मुद्दा : मुंबईला गरज पर्यायी व्यवस्थेची

4

>> दादासाहेब येंधे, [email protected]

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांमधील अपुऱया पाणीसाठय़ामुळे तलावांमधील पिण्याचे पाणी संपत चालले असून मुंबईकरांना दरवर्षी उन्हाळ्यात पाऊस पडेपर्यंत पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. झोपडपट्टीतून जलवाहिन्या फोडून पाणीचोरी केली जाते. अनधिकृत बांधकामे, भूमाफियांकडूनही पाण्याची राजरोसपणे चोरी सुरू आहे. चाळी व आरसीसी बांधकामांना लागणारे पाणी पालिकेच्या अधिकृत जलवाहिनीतून चोरून घेतले जाते. करदात्या नागरिकांना पाणीटंचाईमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. परिणामी, पाणीटंचाईला त्यांना सामोरे जावे लागते.

पाणीचोरीकडे महापालिका अधिकारी लक्ष न देता भाडेकरूंना पाणी बिलात वाढ करून दिली जाते. मोठी थकबाकी असलेल्यांना सवलत दिली जाते. फेरीवाले झोपडपट्टीत राहणारे पाण्याची लाइन फोडून पाण्याची चोरी करतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर पाइपलाइन खोदून बेकायदेशीर नळजोडणी घेतली जाते. पाणी खात्याच्या अधिकाऱयांनी पाणीचोरी व रस्त्यावर होणाऱया पिण्याच्या पाण्याची गळती रोखण्याकरिता 24 तास लक्ष घालणे गरजेचे आहे.

मुंबई महानगरपालिकेकडे धरणांशिवाय पिण्याच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था मुंबईकरांकरिता नाही. मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे साडेतीन हजार विहिरी असल्याचा अनेक क्षेत्रात काम करणाऱया अभ्यासकांचा अंदाज आहे. वाढत्या विकासामुळे शहर आणि उपनगरांतील विहिरींवर अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी विहिरी बुजवण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे त्यांचा वापर न झाल्यामुळे त्या विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे. जर विहिरींचा सातत्याने वापर होत राहिल्यास पाणी खेळते राहील. परिणामी, ते वापरण्यास योग्य राहील. एखाद्या वर्षी पाऊस खूपच कमी पडल्यास भीषण परिस्थिती ओढवेल. अशी भीषण परिस्थिती ओढण्यापूर्वी मुंबईत पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

सध्या पृथ्वीवर 97.6 टक्के पाणी समुद्राच्या रूपाने आहे. तर केवळ 2.4 टक्के गोड पाणी आहे. त्यातील फक्त पिण्यासाठी 0.52टक्के एवढेच पाणी उपलब्ध आहे. निसर्गाचा ऱहास करण्याचे हे परिणाम आपल्याला भोगलेच पाहिजेत. काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे व त्यामुळे पिण्यायोग्य पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. झोपडपट्टय़ा आणि उंच टॉवर यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना बंधनकारक करणे गरजेचे आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पाणीकपात करणे हे तात्पुरते उपाय आहेत. मुंबई महापालिका दीर्घकालीन नियोजनाऐवजी तात्पुरत्या उपायांना प्राधान्य देते. लोकसंख्येचा विचार केला असता पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहराला भविष्यातील धोका ओळखून समुद्राचे पाणी गोड करण्याचे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली पाहिजे. पावसावर अवलंबून न राहता मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी समुद्री पाण्यातील क्षार काढून ते पाणी मुंबईकरांना पिण्यायोग्य करून पुरविणे गरजेचे आहे. आखाती देशातून समुद्राचे पाणी गोड करून वापरले जाते. त्याच धर्तीवर उशीर होण्यापूर्वीच आपल्याकडेही तसे प्रकल्प उभे करण्याची नितांत गरज आहे.