अभेद्य सिंधु रत्न

1

>> द्वारकानाथ संझगिरी

मालवणचा सिंधुदुर्ग पाहताना शिवाजी महाराज ‘जीनियस’ होते हे ठायी ठायी पटतं. काही मंडळी खेळ किंवा कलेच्या प्रांतात जीनियस असतात, काही विज्ञानात असतात, काही साहित्यात असतात. शिवाजी महाराज युद्धशास्त्रात होते. मध्ययुगातले महाराष्ट्रातले दोन जीनियस म्हणजे ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज. किल्ल्याच्या आखणीचं महाराजांचं ज्ञान केवढं सखोल होतं हे हा सिंधुदुर्ग पाहताना जाणवतं. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे दाराच्या अगदी जवळ जाईपर्यंत दरवाजा दिसत नाही. प्रवेशद्वाराला लागूनच भिंतीवर हनुमानाची कोरलेली मूर्ती आहे आणि आत शिरताच जरीमरीचं मंदिर. ही देवी विवाहित हिंदू स्त्रियांचं दैवत. त्यामुळे ते किल्ल्यात पाय ठेवताक्षणी आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पोर्तुगीज वास्तुशास्त्राचा शिवाजी महाराजांचा अभ्यास किंवा निरीक्षण तीक्ष्ण असावे. या किल्ल्यातली अरंद गोलाकार कमानीची कल्पना पोर्तुगीजांकडून घेतली गेली असावी. या किल्ल्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे. माझ्या व्यवसायामुळे मी अनेक पराक्रमी हातांशी हस्तांदोलन केलंय, पण हा हाताचा ठसा पाहताक्षणी संपूर्ण शरीरातून विजेचा प्रवाह सुरू होतो. अफझलखानाचा कोथळा काढणारा तो हात, शाहिस्तेखानाची बोटं तोडणारा तो हात, त्या हाताचा ठसा नुसता पाहतानासुद्धा ज्याचं रक्त धमन्यांतून थंडपणे वाहतं, ते उसळत नाही, तो मराठी माणूस नाही.

या किल्ल्यावर पाहण्यासारख्या आणखी दोन-चार गोष्टी आहेत. एक आहे नारळाचं झाड! कोकणात नारळाच्या झाडाचं काय अप्रूप? पण हे झाड सयामी जुळय़ासारखं आहे. त्याला वर गेल्यावर दोन फांद्या फुटतात. आता ते झाड नष्ट व्हायच्या मार्गावर आहे अशी मला भीती वाटते. इंग्लंडमध्ये रॉबिनहूड लपायचा त्या प्रचंड हजार वर्षे जुन्या झाडीला जगवायचा प्रयत्न करतात आणि आपल्याला या अद्भुत झाडाचं काही वाटत नाही. अनास्था हे एकमेव खरं कारण. त्या झाडावर वीज पडल्याने सर्व फांद्या जळून गेल्या असं म्हटलं जातं, पण आज विज्ञान त्या झाडालाही कोमातून बाहेर काढू शकतं असं मला वाटतं.

तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. मी पाहिलेलं ते एकमेव शिवाजी महाराजांचं मंदिर. महाराजांना शिवाचा अवतार मानणारी काही मंडळी आहेत. मी इतका देवभोळा नाही. मी त्यांच्याकडे महापुरुषातला महानतम पुरुष म्हणून पाहतो. त्यांचे पाय हे असे मानवी पाय होते, ज्यांच्यावर देवीच्या पायांवर ठेवतो तसं डोकं ठेवावं. त्यांच्या मुलाने, राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलं. गंमत म्हणजे तिथली महाराजांची मूर्ती ही नावाडय़ाच्या वेषातली आणि दाढी नसलेली आहे. गांधीजी म्हटले की, आपल्या डोळय़ांसमोर पंचातलेच गांधी उभे राहतात, सुटाबुटातले नाहीत. लोकमान्य टिळक म्हटल्यावर पगडीतलेच टिळक डोळय़ांपुढे येतात. त्यांनी विलायतेत कदाचित टोपी वापरली असेलही, पण हॅटमधले टिळक ही कल्पनाच आपण सहन करू शकत नाही. तसेच दाढीशिवाय शिवाजी महाराज हे डोळय़ांना खटकतं, पण असं म्हणतात की, राज्याभिषेकाच्या वेळी काही विधी करताना महाराजांना दाढी काढावी लागली. ते रूप छोटय़ा राजारामाच्या मनात भरले. अर्थात ही मूर्ती आपल्याला फोटो फ्रेममध्येच पाहायला मिळते. मूळ मूर्ती पाहायची असेल तर सकाळी सात वाजता पूजेच्या वेळी जावं लागतं. कारण आरती झाल्यावर मूर्तीवर मुखवटा चढवला जातो. हा मुखवटा चांदीचा आहे आणि सोन्याचाही आहे. मूर्तीच्या पुढय़ात एक तलवार ठेवलेली आहे. ती महाराजांनी वापरलेली तलवार आहे. ती म्यानात आहे. त्यावर हनुमान आणि गरुडाच्या चकमकीचा देखावा आहे. ती तलवार पाहिल्यावर एक गोष्ट जाणवते की, महाराज ‘अजानबाहू’ असावेत. कारण महाराजांची उंची तशी कमी होती. तरीही इतकी मोठी तलवार त्यांनी लीलया वापरली. याचा अर्थ त्यांचे बाहू मोठे असावेत.

