भंगलेले अमेरिकन स्वप्न!

>> डॉ. विजय ढवळे (ओटावा-कॅनडा)

अमेरिका, तुमच्या कर्तृत्वाला आणि कर्तबगारीला प्रचंड संधी देणारे सधन राष्ट्र, सामाजिक सुविधा मुबलक, पायाभूत सुविधा भक्कम व मजबूत. त्यामुळे जगातल्या प्रत्येक विकसनशील देशांतली तरुणाई अमेरिकेला जाऊन, तेथे कायमचे वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहात असतात. सुशिक्षित मंडळी एचवनबी व्हिसा मिळवून तेथे जातात. अशिक्षित पण साहसी लोक टुरिस्ट व्हिसा मिळवून अमेरिकेत प्रवेश करतात व तेथे राहतात व स्वदेशात परततच नाहीत. असे करणाऱयात मेक्सिकन्स बहुसंख्य म्हणजे ५६ टक्के आहेत तर ग्वाटामाला आणि एल सॅल्व्हेडॉर या दक्षिण अमेरिकेतल्या देशांचे प्रमाण अनुक्रमे ७ व ५ टक्के आहे. भारतीय सुमारे एक लाखतरी असावेत असा इमिग्रेशन खात्याचा अंदाज आहे! या बेकायदेशीर लोकांना इतर अमेरिकन नागरिकांप्रमाणेच मुलांसाठी मोफत शालेय शिक्षण, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरे गोष्टी मिळतात. मुले ही अमेरिकेतच जन्मली असल्यामुळे त्यांना जन्मदत्त नागरिकत्व मिळते. पण त्यांच्या आईवडिलांचे काय? ते नेहमी आपण पकडले जाऊ अशा भीतीच्या छायेत वावरत असतात. ट्रंपने त्यांच्या निवडणूक प्रचारात असे बेकायदा सव्वा कोटी लोक अमेरिकन लोकांच्या नोकऱयांवर गदा आणताहेत. (कारण ते कमी वेतनावर काम करण्यास तयार असतात) गुन्हेगारी पसरवत आहेत. जादा पैसा मिळावा म्हणून चोरटी अमली पदार्थांचा व्यापार करत आहेत, वेश्या व्यवसायात गुंतले आहेत असे अनेक आरोप केले व त्या सर्वांना हद्दपार करणे हाच योग्य मार्ग असल्याचे त्यांच्या स्फोटक निवडणूक प्रचारकी भाषणातून वारंवार सांगितले.

मुळातच हद्दपारीची संभाव्य टांगती तलवार असलेल्या या बेकायदेशीर रहिवाशांची त्रेधातिरपीट उडाली. ओबामाच्या कारकीर्दीतही या लोकांना संरक्षण नसले तरी सरहद्द ओलांडून अमेरिकेत घुसणाऱया मेक्सिकन्सना किंवा ज्यांच्यावर फौजदारी खटले नोंदवले गेले आहेत अशांची गच्छन्ती करण्याचे अधिकृत धोरण होते. ओबामा हा मूळचा कृष्णवर्गीय असल्याने, त्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा होता. ट्रंप हा हाडाचा व्यावसायिक. कायदा तोडून आमच्या देशात राहणाऱया उपऱयांची आम्ही गय का करायची असा त्याचा रोकडा सवाल होता. परंतु त्यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दया दाखवणारी कॅलिफोर्निया, टेक्सास, नेवाडा या मेक्सिकोच्या सरहद्दीवर असलेल्या अमेरिकेच्या राज्यांत फोफावत होती. तुम्हालाही काही हक्क आहेत, त्यांची पायमल्ली होत नाही याकडे लक्ष पुरवा, कोणाला तरी कायदेशीर हक्क देऊन तुमच्या अल्पवयीन मुलांची काळजी घेण्यासाठी, कोणाला तरी नेमा, जर यदाकदाचित तुमच्यावर हद्दपारीची वेळ आली तर वगैरे, त्यांचा सल्ला असतो! परंतु अशा लोकांचे मित्रही बेकायदेशीरपणे, दडपून वास्तव्य करत असल्याने विश्वासू मित्र असा नसतोच. मग ते वकिलांकडे असे हक्क सुपूर्द करतात. दक्षिण फ्लॉरिडातल्या एक वकिलाकडे अशा प्रकारचे हक्क देणारी 1500 पत्रे साचली आहेत! अर्थात त्यासाठी प्रत्येक वर्षाला तो अशिलाकडून जबर फी उकळतोच. मुलांचे आईवडील हाकलले गेले तरी मुले अमेरिकेत राहू शकतात व तशी राहतातही!

कुटुंबाची अशी विभागणी होत असल्याच्या दर्दभऱया कहाण्या टीव्ही, वृत्तपत्रे यांतून येतात. त्यावर कडक इमिग्रेशन धोरण अवलंबले पाहिजे असे म्हणणे असते. ‘इथे कुठे कुटुंब विभागले जात आहे? त्या बेकायदेशीर रहिवाशांनी त्यांची मुले घेऊन खुशाल त्यांच्या मायदेशी परतावे. त्यांचे हात कोणी बांधून ठेवले आहेत? समजा यांच्या आईबापांनी घराकरता कर्ज काढले असेल आणि हप्ते चुकवले असतील तर बँक घर ताब्यात घेते व मुलांना घराबाहेर काढतेच ना? मग इमिग्रेशन खाते यापेक्षा निराळे काय करते आहे? हाँगरल या दरिद्री देशातून एक स्त्री २००१ मध्ये अमेरिकेत घुसली. तिचा १३ वर्षांचा मुलगा मतिमंद आहे. त्याला कॅलिफोर्निया राज्यांतल्या खास स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. कारण तो जन्माने अमेरिकेचा नागरिक असल्याने. त्या आईला भीती आहे, जर मला देशाबाहेर काढले तर या मुलाचे काय होईल? कारण माझ्या मायभूमीत अशा मुलांसाठी काहीही सवलती, खास शाळा, मोफत लंच, शाळेसाठी बस या कॅलिफोर्निया राज्यांत उपलब्ध असलेल्या सवलती मुळीच नाहीत!

