कुंभारगल्लीचे स्वामी

>> विवेक दिगंबर वैद्य

श्री कृष्ण सरस्वतींच्या अवतारमाहात्म्याचा परिचय कोल्हापूरवासीयांना जसजसा होत गेला तसतशी त्यांच्या अवतीभवती दर्शनार्थींची गर्दी वाढती झाली. या भक्तमंडळींमधील फडणवीस नावाचे एक भक्त मात्र भाग्यवान ठरले कारण त्यांच्या इच्छेला मान देऊन श्रीकृष्ण सरस्वतींनी काही दिवस त्यांच्या घरी मुक्काम केला. फडणवीसांच्या पत्नीला मात्र श्रीकृष्ण सरस्वतींविषयी फारशी आस्था नव्हती. त्यातच एके दिवशी फडणवीसांचे एकुलते एक लहान मूल दगावले. हे अशुभ घटीत श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या येण्यामुळेच ओढावले आहे असा फडणवीसांच्या पत्नीचा गैरसमज झाला तेव्हा महाराज तिथून निघाले. पुढे कालांतराने महाराजांच्याच कृपेने फडणवीसांची वंशवेल बहरून आली आणि त्यांच्या पत्नीचा महाराजांविषयीचा गैरसमजदेखील निकाली निघाला.

फडणवीसांच्या घरातून निघालेले महाराज, त्यांच्या दर्शनार्थ आलेल्या म्हैसाळकर नामक भक्ताचा हात धरून त्यांच्या सोबत निघाले. ही संधी योग्य आहे असे मनाशी ठरवून म्हैसाळकरांनी लागलीच महाराजांना आपल्या घरी ‘म्हैसाळ’ येथे मुक्कामास येण्याची विनंती केली तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती महाराजांनी त्यास ‘करवीर येथे एक काम आहे ते करून तुझ्या घरी येऊ’ असे सांगितले.

महाराज म्हैसाळकरांसोबत कोल्हापुरातील कुंभारगल्ली परिसरात आले आणि तेथे राहणाऱया ताराबाई शिर्के यांच्या दरवाजात आगंतुकासारखे उभे राहून ‘आई मी आलो. आई, मला जेवायला वाढ.’ असे मोठमोठय़ाने ओरडू लागले. अपरिचित आवाज कानावर पडल्याने अचंबित झालेल्या ताराबाई बाहेर आल्या तेव्हा दाराच्या चौकटीवर उभे असलेले महाराज त्यांना दिसले. महाराजांचा लहानखुऱया चणीचा विलक्षण तेजस्वी देह आणि त्यांच्या चेहऱयावरील बालसुलभ निरागसता पाहून ताराबाईंच्या मनांत वात्सल्यभाव निर्माण झाले.

‘हा कुणीतरी दैवी अंश आहे’ याची नोंद ताराबाईंनी नकळत घेतली तोवर महाराजांनी त्यांचा हात धरून त्यांच्यापाशी जेवण देण्याचा आग्रह धरला. त्यांच्या वागण्यातील निर्मळता ताराबाईंना भावली, परंतु आपल्यासारख्या सामान्य स्त्राrने या तेजस्वी बालमूर्तीला शिजवलेले अन्न द्यावे त्यांना प्रशस्त वाटले नाही. असे असले तरीही दरवाजात अतिथीरूपाने आलेल्या पाहुण्यास निदान कोरडा शिधा तरी द्यावा या हेतूने त्या स्वयंपाकघराकडे वळल्या तोवर इथे महाराजांनी विचित्र लीला केली. म्हैसाळकरांचा हात धरून ते जलदगतीने तेथून निघाले आणि म्हैसाळकरांच्या गावी पोहोचले. श्रीकृष्ण सरस्वतींच्या आगमनाने म्हैसाळकर कुटुंबीय आनंदित झाले,पुढे बरेच दिवस महाराजांनी ‘म्हैसाळ’ येथेच मुक्काम केला.

इथे कोल्हापुरात कुंभारगल्लीमध्ये मात्र विचित्र परिस्थिती उद्भवली. महाराजांना शिधा देण्यासाठी घरात गेलेल्या ताराबाई कोरडा शिधा घेऊन परतल्या तेव्हा दरवाजासमोर कुणीही नव्हते. त्यांनी आजूबाजूस पाहिले, सर्वत्र शोध घेतला मात्र बाल्यभाव जागवणारी ती बटूमूर्ती त्यांना कुठेही दिसली नाही. अतिथी रिकाम्या हाताने निघून गेल्याचे ताराबाईंना जाणवले आणि त्यांना अपार दुःख झाले. त्यांच्या समोरून महाराजांचे रूप काही केल्या जाईना. त्यांना नजरेसमोर महाराजांची निरागस मूर्ती दिसू लागली.

