क्षेपणास्र चाचण्या आणि प्रतिबंधक सराव

>> सनतकुमार कोल्हटकर 

[email protected]

उत्तर कोरियाने घेतलेल्या दोन क्षेपणास्त्र चाचण्यांदरम्यान ही क्षेपणास्त्र जपानवरून प्रवास करून पलीकडे तेथील समुद्रात पडली होती. त्यामुळे अशा क्षेपणास्त्र हल्ल्यांचे गांभीर्य जपानसाठी वाढले आहे हे निश्चित. घातक जिवाणू, विषाणू, विविध घातक रसायने यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी अनेकानेक प्रतिबंधक सराव यापुढे विविध देशांमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. या चाचण्यांची वारंवारता जसजशी वाढत जाईल तसतशी या सरावांची गरज लोकांना जास्त भासेल.

उत्तर कोरियाने चालवलेल्या क्षेपणास्त्र व अण्वस्त्रांच्या चाचण्यांमुळे सर्व जग अण्वस्त्रांच्या युद्धशक्यतेमुळे साशंक झाले आहे. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सत्ताधीश किम जोंग या दोन्ही नेत्यांमध्ये चढत्या भाजणीने दिल्या जाणाऱ्या धमक्या पाहता जग अणुयुद्धाच्या जवळ येऊन ठेपले असल्याचा समज होणे गैर नाही. या युद्धशक्यतेमुळे अमेरिका व जपान या दोन्ही देशांनी नुकतेच या महिन्यात त्यांच्या नागरिकांकडून काही शहरांत ‘हल्ला प्रतिबंधक सराव’ कार्यक्रम करून घेतले. न्यूयॉर्कमध्ये १६ जानेवारीला ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन’तर्फे ( रोगप्रतिबंधक आणि नियंत्रक केंद्र, अमेरिका) हा माहिती कार्यक्रम पार पडला. अण्वस्त्रहल्ला झाल्यास नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात हा कार्यक्रम होता. अर्थात याची जास्त माहिती कुठे बाहेर आली नाही; परंतु याबद्दलची सूचना नागरिकांना ‘पब्लिक हेल्थ’ वेबसाइटवरून देण्यात आली होती. या योजनेची अनेक महिन्यांपासून तयारी सुरू असल्याचे बोलले गेले. नागरिकांनी अशा काळात घेण्याची काळजी याच्याही सूचना दिल्या गेल्या. अण्वस्त्रहल्ल्यानंतर होणारा किरणोत्सर्ग ( रेडिएशन ) यापासून घेण्याची काळजी याबद्दलही सांगितले गेले. असा हल्ला होण्याची शक्यता नसली तरी एक प्रतिबंधक योजना म्हणून आपण हा कार्यक्रम करत असल्याचे सांगितले गेले.

पाठोपाठ २२ जानेवारीला जपानच्या टोकियो शहरात क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासंदर्भात सराव घेण्यात आला. क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास नागरिकांनी जमिनीखाली असलेल्या भुयारी स्थानकांमध्ये ( मेट्रो / रेल्वे ) कशा प्रकारे आश्रय घ्यावा , कोणते मास्क तोंडावर लावावेत आणि हे सर्व किती वेळात करावे याबद्दल सूचना देण्यात आल्या. क्षेपणास्त्र हल्ला होण्याबद्दल भोंगा वाजल्यानंतर किमान 10 मिनिटांचा मिळणारा अवधी लक्षात घेता पुढील पाच मिनिटे सामान्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास मिळू शकतात असेही सांगण्यात आले. अशाच प्रकारचा सराव मागील वर्षी रशियामध्येही घेण्यात आला होता. अर्थात तो मोठय़ा प्रमाणात जास्त संख्येच्या नागरिकांसाठी घेण्यात आला. हे अशा प्रकारचे युद्धप्रतिबंधक सराव विविध देशांत सुरू झाल्यामुळे ‘युद्ध’ जवळ आले की काय असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडू शकतो.

यानिमित्ताने अमेरिका, रशिया, युरोपमधील अनेक देश (स्वित्झर्लंड, फ्रान्स, नॉर्वे, जर्मनी), पूर्वेकडे जपान या देशांनी सामान्य नागरिकांसाठी जमिनीखाली बांधलेली सुरक्षित ‘बंकर्स’ (तळघरे ) चर्चेत आली आहेत. या देशांमध्ये अनेक बंकर्स तेथील सरकारतर्फे बांधण्यात आली आहेत तर काही त्या त्या देशातील अब्जाधीशांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बांधली आहेत. अण्वस्त्रहल्ल्यानंतर निर्माण होणारी कंपने व मोठे धक्के यांना तोंड देऊ शकतील अशी सुरक्षित कवचे अशा बंकर्सना लावली गेली आहेत. काही अब्जाधीशांची ही ‘बंकर्स’ जमिनीखाली अनेक मजली आहेत. जसे आपण रहिवासी जमिनीवर बांधलेल्या अनेक मजली इमारती पाहतो तशाच प्रकारच्या इमारती जमिनीखाली बांधल्या गेल्या आहेत. ही ‘बंकर्स’ (तळघरे विविध सोयींनी युक्त म्हणजे पोहण्याचा तलाव, शुद्ध हवेचे वायुविजन (व्हेंटिलेशन), धनधान्याच्या साठ्य़ाने परिपूर्ण अशी आहेत. हा साठा किती दिवसांसाठी ठेवला जातो याची माहिती उपलब्ध नाही, परंतु अशा ‘बंकर्स’चे अनेक फोटो इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. अशा बंकर्सची प्रवेशद्वारे पाहिल्यास ती शहरांपासून दूर डोंगरदऱ्यांमध्ये कशी असा प्रश्न पडू शकतो आणि तिथून आत गेल्यावर एवढी प्रचंड ‘बंकर्स’ आतमध्ये असतील यावर विश्वासच बसत नाही.
याच महिन्यात उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये हिवाळी ऑलिम्पिक्सच्या स्पर्धा अपेक्षित आहेत. या स्पर्धांमुळे या दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण निवळेल अशी अनेकांची अपेक्षा आहे. तरीही उत्तर कोरियाच्या आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे जपान अतिशय चिंताग्रस्त आहे. त्यामुळे जपानने असे प्रतिबंधक सराव सुरू केले आहेत. जपानमधील छोट्य़ा शहरांमध्ये असे सराव यापूर्वीच घेण्यात आलेले आहेत.

उत्तर कोरियाने यापूर्वी घेतलेल्या दोन क्षेपणास्त्र चाचण्यांदरम्यान ही क्षेपणास्त्र जपानवरून प्रवास करून पलीकडे तेथील समुद्रात पडली होती. त्यामुळे अशा क्षेपणास्त्र हल्ल्यांचे गांभीर्य जपानसाठी वाढले आहे हे निश्चित. घातक जिवाणू, विषाणू, विविध घातक रसायने यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी आता अनेकानेक प्रतिबंधक सराव यापुढे विविध देशांमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. या चाचण्यांची वारंवारता जसजशी वाढत जाईल तसतशी या सरावांची गरज लोकांना जास्त भासेल.