रामकृष्णनाथा

1

>>विवेक दिगंबर वैद्य

‘श्रीस्वामी समर्थ’ संप्रदायातील मुंबईस्थित सिद्धसत्पुरुष श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांची ओळख करून देणारा लेख.

दूरवर क्षितिजापाशी विलीन होऊ पाहणारा शांत अथांग समुद्र मात्र किनाऱयापाशी कधी अवखळ तर कधी आवेगाने धडकणारा लाटांचा कल्लोळ यांना नीरव शांततेचा छेद देणारी वास्तू दादरच्या शिवाजी पार्क येथे वर्षानुवर्षे उभी आहे आणि ‘रामकृष्णनाथा… दयासागरा कृपा करा… दयासागरा कृपा करा’ असे आर्जव करीत इथे समाधिस्थ झालेल्या सिद्धसत्पुरुषाच्या अस्तित्वाच्या चैतन्यखुणा जागवीत आहे.

मुंबादेवीच्या कृपेने, अष्टौप्रहर धावपळीत गुंतलेल्या मुंबई नगरीस अनेक सिद्धसत्पुरुषांचा सहवास घडला. श्रीस्वामीसमर्थांच्या मुंबापुरी गादीचा झेंडा श्रीस्वामीसुतांनी रोवल्यानंतर श्रीतात महाराज, श्रीआनंदनाथ, श्रीबाळकृष्ण महाराज (सुरतकर), श्रीमयुरानंद यांच्यासोबतच श्रीजांभेकर महाराजांनी त्यास डौलाने फडकत ठेवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि लक्षणीयरीत्या निभावली.

सन 1930 च्या मध्यात मुंबईतील प्रभादेवी परिसरामध्ये श्रीरामकृष्ण महाराज जांभेकर यांचे आगमन झाले. शिर्डीच्या श्रीसाईबाबांना ‘पितृस्थानी’ मानणाऱया आणि अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थांचा ‘माझे आजोबा’ असा उल्लेख करणाऱया श्रीजांभेकर महाराजांचे वास्तव्य येथे केवळ दहा वर्षेच घडले. मात्र ही दहा वर्षे त्यांच्या अवतारकार्याला सुवर्णझळाळी मिळवून देती झाली. सन 1898 ते 1940 असे अवघे 42 वर्षांचे लौकिक आयुष्य श्रीजांभेकर महाराजांना लाभले असले तरी त्यांच्या अवतारकार्याचा सन 1930 ते 1940 हा काळ त्यांना सिद्धसत्पुरुष ही बिरुदावली मिळवून देता झाला. श्रीसाई व श्रीस्वामी समर्थांची परंपरा सांगणाऱया आणि 10 जानेवारी 1940 रोजी देह विसर्जित करणाऱया श्रीजांभेकर महाराज या सिद्ध-अवलियाच्या अवतारसामर्थ्याचा डंका त्याकाळी अवघ्या मुंबापुरीत दुमदुमत होता.

कोकण प्रांतातील राजापूर येथील पोंबुर्ले गावचे अंताजी आणि मोरेश्वर जांभेकर हे दोघे बंधू पुण्याच्या ‘दत्तप्रसाद’ नाटक कंपनीमध्ये काम करीत असत. त्याकाळी बऱयापैकी लोकप्रिय असणारी ही नाटक कंपनी गावोगावी रामलीलेचा खेळ करीत एकदा महाराष्ट्राची वेस ओलांडून ‘मिरत’ येथे पोहोचली, मात्र दुर्दैवाने, दौऱयावर असताना कंपनीतील काही मंडळींमध्ये बेबनाव झाला आणि याचे फलित कंपनी चालवणारी प्रमुख मंडळी अर्ध्या रस्त्यावरून माघारी परतली. निर्नायकी अवस्थेत पोहोचलेल्या ‘दत्तप्रसाद’ नाटक कंपनीतील प्रत्येकजण स्वतःचा जीव जगविण्यासाठी इथेतिथे फिरू लागला. गाठीशी असलेल्या तुटपुंज्या पैशात माघारी कसे पोहोचणार? या विवंचनेत अंताजी व मोरेश्वर यांनी मिरत येथेच राहून रोजगार शोधण्याचे ठरविले. मोरेश्वर संस्कृत भाषेचे गाढे विद्वान असल्यामुळे त्यांना तेथील ‘गवालमंडी’ परिसरातील एका मंदिरात पौरोहित्य करण्याचे काम मिळाले शिवाय काही दिवसांतच त्यांच्याकडे गावातील संस्कृत पाठशाळेचे प्राचार्यपदही चालून आले. व्यवहारकुशल तरीही गृहस्थाश्रमाचे आकर्षण नसलेल्या मोरेश्वरांनी बंधू अंताजींसोबत मिरत येथे व्यवस्थित जम बसवला.

मोरेश्वरबुवांनी अंताजींचा विवाह योग्य वेळी करण्यातही पुढाकार घेतला. नारायणराव बोरवणकर, मुंबई यांची कन्या द्वारकाबाई हिच्या सोबत विवाह झाल्यावर अंताजी यांना राजेश्वरी, बनूताई, कृष्णा, गंगा, नर्मदा, यमुना अशा सहा मुली आणि भगवान, रामकृष्ण, शिवराम, विष्णू ही चार मुले अशी दहा अपत्ये झाली. 1898 साली माहेरी, मुंबई येथे बंधू श्रीराम बोरवणकर यांच्या घरी (गोरेगावकर बिल्डिंग, गिरगाव) मुक्कामास असणाऱया द्वारकाबाईंच्या पोटी जे पुत्ररत्न निपजले तेच पुढे श्रीरामकृष्ण महाराज म्हणून नावारूपाला आले.

