफ पेपर मधला कार्लोस पुस्तकांचं घर का बांधतो? तो इतका अस्थिर होऊन स्थिर का होतो? माणसांच्या येण्याजाण्याच्या दरम्यान जो मुहूर्त असतो मनाच्या जागा व्यापण्याचा आणि रिकाम्या होण्याचा त्या मुहूर्तांवर मी पुस्तकं दान करतो किंवा देऊन टाकतो कुणालातरी कायमची. किंवा मग उगाच विकत घेतो. माणसांच्या येण्या जाण्याचं ते सेलिब्रेशन असतं माझं. दोन महिन्यांपूर्वी असंच कुणीतरी आपलं वाटलं तेव्हा त्या आनंदात पालघर जिह्याच्या आदिवासी पाडय़ात 150 पुस्तकं भेट दिली. आता ती आपली असूनसुद्धा आपली नसेल तर मी किती पुस्तकं विकत घेईन? किंवा किती पुस्तकं कुणाला देईन?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या