लॉस एंजलिसमध्ये जानेवारी २०१८ मध्ये पोलिसांनी छापे टाकले व ४०० लोकांना कैद केले. त्यांनी मात्र मुलांना आपणासोबत मायदेशाला नेले नाही. या मुलांचे शाळेतले लक्ष उडाले. त्यांना मानसिक आजारदेखील निर्माण झाले. पण अशांबद्दल का सहानुभूती बाळगायची, ते त्याच्या वडिलांबरोबर परत जाऊ शकले असते व वयाच्या 18 वर्षानंतर पुन्हा अमेरिकेत नागरिकत्वाच्या हक्कान्वये येऊ शकले असते. पण त्यांच्या वडिलांनी तो पर्याय निवडला नाही. त्याला ट्रंपने दाखवलेल्या कडक धोरणाला का दोष द्यायचा? का, तर कठोरपणे अस्तित्वात असलेल्या कायद्याचेच पालन करतो आहे म्हणून? जे कायद्याच्या धारधार पात्यातून सुटतात ते केवळ नशिबाच्या जोरावर. कारण अंदाज असा आहे की त्या बेकायदा राहणाऱयांपैकी फक्त ५ टक्के लोकांवर कारवाई दरवर्षी होऊ शकते.

हिंदुस्थानमध्ये बांगलादेशी घुसलेले आहेत. त्यांना देशात आणणारे आपलेच सरहद्दीचे रक्षण करणारे कर्मचारी आहेत. लाच घेऊन त्यांनी या लोकांना देशात आणले. मग राज्यातल्या कर्मचाऱयांनी त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड देण्याकरता त्यांच्याकडून पैसे उकळले. उद्या मोदी सरकारने त्यांच्या विरोधात मोहीम उघडली तरी ती यशस्वी होणे अशक्य आहे. कारण ते नागरिकत्त्वाचे, आपल्या दीर्घ वास्तव्याचे पुरावे देऊ शकतात. शिवाय त्या लोकांसाठी हंबरडे फोडणाऱया मानवी हक्कांचे जतन करण्यास कटिबद्ध आहोत असे सांगणाऱया संस्थांची कमी नाही. तिस्ता सेटलवाडसारखे कट्टे भाजप शत्रू असलेले कायदेपंडित या लोकांच्या पारडय़ात आपले वजन टाकायला एका पायावर तयार असतातच!

ट्रंपच्या या कडक धोरणामुळे बेकायदा लोकांच्या आवकीत घट झाली आहे हे निश्चित, बऱयाचदा मेक्सिकन्स रात्रीच्या सुमारास अमेरिकेची सरहद्द ओलांडून घुसायचे. त्यांना पकडून, परत धाडले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. अशां वरही चाप बसला आहे! ज्यांना पृष्ठभागावर लाथ मारून बाहेर काढले त्यापैकी ९७ टक्के लोकांवर किरकोळ वा गंभीर स्वरूपाचे गुन्हे होतेच. त्यामुळे ट्रंपच्या जहाल विधानांना पुष्टीच मिळते. तो म्हणतो. या लोकांची मुले अमेरिकेत जन्मली ती मोठी होऊन कमावती होऊ दे, देशाचे कर भरू देत मग त्यांच्या आईबापांना भेटीसाठी आणू देत ना. माझा त्याला विरोध नाही. मात्र भेटीच्या निमित्ताने आलेले लोक, व्हिसा मुदत संपल्यावर परततील ही जबाबदारी स्पॉन्सर करणाऱयांची. त्यांनी जर त्यात हयगय केली तर त्यांनाही गुन्हेगारीच्या पिंजऱयांत रहावे लागेल!

परंतु मुळात मुद्दा हा की, असे हद्दपार केलेले लोक स्वतःच्याच पोरांना अमेरिकेतून स्वतः बरोबर का घेऊन जाऊ शकत नाहीत? कारण सध्या इमिग्रेशन खात्यात असलेला बॅकलॉग. नोव्हेंबर १५, १९९७ मध्ये केलेल्या अर्जाची आता वीस वर्षे उलटून गेल्यानंतर कायदेशीर सुनावणी होत आहे! मरिया ही उराग्वेला दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत घुसली त्याला दीड दशक उलटून गेले. ती कॅलिफोर्नियात द्राक्षे वेचण्याचे काम करते. काबाडकष्ट करावे लागतात. कमीत कमी पगारावर तिला राबावे लागते म्हणून बागायतदार खूश आहे. ओव्हरटाइम केला तरी पगार दीडपट देत नाही. तिचीही मूठ झाकलेली असल्याने ती तक्रार करू शकत नाही. तिची दोन लहानगी मुले कायम आईची ताटातूट होणार की नाही या चिंतेत असतात. किराणा सामान खरेदी करायला मरिया शक्यतो रात्रीची जाते. कारण तेव्हा तपासणी अधिकाऱयांची वर्दळ कमी असते. तिला घरी यायला १० मिनिटे जरी उशीर झाला तरी मरियाची मुले तिला मोबाईल फोनवरून भंडावून सोडतात. तिचे अमेरिकन स्वप्न, तिला रात्री पडलेल्या स्वप्नांमध्येही साकार होऊ शकत नाही.

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)