लेख : राममंदिर : काही उपाय

>> दि. मा. प्रभुदेसाई  

देशातील हिंदूंची सद्यस्थिती आज राज्यकर्त्यांच्या लोकशाहीबद्दलच्या भोंगळ कल्पनांमुळे झाली आहे. ‘सब घोडे बारा टक्के’ अशी आपल्या देशात लोकशाहीची स्थिती आपण केली आहे. फिर्यादी आणि आरोपी यांना एकाच मापाने या लोकशाहीत मोजले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अशी लोकशाही असती तर ते रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडूच शकले नसते. माझ्यासारख्या सामान्य नागरिकाच्या मते राममंदिराचा न्याय अतिशय सरळ व सोपा आहे. मुख्य मुद्दे असे

  • हिंदू धर्म, हिंदू लोक अर्थात हिंदुस्थान हजारो वर्षांपासून पृथ्वीवर सध्या जेथे आले तेथेच होते.
  • ते मूर्तिपूजक असल्यामुळे देवदेवतांची मंदिरे बांधून ते मूर्तिपूजा करीत. अयोध्येचे राममंदिर हे त्यापैकी एक.
  • इस्लाम धर्म हा अगदी अलीकडे स्थापन झाला. आपला धर्म हा एकच खरा धर्म इतर सर्व धर्म खोटे. मूर्तिपूजा अमान्य. इतर सर्व धर्मांचा, धर्मीयांचा, त्यांच्या प्रार्थनास्थळांचा नाश करावा. इतरांचे जबरदस्तीने धर्मांतर करावे. मूर्तिभंजक व्हावे व सर्व जग इस्लाममय करावे ही या धर्माची तत्त्वे.
  • हिंदुस्थानवर आक्रमण केल्यावर याच तत्त्वांचे त्यांनी पालन केले. त्याप्रमाणे अयोध्येचे राममंदिर पाडले गेले आणि त्याच पायावर त्यांनी मशीद बांधली हे सिद्ध झाले आहे.
  • हिंदू धर्मीय आक्रमक वृत्तीचे नसल्यामुळे, परधर्म सहिष्णू वृत्तीचे असल्याने त्यांनी मुसलमानांना त्यावेळी जशास तसे उत्तर दिले नाही. ते काही वर्षांपूर्वी दिले. एखादा अन्याय काही दिवस सहन केला म्हणजे तो सदासर्वकाळ सहन केलाच पाहिजे असा काही कायदा नाही. ब्रिटिशांचे राज्य 150 वर्षांनंतर हिंदुस्थानींनी उलथून टाकले. म्हणून पूर्वीच्या राममंदिराच्या पायावर जागेवर परत राममंदिर बांधून अन्यायाचे परिमार्जन करणे हा खरा आणि सोपा न्याय आहे. याऐवजी आक्रमकांना आणि आक्रमितांना एकाच पातळीत आणणे एवढेच नव्हे तर राममूर्तीलाही त्यांच्याबरोबर एक पक्षकार करणे हे लोकशाहीचे ओंगळ विद्रूपीकरण आहे.

पूर्वीच्या रामायणात सीतेला अग्निदिव्य करायला लागले होते. आमच्या राज्यकर्त्यांनी लोकशाहीच्या भ्रामक कल्पनेपायी रामालाच अग्निदिव्य करायला लावण्याचे नवीन रामायण रचण्याचा चंग बांधला आहे. घरात घुसलेल्या घुसखोरालाच घराचा काही भाग द्यायला सांगणे हा न्याय नव्हे. न्यायाची थट्टा आहे. कोणाचीही पर्वा न करता खर्‍या लोकशाहीच्या तत्त्वांचे पालन व अंमलबजावणी कठोरपणे केल्यास हिंदुस्थानसमोरील सर्व प्रश्न लगेच सुटतील.