साहित्य संमेलन : आता बदल अपेक्षित

>> डॉ. विजय पांढरीपांडे

अध्यक्षीय निवड पद्धत बदलली हे साहित्य महामंडळाचे स्तुत्य पाऊल यात शंकाच नाही. आता साहित्य संमेलनाचे स्वरूपदेखील बदलायला हवे. प्रत्येक वर्षाच्या संमेलनाची वार्षिक उद्दिष्टय़े निश्चित करावी. उपक्रम निश्चित करावेत. त्याचे वेळापत्रक ठरवावे. असे बदल घडून आले तर साहित्याला चांगले दिवस येतील. संमेलने अर्थपूर्ण होतील. कुणाला कुणाविषयी तक्रारीला जागा राहणार नाही. हे शक्य आहे.

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या तत्त्वानुसार यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले असणार. या संमेलनाचे आगळे वेगळे वैशिष्टय़ हे की, पहिल्यांदाच ‘राजकीय’ पद्धतीच्या निवडणुका न होता अध्यक्षांची एकमताने निवड झालीय. ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडते आहे. प्रथमच निवडणुकीची धुळवड नाही, एकमेकांवर दोषारोप नाहीत. अशी शांत अनुकूल परिस्थिती आहे. इतिहास लक्षात घेता हे असे दरवर्षी घडेलच याची शाश्वती देता येत नाही.

आतापर्यंत वाद झाले नाहीत, गोंधळ माजला नाही, आरोप-प्रत्यारोप झाले नाहीत. असे संमेलन बहुधा झालेच नसावे. अगदी ज्येष्ठ, श्रेष्ठ, नामवंत साहित्यिकांनादेखील मनस्ताप सोसावा लागलाय, पण तरीही दरवर्षी हा सोहळा तितक्याच नेटाने पार पडतोय. परंपरा त्याच उत्साहात नेटाने पुढे चाललीय हेही आपण जागरुक, जिवंत असल्याचे लक्षण आहे. गेली काही वर्षे या संमेलनात नको तितका राजकीय हस्तक्षेप वाढतो आहे. ज्या शहरी, गावी हे संमेलन असेल तिथली लोकल राजकारणी मंडळीच संयोजनाचा ताबा घेतात.

आजकाल साहित्य संमेलनाचा खर्च कोटय़वधी रुपयांच्या घरात जातो. या उधळपट्टीची खरंच गरज आहे का? साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश काय? तो उद्देश सफल होतोय का? अध्यक्षांच्या डय़ूटीज, रिस्पॉन्सिबिलिटीज नेमक्या काय आहेत? या प्रश्नांची उत्तरं सामान्य रसिकाला मिळायला हवीत. त्यासाठी प्रत्येक साहित्य संमेलनाच्या आर्थिक जमाखर्चाचा लेखाजोखा संयोजकांनी, कोषाध्यक्षांनी जाहीर करायला हवा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही विषयावर, मग तो राजकीय असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. ही मतं व्यक्त करताना जसे एकीकडे संयम बाळगणे गरजेचे आहे, आक्रस्ताळेपणाला आवर घालणे महत्त्वाचे आहे तसेच वाचणाऱयाने, पाहणाऱयाने, ऐकणाऱयानेदेखील संयमित राहणे, त्या वेगळय़ा मतांचा, न पटले तरी आदर करणे तितकेच गरजेचे आहे. साहित्य संमेलन खऱया अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर ज्याच्यासाठी आपण ते करतो त्या रसिकांचा सक्रिय सहभाग त्यात हवा. आजकाल रसिक हा फक्त बघ्याची, श्रोत्याची भूमिका घेतो. वर्गणी भरली की त्याचे काम संपते. तसे नको. रसिकांना आयोजनात, व्यवस्थापनात सहभागी करून घेतले पाहिजे.

साहित्याशी, संस्कृतीशी निगडित बरेच प्रश्न आहेत. वाचन संस्कृती कमी होतेय, टीव्ही, सोशल मीडियाच्या अतिक्रमणामुळे पुस्तकं विकत घेऊन वाचली जात नाहीत, प्रकाशित, मर्यादित संख्येची पुस्तकंदेखील खपत नाहीत, अशी तक्रार आहे. कोणे एकेकाळी आपली दैनंदिन गरज असणारी किर्लोस्कर, सत्यकथा, स्त्राr, अनुराधा, अंतर्नाद ही मासिकं बंद पडली. या मासिकांवर कुणे एकेकाळी एक पिढी वाढली, समृद्ध झाली. ही वैचारिक समृद्धी एकाएकी लोप पावण्याचे कारण काय? अनेक प्रकाशन संस्थादेखील मोडकळीला आल्या. ज्या तग धरून आहेत, ज्या व्यवसाय करताहेत त्यांचे मार्केटिंगचे गणित वेगळे आहे. कथा-कादंबऱयांना ‘भाव’ नाही असे सांगितले जाते. कवितासंग्रहाला तर कुणीच विचारत नाही असे बोलले जाते. तसे असेल तर मग ‘आयुष्यावर बोलू काही’ हा केवळ कवितांवर, गीतांवर आधारित कार्यक्रम इतका प्रसिद्ध, हाऊसफुल्ल कसा काय होतो? पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे यांच्या बोरकरांच्या कविता वाचनासाठी गर्दी का व्हायची? कुठे काय बदलले? याचाही शोध घेतला पाहिजे.

