यंत्रमानव माणसाला भारी पडणार?

  • अतुल कहाते

आज यंत्रमानव माणसाचा गुलाम आहे, परंतु भविष्यात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे. संशोधक बुद्धिमान यंत्रमानव बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. जर हे शक्य झाले तर उद्या माणूस हा यंत्राचा गुलाम होईल, परंतु माणूस यंत्रमानवाला आपल्या डोक्यावर बसवून आपला आत्मघात तर करून घेणार नाही ना? अशी भीती वाटणाऱ्या घटना घडत आहेत. यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनांचं कोडं उलगडणारा हा लेख…

काही दिवसांपूर्वी फेसबुक कंपनी प्रायोगिक तत्त्वावर वापरत असलेल्या दोन यंत्रमानवांनी त्यांच्या नेहमीच्या क्षमता आणि त्यांचं कामाचं नेहमीचं स्वरूप याहून एकदम भलतंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासरशी ते बंद पडले अशी बातमी आली. याचबरोबर उद्याचे यंत्रमानव माणसाहूनही जास्त बुद्धिमान असतील का? तसंच स्टीफन हॉकिंग म्हणाले होते त्यानुसार ते माणसालाच भारी पडतील का? या प्रश्नांविषयी जोरात चर्चा सुरू झाली.

गेल्या अर्धदशकाहून जास्त काळात संशोधक ‘बुद्धिमान यंत्र’ बनवायच्या प्रयत्नात आहेत. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या याच प्रयत्नांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’ असं म्हणतात. १९५६ साली न्यू हॅम्पशर राज्यातल्या डार्टमाऊथ कॉलेजात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. ही परिषद सुमारे दोन महिने चालली. ही परिषद भरवण्यात जॉन मॅकार्थीचा पुढाकार होता. मॅकार्थी हा त्याच कॉलेजात गणिताचा प्राध्यापक होता. त्याच वेळी माणूस जसा शिकतो, विचार करतो आणि आपली बुद्धिमत्ता वापरतो तसंच संगणकाचा वापर करून त्याला माणसासारखा विचार करायला शिकवता येईल का? यावर बरीच चर्चा झाली. त्याविषयीच्या कल्पना तशा बऱ्याच आधीपासून मांडल्या गेल्या होत्या. नंतर मिन्स्की आणि जॉन मॅकार्थी यांनी एमआयटीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातली प्रयोगशाळा सुरू केली.

यंत्रमानवाची संकल्पना एआय तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. यंत्रमानवाला संगणकीय भाषेत सूचना दिल्या की, तो त्या सूचना पार पाडतो. म्हणजेच मुळात कुठली सूचना दिल्यावर यंत्रमानवानं काय केलं पाहिजे हे त्याला ‘शिकवलं’ जातं. त्यानंतर आज्ञाधारकपणे यंत्रमानव त्या सूचनांनुसार काम करायला लागतो. आता यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंत्रमानवाचं हे कौशल्य इथपर्यंतच टिकणार की याच्यापुढे जाऊन तो आधीच्या सूचनांनुसार तसंच त्याच्या ‘अनुभवांमधून’ पुढे शिकत राहणार? म्हणजेच आधीच्या चुका होऊ न देणं आणि इतकंच नव्हे तर नवी कौशल्यं स्वतःहून शिकणं यंत्रमानवाला जमेल का? फेसबुकसारख्या कंपन्या नेमक्या याच प्रयत्नांमध्ये आहेत. फेसबुकनं यासाठी दोन यंत्रमानवांमध्ये ‘संभाषण’ घडवून आणायचे प्रयत्न सुरू केले आहेत. संभाषणासंबंधीच्या पायाभूत गोष्टी या यंत्रमानवांना ‘शिकवायच्या’ आणि त्यानंतर त्यांना एकमेकांशी संभाषण करायला लावायचं असा हा प्रकल्प आहे. यामधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा खूप लवचीक असते. त्यामध्ये असंख्य शक्यता असतात. तसंच ही भाषा आपल्या दृष्टीनं अर्थ लावायला सोपी असली तरी यंत्रमानवांना मानवी भाषेमधले सगळे बारकावे शिकणं आणि संदर्भानुसार भाषेचा अर्थ लावणं खूप अवघड जातं. हे आव्हान स्वीकारून फेसबुकनं प्रयत्न सुरू केले. तेवढ्यात एक गंमतच झाली! दोन यंत्रमानव एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी जणू एक नवी भाषा तयार करून त्यात संभाषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. म्हणजेच त्यांना भाषेच्या संदर्भात शिकवण्यात आलेल्या नियमावलीच्या बाहेरचे नियम त्यांनी स्वतःच घालून घेण्याचा प्रयत्न केला आणि या नव्या नियमांनुसार ते एकमेकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायला लागले. स्वाभाविकपणे यंत्रमानवांमधल्या संभाषणासाठी फेसबुकनं लिहिलेल्या सॉफ्टवेअरचा पार गोंधळ उडाला आणि ही यंत्रणाच बंद पडली.

