उत्तरायण आरंभ

  • आनंद पिंपळकर

उद्यापासून उत्तरायण सुरू होते आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करून पृथ्वीच्या अधिक जवळ येतो. उबदार दिवस सुरू होतात.

हिंदू मान्यता आणि पंचांगानुसार वर्षातून दोन वेळा सूर्याचे आयन होत असते. आयन म्हणजे परिभ्रमण. या परिभ्रमणालाच दक्षिणायन आणि उत्तरायण म्हटले जाते. जेव्हा सूर्य मकर राशीतून मिथुनपर्यंत भ्रमण करतो या ६ महिन्यांच्या काळाला उत्तरायण म्हणतात.

मकरसंक्रांतीतील उत्तरायण होत असते. उत्तरायण सर्व कामांसाठी खूप पवित्र आणि सकारात्मक कालखंड मानला जातो. महाभारत काळात पितामह भीष्मांनी आपले प्राण उत्तरायण होईपर्यंत त्यागले नव्हते. कारण त्यांना इच्छा मरणाचे वरदान होते. उत्तरायणात केली गेलेली धार्मिक कार्ये द्विगुणित फळ देतात.

दक्षिणायन २१। २२ जूनपासून सुरू होते. दक्षिणायनात रात्री मोठ्या असतात आणि उत्तरायणात दिवस मोठे असतात. उत्तरायणातच गंगा पृथ्वीवर अवतरल्याचे सांगितले जाते.

भौगोलिक दृष्ट्या पृथ्वी एकसमान गतीत भ्रमण करत असते, पण तिचा अक्ष सूर्याशी काटकोनात साडे सहाशष्ट डिग्री अंशतः कललेला आहे. त्यामुळे परिभ्रमणात पृथ्वी एक बाजूला कललेली दिसते. त्यामुळे तिच्यापर्यंत सूर्यकिरणे जी पोचतात त्याच अंतरात बदल होतो. पृथ्वीचे उत्तरायण पूर्ण होण्यास १८७ दिवस लागतात उत्तरायणात गृहप्रवेश नि शुभ कार्ये महत्त्वाची मानली गेली आहेत. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना पूर्व आणि उत्तरेला जास्त मोकळी जागा सोडायला लावतात तसेच या दिशेला मोठ्या खिडक्या व दरवाजे व मोठे ऐसपैस व्हरांडे ठेवावेत असे याच कारणामुळे सांगितले जाते. जर उत्तर आणि पूर्वेला मोठ्या भिंती इमारती असतील तर सूर्यकिरण आपल्या घरात पोचायला अडथळे तयार होतात.

मकरसंक्रांत सणाचा हेतू
उत्तरायण आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश या दोन्ही घटना जेव्हा एकाच वेळी घडत असतात तेव्हा मकरसंक्रांत साजरी करणे, तिळगूळ वाटणे या कृती केल्या जातात. सांस्कृतिक, नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता मकरसंक्रांतीची म्हणजेच तिळगूळ समारंभाचा संबंध उत्तरायणाशी आहे. उत्तरायणाच्या दिवशी संक्रांत न करता ती मकरसंक्रांतीच्या दिवशी करतात.

उत्तरायणाचे महत्त्व
शास्त्रानुसार सूर्याचे दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश केल्यावर मकरसंक्रात साजरी केली जाते. दक्षिणायनाचा काळ हा देवतांसाठी ‘रात्र’ मानला जातो.
वर्षभरातील ऋतुंपैकी शिशिर, वसंत आणि ग्रीष्म ऋतु उत्तरायणात येतात.
या दिवसांत जप, तप करण्याबरोबरच विवाह, यज्ञ, गृहप्रवेश अशी इत्यादी शुभ कार्यांची सुरुवात केली जाते.
निरभ्र आकाश तसेच आकाशात काळे ढग न येणे ही उत्तरायणाची ओळख आहे.
दक्षिणायनात वर्षा, शरद, हेमंत हे ऋतु येतात. या वेळी आकाशात ढगाळ वातावरण असते.

तीर्थयात्रा आणि उत्सव
मकर संक्रांतीच्या दिवसांत सूर्य उत्तरायणात असतो. यावेळी दिवस मोठा आणि रात्र लहान असते. हा काळ तीर्थयात्रा आणि उत्सव साजरे करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. उत्तरायण सुरू असण्याच्या कालावधीत पौष-माघ हा मराठी महिना सुरू असतो. उत्तरायणाला देवतांचा दिवस मानले जाते. यासाठी या दिवसांत तीर्थयात्रा, उत्सव, मुंज, अनुष्ठान, व्रते करावीत.