सर्व भगिनी वयात येताच यथायोग्य रीतीने लग्न करून संसार थाटता झाल्या, मात्र दुर्दैवाने चारही मुलांचा बहरलेला संसार पाहणे माता व पित्याच्या नशिबी नव्हते. वडीलबंधू भगवान योगाभ्यासी होते. त्यांचे विवाहबंधन अल्पजीवी ठरले, कारण अवघ्या वर्षभरातच आकस्मिक मृत्यूमुळे त्यांचा प्रपंच कोमेजला. कनिष्ठ बंधू शिवराम रेल्वेच्या नोकरीत असल्यामुळे आणि त्यांचे वास्तव्य सतत गुजराथ, पंजाब येथे झाल्यामुळे त्यांचा सहवास जांभेकर कुटुंबाला लाभला नाही. त्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारले आणि नोकरी पूर्ण केल्यावर अखेर संन्यास घेतला. धाकटे बंधू विष्णुपंत मुंबईस सीताराम मिलमध्ये नोकरीस होते. त्यांनीदेखील ब्रह्मचर्यव्रत स्वीकारले व आयुष्याच्या अखेरपर्यंतचा काळ परमेश्वराच्या नामस्मरणात घालवला. तिन्ही मुलांच्या नशिबी संसारसुख नाही हे लक्षात आल्यावर धास्तावलेल्या अंताजी अन् द्वारकाबाईंनी रामकृष्णापाठी लग्न करण्याचा तगादा लावला. त्यांच्या सततच्या आग्रहामुळे आणि आप्तेष्टांच्या रदबदलीला कंटाळून अखेरीस रामकृष्ण बोहल्यावर उभे राहण्यास तयार झाले आणि आगाशी, ठाणे येथील पाध्येंची कन्या जांभेकरांच्या घरात सून म्हणून दाखल झाली.

रामकृष्णांच्या भावी आयुष्यात उलथापालथ करणारे अनेक प्रसंग येऊ घातले होते, मात्र त्यास जाणून घेण्याआधी त्यांच्या पूर्वायुष्याकडे वळूया. रामकृष्ण यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे मामा, श्रीराम बोरवणकर यांच्या घरी झाला. मामा कुर्ला मिलमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर नोकरीस होते. गाठीशी अपार सधनता असली तरी त्यांना संसारसुख लाभले नाही. विवाहानंतर काही दिवसांतच त्यांची पत्नी निवर्तली आणि मामांची मुलाबाळांना खेळविण्याची इच्छा अपूर्णच राहिली. अपत्यसुखापासून वंचित राहिलेल्या श्रीराममामांनी ही कसर बहिणीच्या मुलांवर विलक्षण माया करीत भरून काढली. त्यांच्या घरी जन्मलेल्या रामकृष्णाविषयी मनात अपार आत्मियता असल्यामुळे त्यांनी त्याचे इंग्रजी शिक्षणदेखील जवळच्याच आर्यन हायस्कूलमध्ये केले. दरम्यान, मौंजीबंधन झाल्यावर गुरुमुखातून गायत्री मंत्र लाभलेल्या छोटय़ा रामकृष्णावर त्या दिव्यमंत्राची जणू मोहिनी पसरली. अष्टौप्रहर त्याच्या मुखात सतत गायत्री मंत्राची आवर्तने चालत असत. या मंत्रांची नादमयता त्याच्यावर नकळत रुंजी घालू लागली आणि या पावन मंत्राच्या दिव्यप्रभावामुळे त्याच्यातील व्यक्तित्वाचा पूर्णतः पालट झाला.

दरम्यान, सेवानिवृत्त झाल्यामुळे श्रीराममामांनी त्यांच्या बलसाड येथे असलेल्या बंधूंच्या शिफारशीनुसार सुरत येथे राहाण्याचे ठरविले आणि तेथे त्यांनी स्वस्त दराने जमीन विकत घेतली. नाना मसाणिया वाडी नावाने ओळखला जाणारा हा परिसर पूर्वी एका स्मशानाचा भाग होता. येथे मामांनी घर बांधले आणि तेथे आपल्या सोबत राहण्यासाठी बहिणीला व तिच्या कुटुंबाला मिरतहून बोलावून आणले.

दरम्यान, नोकरी करण्यापुरते जुजबी शिक्षण घेतलेले रामकृष्ण पारडी (सुरत) येथे ‘पोस्टमन’ म्हणून रुजू झाले असले तरीही अंगभूत हुशारीच्या जोरावर पदोन्नती घेत ‘ब्रँच पोस्टमास्तर’ पदापर्यंत चढले. याच काळात रामकृष्णांचे लग्न झाले, मुलगी झाली त्यामुळे, वरकरणी त्यांचा संसार ‘सुखाचा’ असल्याचे आप्तजनांना वाटत असले तरीही नियतीच्या मनात काहीतरी भलतेच दडले होते. (पूर्वार्ध)

[email protected]