फेसबुकमधल्या या घटनेमुळे काही लोकांनी यंत्रमानव माणसाला भारी पडणार अशी भीती व्यक्त केली. एलॉन मस्क या सध्या गाजत असलेल्या उद्योजकानं अशाच अर्थाचं विधान केलं. फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गनं मात्र एवढं घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं मत मांडलं. विलक्षण बुद्धिमत्ता लाभलेला माजी बुद्धिबळ ‘ग्रँडमास्टर’ गॅरी कास्परॉव्ह यानं तर ‘यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर एक पुस्तकच लिहिलं आहे. एकूण काय तर हा विषय प्रचंड महत्त्वाचा असल्यामुळे सगळीकडे चर्चेला आला आहे. यंत्रमानवांनी पृथ्वीचं नियंत्रण आपल्याकडे घेऊन मानवजातीला वेठीला धरल्यासंबंधीच्या विज्ञानकथा तसंच यासंदर्भातले हॉलीवूड चित्रपट आधीपासूनच आहेत. आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवील अशी भीती अनेकांना वाटायला लागली आहे.

माणूस आणि यंत्रमानव यांच्यामधल्या बुद्धीत तर फरक असतातच; पण दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे माणूस भावनाप्रधान असतो. यंत्रमानवाला भावना हा प्रकार माहीत नसतो. त्यामुळे खरोखरच यंत्रमानव माणसापेक्षा जास्त हुशार झाला तर असा भावनाहीन, पण विलक्षण बुद्धिमत्तेचा यंत्रमानव उद्या काय करील याविषयी छातीठोकपणे सांगता येत नाही. सध्या संगणक क्षेत्रात ‘मशीन लर्निंग’ नावाचा प्रकार खूप लोकप्रिय आहे. माणूस जी कामं करतो ती कामं यंत्रमानवांकडून करून घेणं हा या तंत्रज्ञानाचा पाया आहे. अशा प्रकारे आपली कामं यंत्रमानवांना शिकवून माणूस अधिकाधिक आरामाचं आयुष्य जगण्याचं स्वप्न बघत असताना दुसरीकडे हा यंत्रमानव उद्या आपल्याच डोक्यावर येऊन बसला तर काय? हा विचार संशोधकांना त्रस्त करून सोडतो आहे. ही भीती अनाठायी नक्कीच म्हणता येत नाही. याचा अर्थ यंत्रमानवांचा वापर करता कामा नये असा मात्र अजिबात होत नाही. यंत्रमानवांकडे आपल्या आयुष्याची दोरी जात नाही ना एवढी खबरदारी घेत हे तंत्रज्ञान पुढे नेण्याचं बिकट आव्हान म्हणूनच शास्त्रज्ञांसमोर आहे!

(लेखक माहितीतंत्रज्ञ आहेत)