ताराबाई प्रखर दत्तभक्त होत्या. दर पौर्णिमेला नरसोबावाडीला जाऊन अन्नदान करण्याचा त्यांचा नेम होता. पुढे कालांतराने पौर्णिमेचा दिवस उगवला. ताराबाईंनी अन्नदानासाठी वाडीला जाण्याचे ठरविले. नेमके प्रवासात असताना त्यांचे पोटशुळाचे जुने दुखणे उद्भवले. वेदनेने तळमळत का होईना ताराबाईंनी वाडी गाठली. अन्नदान केले. पाऊल पुढे टाकवत नव्हते तरीही नित्यकर्मे आटोपली आणि जुनाट व्याधीला सोबत घेत त्या झोपी गेल्या. पोटशुळामुळे शरीर अस्वस्थ होते, घरातून विन्मुख गेलेल्या अतिथीमुळे मनही अस्वस्थ होते. पहाटे, ब्राह्ममुहूर्तावर मात्र जीवास थोडीफार शांतता लाभली तशी ताराबाई झोपी गेल्या.
ताराबाईंना झोपेत असताना स्वप्नदृष्टांत झाला, श्रीदत्तगुरू प्रकट होत त्यांना सांगते झाले, ‘अगे, आम्ही तुझ्या दारी आलो होतो परंतु आम्हांस तू जेवू घातले नाहीस. उगीच शंकाकुशंका घेत कोरडा शिधा आणण्याची खटपट करीत राहिलीस. आम्हांस तुझ्या घरी घेऊन जा, आम्ही म्हैसाळ येथे आहोत आणि यापुढे तुला येथे येण्याची गरज नाही. घरी राहूनच सेवा करीत राहा.’

अनपेक्षितपणे घडलेल्या दृष्टांतलाभामुळे आनंदित झालेल्या ताराबाईंनी पहाटे उठून लागलीच श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले, वाडीतील नित्योपचार आटोपले अन् त्या म्हैसाळ येथे आल्या. गावामध्ये येताच त्यांनी म्हैसाळकरांचे घर गाठले तेव्हा श्रीकृष्ण सरस्वती त्यांना हसतहसत सामोरे गेले. ताराबाईंनी आधीच्या प्रसंगाबद्दल माफी मागितली तेव्हा महाराजांनी आनंदाने ताराबाईंचे दोन्ही हात आपल्या ओंजळीत धरले आणि त्यांना म्हणाले, “आई… आई… मी आता तुझ्या घरी येतो.’’

बालोन्मत्तपिशाच्च वृत्ती धारण केलेले हे श्रीदत्तात्रयांचे जाज्वल्य अवधूतरूप ताराबाईंचे बोट धरून कुंभारगल्लीस परतले. ‘तारा सदन’चा उंबरठा ओलांडून घरात प्रवेश करणारे श्रीकृष्ण सरस्वती आपल्या देहाची समाप्तीसुद्धा तेथेच करते झाले. या संपूर्ण कालावधीमध्ये ताराबाईंनी महाराजांची काळजी वाहिली. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत, महाराजांना न्हाऊमाखू घालण्यापासून जेवण भरविण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार ताराबाईंनी आईच्या मायेने केले. माऊलीस्वरूप होऊन जगाचा सांभाळ करणाऱया श्रीकृष्ण सरस्वतींनी स्वतःचा प्रतिपाळ करण्यासाठी मात्र ताराबाईंच्या कुशीत विसावा घ्यावा यातच ताराबाईंचे मोठेपण आणि श्रेष्ठत्व सामावलेले आहे.

‘कुंभारगल्लीचे स्वामी’ म्हणूनही परिचित असलेले श्रीकृष्ण सरस्वती साक्षात दत्तावतार आहेत तसेच त्यांचा उल्लेख सर्वत्र ‘श्रीदत्तमहाराज’ म्हणूनच केला जातो. त्या काळातील अनेक तत्कालीन संतश्रेष्ठांशी श्रीकृष्ण सरस्वतींचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. श्रीरांगोळी महाराज, श्रीनामदेवमहाराज चव्हाण, श्रीबालानंद, श्रीनीळकंठ, श्रीबालमुकूंद यांसारखे अधिकारी सत्पुरुष आणि कृष्णा लाड, दळवी, कृष्णा स्वार, वेणीमाधव यांसारखे अंतरंगातील भक्त ही श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची ‘संचित ठेव’ आहे.

कै. गणेश मुजुमदार आणि बाळासाहेब शिर्केलिखित चरित्र ग्रंथांनी अजरामर केलेले श्रीकृष्ण सरस्वतींचे अलौकिक अवतारकार्य 20 ऑगस्ट 1900 रोजी लौकिकार्थाने पूर्ण झाले असले तरीही कुंभारगल्लीच्या ‘तारासदन’मध्ये अजूनही ते समाधीरूपाने जागृत आहे.

[email protected]