जम्मू कश्मीर- कलम 370 आणि 35A चा परिणाम, भाजपसमोर विरोधकांनी टेकले गुडघे

139

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक बहुमत मिळालं. या विजयात ज्या राज्यांचा समावेश होता, त्यातील एक राज्य जम्मू आणि कश्मीर हेही होतं. जम्मू क्षेत्रातील लोकसभेच्या दोन जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला. राजकीय विश्लेषकांनी या विजयाचं श्रेय कलम 370 आणि अनुच्छेद 35A यांना जात असल्याचं म्हटलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय विश्लेषकांनी भाजपच्या कश्मीरविजयाचं रहस्य 370 आणि 35A मध्ये असल्याचं म्हटलं आहे. जम्मूमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात अँटी इन्कम्बन्सी वातावरण असलं, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाने निवडणूक निकालांचं चित्रच बदलून गेलं. राज्यातील अनेक मतदारांनी उमेदवारांपेक्षा जास्त मोदींकडे पाहून मतं दिली. यामागचं मुख्य कारण, भाजपच्या जाहीरनाम्यात कलम 370 आणि अनुच्छेद 35A हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. याच आश्वासनाने भाजपसाठी जम्मू-कश्मीरमध्ये गेम चेंजरची भूमिका बजावल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

या आश्वासनानंतर निवडणूक प्रचारावेळी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या दोन्ही पक्षांनी या आश्वासनाच्या विरोधात वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला होता. जर ही दोन्ही कलमं हटवण्यात आली तर कश्मीर हिंदुस्थानपासून वेगळा होईल, असं या दोन्ही पक्षांनी म्हटलं होतं. पण, कश्मिरी जनतेला हा विरोध आवडला नाही. उलट याच विरोधाचा फायदा भाजप उमेदवारांना झाला आणि भाजपने कश्मीरमध्येही यश संपादन केलं, असं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

जम्मू आणि कश्मीरमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांनी लोकसभा निवडणूक लढवली. उधमपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि जम्मूमधून जुगल किशोर शर्मा या दोन्ही उमेदवारांना मतदारांनी विजयी केलं. 2014 च्या तुलनेने या दोघांनाही 2019मध्ये मिळालेली मतं ही विरोधी उमेदवारांहून कितीतरी अधिक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या