श्रीकृष्ण सरस्वती

>>विवेक दिगंबर वैद्य

5 सप्टेंबर रोजी 118 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने केलेला त्यांचा आठव.

कुलदैवत श्रीखंडेरायाने मूळ रूपात, साक्षात् शिवरूपात प्रकट होऊन पुढील वाटचालीविषयी बोध केल्याने समाधान पावलेला श्रीकृष्ण त्याच्या नांदणी गावी परतला. कृष्णबाळाच्या मुखावरील अपार तेज पाहून मातापिता चकित झाले. श्रीकृष्णाने घडलेला समग्र वृत्तांत कानी घातला त्यास ऐकून मायबाप कृतार्थ झाले असले तरीही कृष्णबाळ श्रीगुरुदर्शनार्थ पुन्हा एकदा घराबाहेर निघणार असल्याचे समजल्यावर ते चिंतित झाले, कासावीस झाले. मात्र श्रीकृष्णाने त्याच्या मातेस, ‘तुम्ही चिंता करू नका. श्रीदत्तमहाराजांवर श्रद्धा ठेवून निश्चिंत राहा. मी योग्य वेळी तुम्हाला भेटावयास येईन.’ असे निःसंदिग्ध वचन दिले आणि तो अक्कलकोटास प्रयाण करता झाला. अप्पाभटजी आणि अन्नपूर्णाबाई या उभयतांनी आपल्या या जगावेगळय़ा बालकास साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला.

मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीकृष्णाने नांदणीहून प्रयाण केले. सतत तीन दिवस, तीन रात्र अथक आणि अविश्रांत पायपीट करून श्रीकृष्णाने अक्कलकोट नगरीची थोरली वेस ओलांडली. अक्कलकोट नगरीत तो पहिल्यांदाच येत असला तरीही अक्कलकोटमधील काही मूठभर मंडळींना त्याच्या आगमनाचे वृत्त आधीच समजले होते. प्रज्ञापुरीत प्रकटलेले, मनुष्यदेहात सामावलेले आणि ‘श्रीस्वामी समर्थ’ ही नाममुद्रा धारण केलेले ‘परमेश’तत्त्व, त्यादिवशी पहाटेपासून, ‘माझा कृष्णा येणार. आज माझा कृष्णा येणार’ असा घोषा लावत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अत्यानंदाने श्रीकृष्णाच्या आगमनाविषयी सूचित करीत होते. श्रीस्वामी समर्थ महाराजांचा वात्सल्याने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून त्यांचे भक्तगणदेखील त्या अनामिकाच्या येण्याविषयी आतुर झाले होते.

श्रीकृष्ण श्रीस्वामी दरबारात पोहोचला. त्यास समोर उभे पाहताच श्रीस्वामीरायांनी दोन्ही हात पसरून त्याचे स्वागत केले. श्रीकृष्ण लगबगीने त्याच्यापाशी गेला तोच श्रीस्वामी समर्थांनी त्यास प्रेमाने जवळ घेत पोटाशी कवटाळले. श्रीकृष्ण गहिवरला, त्याचा कंठ दाटून आला. श्रीस्वामीरायांनी कृष्णबाळाच्या गालावरून, पाठीवरून हात फिरवीत त्याच्यावर मायेचा अपार वर्षाव केला. त्याच्या दोन्ही गालांचे वारंवार मुके घेतले. हे दृश्य पाहून तेथील भक्तमंडळींनी ‘हा नक्कीच कुणीतरी अवतारी सत्पुरुष आहे’ याची नोंद घेतली. एवढय़ात अचानक श्रीस्वामी समर्थ उठले आणि श्रीकृष्णाचा हात धरून तेथून निघाले. अवचितपणे घडलेला हा प्रकार पाहून क्षणभर गोंधळलेली भक्तमंडळी भानावर आली तोवर श्रीस्वामीराय श्रीकृष्णासह तिथून वायुवेगाने दूर जात दिसेनासे झाले.

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटपासून बऱयाच दूरवर, विस्तीर्ण व घनदाट वृक्षांनी व्यापलेल्या एकांतस्थळी श्रीकृष्णास आणले आणि तेथील एका सपाट कातळावर ते बसले. लागलीच श्रीस्वामीचरणी लोटांगण घालून श्रीकृष्ण त्यांची अपरंपार स्तुती करता झाला. श्रीस्वामीरायांची मनोभावे प्रार्थना करून त्याने ‘आपल्यावर पूर्ण कृपा करावी’ अशी त्यास विनंती केली. त्यावर श्रीस्वामी म्हणाले, “बाळ, तू अन् आम्ही काही वेगळे नाही. तू माझाच अंश आहेस. अनादी अनंत अशी ही श्रीगुरुपरंपरा पुढे नेण्यासाठी तू जन्म घेतला आहेस तेव्हा काही काळ मजपाशी राहावे. तद्नंतर पुढील कार्य करण्याच्या हेतूने तू करवीरक्षेत्री जावे आणि अवधूतस्वरूप धारण करून तेथे जगदुद्धाराचे कार्य करावे. या कारणे मूळ रूप त्यागून बालोन्मतपिशाच्च वृत्ती धारण करणे योग्य ठरेल. तुझा अवतार विशिष्ट कार्यासाठी झाला आहे बरे!’’

