ग्वादार : चीनसाठी आर्थिक गळफास

  • ब्रिगेडियर हेमंत महाजन

ग्वादारपेक्षा चाबाहार बंदर अधिक सुरक्षित ठरते. कारण तिथून निघणारा रस्ता बहुतांश इराणच्या हद्दीतून जाणारा असून त्याला जिहादी हिंसेची बाधा झालेली नाही. हिंदुस्थान-इराण व अफगाणिस्तानने चाबाहारचा उपयोगही सुरू केला आहे. त्यामुळे चीन व पाकिस्तान यांच्यासाठीच ग्वादार बंदर वा त्याला जोडणारा महामार्ग उपयुक्त राहू शकेल. या प्रकल्पात चीनने केलेली अफाट गुंतवणूक अनुत्पादक ठरण्याचा धोका वाढत आहे. हिंदुस्थानला शह देण्याच्या हव्यासापायी चीन सरकारने नको तितकी पाकिस्तानात गुंतवणूक केली आणि आता तोच आर्थिक गळफास बनण्याची शक्यता आहे.

कीकडे कट्टर इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानशी आमची घनिष्ठ मैत्री असल्याचा दावा करणाऱ्या चीनचा मुस्लिमद्वेषी चेहरा समोर आला आहे. चीनने मुस्लिमांविरोधात अतिशय कठोर कायदे तयार केले असून या अंतर्गत संपूर्ण चीनमध्ये मुसलमानांना हॉटेल्समध्ये राहण्यास बंदी घालण्यात आली आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात मोठ्या संख्येत उइगर मुस्लिम समाज राहात असून त्यांच्याविरोधात चीन सरकारने मोहीमच उघडली आहे. देशातील वांशिक तणाव चीनची अस्वस्थता अधिकच वाढवत आहे. झिंगयांग प्रांतात हान वंशियांच्या हाती सत्तासूत्रे एकवटली असल्याने बिगर हानस माजात नाराजी आहे. या असंतोषातून हान आणि बिगर हान यांच्यात संघर्ष होत राहतात. तिबेटी विस्थापितांचा प्रश्न चीनला भेडसावतोय. मंगोलियामध्ये फुटीर कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. देशाच्या झिंगयांग प्रांतातील युगूर मुस्लिमांचा प्रश्न सध्या ऐकणीवर आला आहे. चीनने मुस्लिमांविरोधात अतिशय कठोर कायदे तयार केले आहे. झिंगयांग प्रांतात युगूर मुस्लिमांची संख्या ८० लाख आहे. युगूर मुस्लिमांना इस्लामी देशातील फुटीरवाद्यांची साथ आहे.

मुस्लिमांच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या चीनने रमझान या पवित्र सणावर निर्बंध घातले आहेत. या आदेशान्वये मुस्लिम कुठल्याही मशिदीत एकत्र येऊन मोठ्या आवाजात अजान देऊ शकत नाहीत. मुस्लिमांना रोझे ठेवण्यासही बंदी असून त्यांना कार्यालयात दुपारच्या वेळी जबरदस्तीने भोजन करावे लागते. रोझे ठेवणारी व्यक्ती निदर्शनास आल्यास तिची वार्षिक पगारवाढ थांबविली जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुस्लिम युवकांनी रोझे ठेवले तर त्यांना दंड ठोठावण्यात येतो. चीन सरकारचा आरोप आहे की, युगूर मुस्लिमांना झिंगयांग चीनपासून स्वतंत्र करून त्याला मुस्लिम राष्ट्राचा दर्जा द्यायचा आहे. या देशातील राज्यकर्ते मुस्लिमांना डोके वर काढू देण्यास तयार नाहीत. झिंगयांग प्रांतात सतत दहशतवादी हल्ले होत असतात. या हल्ल्यामागे युगूर बंडखोरांचा हात असल्याचा चीन सरकारचा कयास आहे.

तिबेटमध्ये ज्याप्रमाणे हानवंशियांना स्थायिक करून तेथील लोकसंख्येचे समीकरण बदलण्यात आले अगदी त्याच धर्तीवर झिंगयांगमध्येही हान वंशियांना वसवण्यात आले. या भयापोटीच येथे १९९१ पासून सातत्याने हिंसाचार सुरू आहे. मध्यंतरी कनिमग रेल्वे स्थानकात गर्दीत अचानक सुमारे दहा दहशतवादी घुसले आणि समोर दिसेल त्याला हातातील लांब सुऱ्यांनी कापत सुटले. २ संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या तुकडीवर एक भरधाव ट्रक घातला आणि त्यांच्यावर अंदाधुंद बॉम्ब फेकून १७ सैनिकांचे बळी घेतले. अफगाणिस्तानात काही युगूर दहशतवाद्यांना अमेरिकी फौजेने पकडले होते. किरगिझमध्ये एका चकमकीत युगूर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.

