ठसा : कुलदीप नय्यर

कुलदीप नय्यर, ज्येष्ठ पत्रकार

एक धडाडीचा निर्भीड पत्रकार आणि हाडाचा कार्यकर्ता अशीच ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांची ओळख होती. ‘सेक्युलॅरिझम’ हा आपल्या देशात दांभिकतेचा आणि टिंगलटवाळीचा विषय ठरत असला तरी या विचारधारेशी प्रामाणिक राहून अत्यंत निर्भीडपणे ही बांधिलकी जाहीरपणे जपणारी जी व्यक्तिमत्त्वे आपल्या देशात आहेत त्यात कुलदीप नय्यर यांचा क्रमांक वरचा लागेल. त्यांनी शेवटपर्यंत विचारांशी कधी तडजोड केली नाही. सेक्युलॅरिझम हा त्यांचा इतर अनेकांप्रमाणे मुखवटा नव्हता. तो त्यांनी अंगीकारलेला विचार होता. त्यामुळे हिंदुत्व, हिंदुत्ववादी यावर त्यांनी लिखाणातून कायम कठोर टीका केली. त्यांच्यावरही त्यामुळे अनेकदा टीका झाली, पण त्यामुळे त्यांची वैचारिक बांधिलकी कमी झाली नाही. अर्थात, त्यांचा निधर्मीवाद हा इतर अनेकांसारखा काँग्रेसधार्जिणा नव्हता. बरीच धर्मनिरपेक्ष, समाजवादी किंवा अगदी डाव्या विचारसरणीची मंडळीही अनेकदा केवळ हिंदुत्वाला विरोध म्हणून काँग्रेसला पूरक अशा अप्रत्यक्ष राजकीय पूरक भूमिका घेताना दिसतात. कुलदीप नय्यर हे अशा मंडळींपैकी नव्हते. आणीबाणीला त्यांनी केलेला सक्रिय विरोध आजही अनेकांच्या स्मरणात असेल. त्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. पत्रकारिता करताना त्यांनी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धी आणि वैचारिक बांधिलकीशी कधी प्रतारणा केली नाही. त्यामुळेच इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविरोधात आवाज उठविणाऱ्या नय्यर यांनी आताच्या मोदी राजवटीची तुलनाही ‘त्या’ आणीबाणीशी केली होती. देशातील माध्यमांच्या सद्यस्थितीवरून आपण हे मत नोंदवत आहोत, असेही त्यांनी परखडपणे सांगितले होते. अर्थात, त्यांचा निधर्मीवाद किंवा हिंदुत्वविरोध यात कोणताही स्वार्थ, राजकारण नव्हते. तो निव्वळ वैचारिक बांधिलकीशी असलेला ‘प्रामाणिकपणा’ होता. त्यामुळेच त्यांच्या राजकीय आणि वैचारिक विरोधकांनाही त्यांच्यातील पत्रकार, विचारवंत, कार्यकर्ता याबाबत नेहमीच आदर वाटत राहिला. आपल्या प्रदीर्घ पत्रकारिता आणि सामाजिक कारकीर्दीत कुलदीप नय्यर यांनी शांतता, मानवाधिकार, हिंदुस्थान-पाकिस्तान परस्परसंबंध, हिंदुस्थानचे परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय प्रश्न, देशांतर्गत राजकीय परिस्थिती, पक्षीय राजकारण यावर अचूक भाष्य करणारे विपुल लिखाण देश-विदेशातील मोठी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून केले. इंडिया ऍण्ड पाकिस्तान रिलेशन्स, द मॉर्टियर, द जजमेंट, वॉल ऑफ वाघा, इमरजन्सी रिटोल्ड, इंडिया आफ्टर नेहरू अशी त्यांची अनेक पुस्तके गाजली. ‘द इंडियन एक्प्रेस’चे संपादकपद भूषविलेल्या कुलदीप नय्यर काही काळ दिल्लीच्या ‘द स्टेटस्मन’चेही संपादक होते. याशिवाय द डेली स्टार, डेक्कन हेरॉल्ड, द संडे गार्डियन, ‘द न्यू ट्रिब्यून पाकिस्तान’, डॉन आदी 80 पेक्षा जास्त वृत्तपत्रांसाठी तब्बल 14 भाषांमध्ये त्यांनी अनेक वर्षे स्तंभलेखन केले. यावरूनही त्यांची पत्रकारिता, लेखन आणि व्यासंग याचा आवाका लक्षात येतो. त्यांचा ‘मिनिंग बिटवीन द लाइन्स’ हा स्तंभ खूप चर्चिला गेला. तो 80 पेक्षा जास्त नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाला. बांगलादेशनिर्मितीच्या वेळी झालेला रक्तरंजित हिंसाचार असो अथवा 1975 मधील आणीबाणीच्या काळातील अत्याचार, त्यांचे अत्यंत मर्मभेदी आणि काळजाला भिडणारे वृत्तांकन त्यांनी त्यावेळी केले होते. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानी निर्भीड पत्रकारितेचा एक बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.