लेखक, प्रकाश, संपादक यांच्यातील परस्पर संबंध, आर्थिक व्यवहार यावरदेखील स्पष्ट खुली चर्चा व्हायला पाहिजे. प्रकाशक म्हणतात, पुस्तकं खपत नाहीत. लेखक म्हणतात, त्यांना योग्य मानधन मिळत नाही. म्हणजे मानही नाही, धनही नाही. उलट काही प्रकाशक लेखकांकडूनच निर्मितीचा खर्च वसूल करतात. लेखकाला आपले साहित्य कसे तरी प्रकाशित करायचे असते, प्रसिद्ध व्हायचे असते.

साहित्य संमेलनाची परंपरा फार जुनी आहे. पूर्वीची संमेलने आताच्यासारखी थाटामाटात होत नसत. साधी व्यवस्था, निवासाची सोय हॉटेलमध्ये नव्हे तर शाळेत किंवा कुणाच्या घरी होत असे. अध्यक्षांशी भाषणे गाजत. त्यात मुद्दे असत. विचार असे. आता हळूहळू सगळे पंचतारांकित झाले.

संमेलनात एकीकडे पुस्तकांच्या विक्रीचे मोठमोठे आकडे घोषित केले जातात. दुसरीकडे पुस्तके विकलीच जात नाहीत अशीही तक्रार. यात नेमके खरे काय, खोटे काय कोण जाणे. खरे तर प्रकाशकांच्या दालनात या संमेलनाच्या निमित्ताने लेखकाने उपस्थित राहावे. वाचकांशी परस्पर डायरेक्ट संवाद साधावा. त्याला नेमके काय हवे, काय वाचायला आवडेल हे जाणून घ्यावे. म्हणजे लेखक रसिकांच्या आवडीनुसार टेलर मेड लिहिणार नाही हे जरी खरे, तरी लेखकाला समाजाची नस पकडणे गरजेचे आहे. वाचकाला वाचायला काय आवडते, आवडेल हे जाणून घेणे गरजेचे आहे.

n नुकत्याच झालेल्या श्रीलंका सहलीत तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांत एका साहित्य समारंभाबद्दल वाचायला मिळाले. श्रीलंकेत ए. के. लिटरेचर फेस्टिव्हल 2015 सालापासून साजरा होतो. अन्नासी अन् कडालगोटू यांच्या पुढाकाराने श्रीलंकेतील स्थानिक लेखक, कवी, कलाकारांना एकत्र आणून व्यक्त होण्यासाठी मुक्त व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने सुरू झालेल्या साहित्यिक चळवळीचे हे चौथे वर्ष. या सोहळय़ाचे कार्यक्रम, त्यांची उद्दिष्टय़े, त्यांचे नियोजन हे सारे नावीन्यपूर्ण वाटले, प्रशंसनीय वाटले. या साहित्य सोहळय़ाचे उद्दिष्टय़ साधे आहे. स्थानिक लेखक, प्रकाशक, कलाकार यांना श्रीलंकेच्या सांस्कृतिक प्रवाहात सामावून घेणे, त्यांना तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्या समस्यांवर सामंजस्याने, चर्चेने उपाय शोधणे, नव्या तंत्रज्ञानाची, नव्या बदलाची, नव्या प्रवाहाची, भविष्यकालीन विषयांची त्यांना ओळख अन् जाणीव करून देणे. या संमेलनाची फी फक्त 100 रुपये. (आपल्या हिशेबात फक्त 50 रुपये) इतकी कमी असते. त्यामुळे कुणाही इच्छुकाला त्यात सहजासहजी सहभागी होता येते. या वर्षीच्या सत्रात साहित्य अन् प्रशासन, साहित्य अन् राजकारण, दिव्यांगांचे लेखन, सायन्स फिक्शन, डिजिटल मीडियासाठी लेखन, महिला साहित्यिक, कथेमागची कथा, डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर, ब्लॉग लेखन असे बहुविध, बहुरंगी विषय चर्चेला होते. त्याशिवाय या सोहळय़ात नवोदितांच्या प्रस्थापितांच्या पुस्तकांचे प्रकाशनदेखील मान्यवरांच्या हस्ते केले जाते. त्यामुळे वाचकांना नव्या साहित्याची, साहित्यिकांची ओळख होते. सामान्य रसिकदेखील साहित्याच्या प्रवाहात लेखकाबरोबरचा प्रवासी होतो. आपल्याकडील साहित्य संमेलनात चर्चासत्रांऐवजी हे असे वर्कशॉप्स कधी आयोजित केले जातील. चर्चासत्रात फक्त वक्तेच बोलतात. वर्कशॉपमध्ये श्रोत्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. वर्कशॉपमध्ये कृती अन् परस्पर देवाणघेवाण अपेक्षित असते.

आपली प्रतिक्रिया द्या