श्रीस्वामी समर्थ महाराजांनी अतिशय वात्सल्याने श्रीकृष्णाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला आणि ते म्हणाले, “आम्ही आमचेच तत्त्व आपल्यामध्ये पाहतो आहोत, आम्ही तुम्हांस अधिकारपद देत आहोत, आजपासून आपली ओळख सर्वत्र सर्वदूर ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या नावाने होईल.’’ श्रीस्वामीरायांचा स्पर्श बुद्धिग्रामास घडताच श्रीकृष्ण भावसमाधीत दंग झाला. त्या दिव्य भावावस्थेत असतानाच त्यास श्रीस्वामीरायांनी नियोजित अवतारकार्याचे रहस्य आणि प्रयोजनाविषयी अवगत केले. यात बराचसा काळ सरला. त्यानंतर समाधीवस्थेचा परमानंद लुटणारा श्रीकृष्ण जागृतावस्थेत आला तेव्हा ‘श्रीकृष्ण सरस्वती’ या संबोधनाचे वलय त्याच्या सभोवती दिमाखाने विलसत होते.

या घटनेनंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांनी श्रीकृष्ण सरस्वतींसह पुन्हा अक्कलकोटात येणे केले. तेथे काही दिवस श्रीकृष्ण सरस्वतींचे राहणे झाले. एकेदिवशी श्रीस्वामीरायांनी भक्तमंडळींना सांगून श्रीकृष्ण सरस्वतींकरिता पंचपक्वान्ने तयार करविली, मोठा समारंभ घडवून आणला आणि आनंदाचा सोहळा घडवीत श्रीकृष्ण सरस्वतींना आपल्यासोबत बसवून जेऊखाऊ घातले. अशातच काही दिवस गेले. या अवधीत श्रीकृष्ण सरस्वतींनी श्रीस्वामीमाऊलींचे वात्सल्यसुख पुरेपूर अनुभवले.

एकेदिवशी गाणगापुरास गेलेला कुणी एक कुष्ठरोगी ब्राह्मण श्रीदत्तप्रभूंच्या दृष्टांत सूचनेनुसार अक्कलकोटी आला. श्रीस्वामीमहाराजांच्या चरणांशी लोळून त्याने त्याच्या त्या असाध्य रोगातून मुक्त करण्याची विनंती श्रीस्वामींपाशी केली. तेव्हा श्रीस्वामीरायांनी त्यांच्या शेजारीच बसलेल्या श्रीकृष्ण सरस्वतींकडे बोट दाखवून त्या कुष्ठरोग्यास “अरे, आता तू या श्रीकृष्णगुरूंसमवेत करवीर (कोल्हापूर) येथे जाऊन त्यांचीच सेवा कर म्हणजे तुझे कुष्ठ नाहीसे होईल.’’ असे सांगितले. श्रीस्वामीरायांचे हे बोलणे ऐकून कुष्ठरोगाने त्रस्त झालेला तो ब्राह्मण श्रीकृष्ण सरस्वतींकडे जाण्यास कां कू करू लागला. हे पाहून श्रीस्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणास आपल्यापाशी बोलावून त्यास श्रीकृष्ण सरस्वतींचा महिमा व श्रेष्ठत्व सांगितला. इतकेच नाही तर ‘श्रीकृष्ण सरस्वती यांच्या रूपाने साक्षात श्रीदत्त महाराज करवीर क्षेत्रामधील त्यांच्या अवतारकार्याला प्रारंभ करणार आहेत.’ असे सांगून आश्वस्तदेखील केले.

श्रीस्वामी समर्थ महाराजांचा ‘खडावा’रूपी कृपाप्रसाद घेऊन श्रीकृष्ण सरस्वती करवीरग्रामी (कोल्हापूर) परतले. श्रीगुरू श्रीस्वामीमहाराज यांचा उल्लेख श्रीकृष्ण सरस्वती अखेरपावेतो ‘मालक’ या संबोधनाने करीत असत. अक्कलकोटहून कोल्हापुरास येते वेळी त्यांच्यासोबत तो कुष्ठरोगी भक्तदेखील होता. या परतीच्या प्रवासात श्रीकृष्ण सरस्वती यांनी काही अद्भुत आणि अतार्किक लीला दाखविल्याने कुष्ठरोगी ब्राह्मणाचा श्रीकृष्ण सरस्वतींबद्दलचा आदर आणि आत्मियता कित्येक पटींनी वाढली.

करवीरनगरीचे आद्य दैवत, श्रीमहालक्ष्मी आईसाहेबांच्या मंदिर परिसरातील ओवरीमध्ये श्रीकृष्ण सरस्वतींनी मुक्काम केला. येथे येता क्षणीच त्यांनी अनेक भाविकांना संकटमुक्त केले त्यात अक्कलकोटहून आलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाचा देखील समावेश होता.

[email protected]
विवेक दिगंबर वैद्य