तिथल्या तीन विहिरी आपलं लक्ष वेधून घेतात. एक आहे साखरबाव, दुसरी दहीबाव आणि तिसरी दुधबाव! चमत्कार पहा. छोटंसं असं ते बेट आहे. बेटाला वेढा सागराचा आहे, पण या विहिरीत उदंड गोड पाणी आहे. या विहिरीकडे शिवाजी महाराजांचं केवढं बारीक लक्ष होतं ते पहा. शिवरायांनी त्यांच्या मंडळींना कळवलं- ‘‘आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले आहे हे बरे जाणणे. गोड पाणी हाताशी बहोत. पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधोन, त्यात वाळू साठवणे. गोडय़ा पाण्यामध्ये चारदोनदा भिजू देणे. खारटाण धुतले जाईल. ती धुतलेली वापरणे.’’ कुठलीही वैज्ञानिक थिअरी नसताना अनुभव आणि शहाणपणातून आलेलं हे ज्ञान आहे.

बरं, सिंधुदुर्गावर बारीक लक्ष ठेवताना महाराज दुसऱया कुठल्या गडावर विसावले नव्हते. पुरंदरच्या तहातल्या अटीनुसार ते आग्र्याला औरंगजेबाकडे गेले. मग त्याच्या तुरंगातून ती अविश्वसनीय सुटका करून घेतली, पण या धामधुमीत महाराज असताना सिंधुदुर्गचं काम सुरू होतं. २९ मार्च १६६७ मध्ये बांधकाम संपलं तेव्हा झालेल्या समारंभास महाराज स्वतः हजर होते. त्यांची दूरदृष्टी पहा. त्यांनी १६५९ मध्ये आरमार बांधायला सुरुवात केली. याचा अर्थ त्यांचं लक्ष अशा जागेवर होतंच, जिथे जलदुर्ग बांधता येईल. हे ‘कुरटे’ बेट मिळाल्यावर त्यांनी तिथे सिंधुदुर्ग उभारला. असं नमूद केलं गेलंय की, त्यावेळी महाराजांच्या आरमारात छोटी-मोठी चारशे जहाजं होती.

हा किल्ला किती महत्त्वाचा होता हे नेर्न नावाच्या इंग्रज व्यापाऱ्याने लिहून ठेवलंय. तो लिहितो, ‘‘शिवाजीची माणसे दक्ष आहेत. ती कसलाच थांगपत्ता लागू देत नाहीत. मला पुरते बांधकाम पाहता आले नाही. मात्र, वर घाटातले किल्ले औरंगजेबाला द्यावे लागल्याने शिवाजी हा किल्ला बांधायची निकड करत आहे. सर्व बाजूने माघार घ्यावी लागली तर दरियातले आश्रयस्थान म्हणून त्याने या ठिकाणाची निवड केली आहे. माझ्या मते ही निवड अचूक आहे.’’ एक बिलंदर गोरा साहेब बोलतोय! महाराजांचा तिथे किल्ला बांधायचा निर्णय योग्य होता हे सिंधुदुर्गच्या पुढच्या इतिहासातून जाणवतं. १६८४ मध्ये शाहआलम खानने मालवण उद्ध्वस्त केले, पण सिंधुदुर्ग त्याला जिंकता आला नाही. १६८९ मध्ये संभाजी राजेंच्या हत्येनंतर मोगलांनी अनेक किल्ले घेतले, पण सिंधुदुर्ग स्वराज्यात राहिला. १७६६ मध्ये इंग्रजांनी सिंधुदुर्ग प्रथम जिंकला. त्याचं नाव पोर्ट ऑगस्टस केलं.

आता तो पोर्ट ऑगस्टस नाही. स्वतंत्र हिंदुस्थानात आहे. पुन्हा तो सिंधुदुर्ग आहे, पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारकडे त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तिथल्या बुरुजांवरून चालायला मजा येते, पण अखंडपणे फिरता येत नाही. कारण काही बुरुज कोसळले आहेत. काही मच्छीमारांनी भिंतीतून शिसं काढून नेलंय, आपल्या जाळय़ांना लावायला. दगडांच्या भेगांमधून झाडे वाढतायत. आपण भग्नावस्थेतला किल्ला पाहतोय असं वाटतं. खरंच आपल्या आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांना महाराजांबद्दल प्रेम आहे? स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ाला हरवणारा महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधल्याने ते व्यक्त होत नाही. तो दिखावा होतो. जिथे जिथे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने भूमी पुण्यवान झालीय, तिथे तिथे तो काळ डोळय़ांसमोर उभा राहील असं काहीतरी उभारलं गेलं पाहिजे. हाच सिंधुदुर्ग इंग्लंड किंवा इटलीत असता तर त्यांनी योग्य ती डागडुजी करून तो काळ तुमच्यासमोर उभा केला असता. त्याचं मस्त मार्केटिंग पॅकेज करून जगाला विकलं असतं. महाराजांना सिझर, सिकंदर, नेपोलियनच्या चार अंगुळे वर नेऊन ठेवलं असतं. त्या सिंधुदुर्गच्या किल्ल्यात गोऱ्या माणसांना माहिती सांगायला नि इंग्रजी बोलणारा गाइडही नव्हता. गुगलवर माहिती घेत ते किल्ला पाहात होते.

[email protected]