या प्रांतात तेल, कोळसा आणि इतर खनिजे विपुल प्रमाणात सापडतात. चीनने सरकारी मोक्याच्या जागा हान वंशियांना दिल्याने युगुरांचा जळफळाट झालेलाच आहे. स्थलांतरणाचे प्रमाण इतके वाढले आहे की, १९५० साली झिंगयांगमध्ये असलेली युगूर मुस्लिमांची ९० टक्के लोकसंख्या घटून २००० मध्ये फक्त ४८ टक्के झाली आहे. युगुरांचे पलायन अजूनही सुरूच असून येणाऱ्या जनगणनेत त्यांची लोकसंख्या आणखी घटलेली बघायला मिळू शकते. युगुरांवर नजर ठेवायला मोठ्या प्रमाणात चीनच्या लष्करी तुकड्या येते तंबू ठोकून आहेत.

चीनने या भागातून काराकोरम महामार्ग बांधला. पण आता याच काराकोरम महामार्गाचा वापर दहशतवादी गट युगूर मुसलमानांना मदत करण्यासाठी करीत आहेत. चीनचा मोठा पैसा शेजारी पाकिस्तानच्या चीन-पाकिस्तान व्यापारी महामार्गात गुंतला आहे. त्यातला मोठा भाग म्हणजे बलुचिस्तानच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात येणारे ग्वादार बंदर होय. या बंदरामुळे चीनला दक्षिण चिनी सागराच्या किनाऱ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि पश्चिम आशिया व युरोपकडे होणाऱ्या मालवाहतूक आदी बाबतीत चीनला खूप सुविधा मिळाव्यात ही अपेक्षा होती. बंदर व महामार्गामुळे मध्य आशिया व रशियापर्यंतच्या देशांत थेट चिनी संपर्क साधला जाणार, अशी कल्पना होती. मात्र त्यांच्या अपेक्षेइतके त्याचे काम मार्गी लागलेले नाही.

त्याच दरम्यान हिंदुस्थानने ग्वादारशेजारीच इराणी किनाऱ्यावर होरमुझ खाडीवर चाबाहार बंदर विकसित केले. ते बंदर इराणसाठी हिंदुस्थान विकसित करीत असून त्या बंदरापासून थेट अफगाणिस्तानला जाणारा महामार्गही हिंदुस्थाननेच उभारून दिलेला आहे. चाबाहार बंदरात जाणारा माल पुढे अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक लहान-मोठय़ा देशात थेट पोहोचू शकणार आहे. रशियालाही तोच मार्ग सोयीचा होणार आहे.

चाबाहार बंदराचा उपयोग आता सुरू झाला असून हिंदुस्थानने आरंभ म्हणून गेल्या रविवारी ७ लाख टन गहू त्याच बंदर मार्गाने अफगाणिस्तानला पाठवलाही आहे. जे स्वप्न चीन रंगवत बसला होता त्याची पूर्तता हिंदुस्थानने करून टाकली. तो पाकिस्तानला आणि चिनी रणनीतीला दिलेला शह आहे. कांडला ते चाबाहार यांच्यातील अंतर मुंबई-दिल्ली अंतरापेक्षा कमी म्हणजेच सुमारे १,००० किमी असून कांडल्याहून निघालेली बोट दोन दिवसांत चाबाहारला पोहोचू शकते. चाबाहार हे बंदर पाकिस्तान-इराणला जोडणाऱ्या मक्रान किनाऱ्यावर ओमानच्या आखाताच्या तोंडावर वसले असल्याने सामरिकदृष्ट्या ते अत्यंत महत्त्वाचे आहे.

जर या मार्गे वाहतूक सुरू झाली आणि ती किफायतशीर ठरली; मग चीनच्या महामार्गाकडे कोण कशासाठी जाईल? हिंदुस्थानचा आतापासूनच मार्ग कार्यान्वित झाला. उलट जिथे म्हणून चिनी महामार्गाचे काम चालू आहे तिथे बांधकामाच्याच सुरक्षेसाठी चीनला आपले सैन्यबळ तैनात करावे लागलेले आहे. जिथे त्या बांधकामासाठी सुरक्षा पुरवावी लागते आहे तिथून मालवाहतूक सुरक्षित कशी असू शकेल?

ग्वादारपेक्षा चाबाहार बंदर अधिक सुरक्षित ठरते. कारण तिथून निघणारा अफगाणिस्तानचा रस्ता बहुतांश इराणच्या हद्दीतून जाणारा असून त्याला जिहादी हिंसेची बाधा झालेली नाही. पुन्हा अफगाण हद्द पार केली, मग थेट कझाकस्तान वा मध्य आशियातील देशांचा मार्ग खुला होतो. हिंदुस्थान-इराण व अफगाणिस्तानने चाबाहारचा उपयोगही सुरू केला आहे. याचा एकत्रित परिणाम असा होतो की, चीन व पाकिस्तान यांच्यासाठीच ग्वादार बंदर वा त्याला जोडणारा महामार्ग उपयुक्त राहू शकेल. या प्रकल्पात चीनने केलेली अफाट गुंतवणूक ही अनुत्पादक ठरण्याचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हिंदुस्थानला शह देण्याच्या हव्यासापायी चिनी अध्यक्ष व त्यांच्या सरकारने नको तितकी पाकिस्तानात गुंतवणूक केली आणि आता तोच आर्थिक गळफास बनण्याची शक्यता आहे.

[email protected]