रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे व्यवस्थापन

  • दादासाहेब येंधे

परळ-एल्फिन्स्टन या मुंबईतील रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन जो अपघात झाला त्या घटनेने मुंबईच नव्हे तर सारा देशच हादरून गेला. मुंबईकरांनी आजपर्यंत बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना केला असला तरी सदरची घटना २३ निष्पापांचे बळी घेऊन गेली.

दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या, देशभरातून रोजगारासाठी, नोकरीधंद्यासाठी येणारे लोक यामुळे लोकल ट्रेनमधून दररोज गर्दीचा महापूर वाहत असतो. मुंबईच्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता विचारात न घेता सिमेंटचे गगनचुंबी टॉवर्स उभारण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते. शहर नियोजनाचे एक शास्त्र असते याचाच जणू राज्यकर्त्यांना विसर पडलेला दिसतोय. रेल्वे स्थानकांवर मूलभूत सोयीसुविधांची वानवा असताना इतर राज्यांतून येणाऱ्या अनियंत्रित लोकांच्या झुंडीची त्यात भर पडत असेल तर चेंगराचेंगरी सारखे प्रकार होऊन मृत्युमुखी पडण्याचेही प्रकार वाढतील.

येणाऱ्या गर्दीच्या लोंढ्याचे व्यवस्थापन करण्यात रेल्वेची यंत्रणा बऱ्याचदा दुर्लक्ष करते. परिणामी, दुर्दैवी घटना घडतात. कायदा व सुव्यवस्था राखणे हे सरकारचे काम आहे, पण बेजबाबदार व चुकीचे अव्यवहार्य नियोजन करून, त्याबाबतची असमर्थता सरकारच दाखवत असेल तर ते व्यवस्थेचे अपयशच मानावे लागेल आणि हे आपल्यासाठी आश्वासक वातावरण निर्माण करणारे नाही. असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

एखाद्या रेल्वे स्थानकावर अपघात घडून गेला की, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते, समाजमन सुन्न होते. परंतु त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत. त्या करण्याबाबतच्या घोषणा केल्या जातात, ठराव पारित केल्या जातात मात्र ते पूर्णत्वास जात नाहीत.

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱया लोकलच्या असंख्य फेऱया पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. अर्थात, त्या काळी म्हणजे १६५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी त्या वेळची मुंबईची लोकसंख्या, शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातून येणारे लोक, व्यापाराची व्याप्ती या बाबी समोर ठेवून रेल्वेची रचना केली होती. साहजिकच त्यानुसार रेल्वे स्टेशनची उभारणी, प्लॅटफॉर्मची उंची, लांबी, रुंदी, जिन्यांची रचना, त्याची उंची, लांबी आणि रुंदी या बाबी निश्चित करण्यात आल्या. आज मुंबईची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. साहजिकच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची व्याप्ती वाढायला हवी.

पूल रुंदीकरण करणे, नवे पादचारी पूल बांधणे, रेल्वे स्थानकात अतिरिक्त सरकते जिने उभारणे, पादचारी पुलांचा विस्तार, अरुंद फलाटाचे विस्तारीकरण, पादचारी पुलांना जोडणाऱ्या रस्त्यावर प्रवासी सुरक्षेला प्राधान्य, लोहमार्ग पोलीस, होमगार्ड, आरपीएफ जवानांची प्रवासी सुरक्षेसाठी तैनाती, मुंबईतील रेल्वे प्रकल्प तडीस नेणे, पोलिसांतर्फे गर्दीचे योग्य व कार्यक्षम नियोजन अशा विविध उपायांनी गर्दीचे नियंत्रण व व्यवस्थापन करता येऊ शकेल. कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी त्वरित गर्दी पांगविणे अतिशय महत्त्वाचे असते. परंतु फलाटावर, पुलावर जेथे अफाट गर्दी होते तेथे ‘जलद गर्दी निर्मूलन’ व्यवस्थेचा विचार केला जात नाही, याबाबतची दक्षता घेणे अनिवार्य आहे.

रेल्वेच्या जिन्यांवर, स्कायवॉकवर फेरीवाले, भिकारी, जुगार खेळणाऱ्यांनी सामान मांडलेले असते. ज्याप्रमाणे रेल्वे पोलीस त्या ठिकाणी त्यांना बसावयास मुभा देतात त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासीही तितकेच त्यांना प्रोत्साहन देण्यास जबाबदार आहेत. ते येता-जाता अशा फेरीवाल्यांकडून काही खरेदी करत असतात. भिकाऱ्यांनाही काहीजण मदत करत असतात. त्यामुळे ते या ठिकाणांहून हलत नाहीत. खरेतर, त्यांच्यासाठी रेल्वे स्थानक ही एक उत्तम कमाईची ठिकाणं बनलेली आहेत. हे लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनच्या परिसरात विशेषतः पादचारी पुलांवर असणाऱ्या फेरीवाल्यांकडून काहीही विकत घेणार नाही, असा निश्चय प्रवाशांनी करायला हवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी जागा व्यापणाऱ्या भिकारी, फेरीवाले, गर्दुल्ले, जुगार खेळणारे यांच्यावर वेळीच कारवाई व्हायला हवी. तरच रेल्वे प्रवासी मोकळा श्वास घेऊ शकतील.

[email protected]