आनंदवन नावाचं आधुनिक तीर्थक्षेत्र

  • डॉ. अशोक कुलकर्णी

बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नाचं मूर्त रूप म्हणजे आनंदवन. निष्ठावान समाजकार्याचा आदर्श घालून देणाऱ्या आनंदवनाची वेगळी ओळख जनमानसात रुजलेली आहे. कुष्ठरोगींसाठी होणाऱ्या कार्याबरोबरच अंध-अपंग-कर्णबधिर-बेरोजगार-शेतकरी-आदिवासी अशा समाजातील उपेक्षित घटकांना अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची संधी आनंदवनाने दिली. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम आनंदवनात उभं राहिलेलं आहे. हा चमत्कार घडवणाऱ्या या प्रेरणास्थानाचे अनुभव मांडणारे हे सदर.

खूप दिवसांपासून आनंदवनला जायचा योग जुळत नव्हता. काही महिन्यांपूर्वी डॉ. भारती आमटे संभाजीनगरला आली, तेव्हा तिनं निर्वाणीचं सांगितलं. मग आम्ही सगळे मेडिकलचे तिचे सहाध्यायी जागे झालो आणि २ ऑक्टोबर २०१७ चा मुहूर्त ठरला. मुंबई, ठाणे, पुणे, अकोला, नांदेड, परभणी, बीड आणि संभाजीनगरहून आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी वरोरामार्गे आनंदवनला पोहोचलो. आनंदवनमधील राहाण्याची व्यवस्था सेव्हन स्टार आहे हे मत आधी पोहोचलेल्या मुंबईच्या डॉ. गोपाळ देशपांडेनं जाहीर केलं होतं, ते तंतोतंत खरं असल्याचा अनुभव आला. पोहोचल्या पोहोचल्या डॉ. विकासनी “तुमचे हेडमास्तर कुठं आहेत?’’ अशी चौकशी केल्याचं समजलं. मी या आनंदवन भेटीचा समन्वयक असल्यानं त्यांनी माझं हे नामांतर केल्याचं कळलं. संध्याकाळी आनंदवनचं प्रेझेंटेशन होतं. ते पाहायला आम्ही सेमिनार हॉलमध्ये जमलो. प्रेझेंटेशन करणारी लखनौहून आलेली पंचविशीच्या वयाची हिंदी बोलणारी तरुणी होती. तिचे वडील जपानमध्ये मोटार उद्योगात मोठ्या हुद्द्यावर काम करतात. तिनं अत्यंत सफाईनं आनंदवनाची माहिती दिली. तरुणाईवर विश्वास हे आनंदवनाचं वैशिष्ट्य इथं अधोरेखित झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही काय बघणार याचं जणू काही ट्रेलरच तिनं सादर केला. आम्ही विचारलेल्या प्रश्नांनाही तिनं आत्मविश्वासपूर्वक उत्तरं दिली.

यानंतर आम्हाला निमंत्रण होतं ते ‘स्वरानंदवन’ या डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून जन्मलेल्या सांगीतिक कार्यक्रमाचं. याचं संगीत नियोजन डॉ. भारती आमटेचं, तर निर्मितीची जबाबदारी सदाशिव ताजणे यांनी घेतलेली. आनंदवनातील अंध, मूकबधिर आणि अपंगांच्या हातांना काम मिळालं. भूक शमली. नंतर ते कला-निर्मितीसाठी सिद्ध झाले. ही कलानिर्मिती त्यांच्यासाठी जणू एक उपचारच ठरला आहे. दि. १४ जुलै २००२ला या वाद्यवृंदाचा पहिला कार्यक्रम झाला. यात मराठी-हिंदी गीतं, लोकनृत्य, आदिवासी नृत्यं सादर झाली. आतापावेतो या वाद्यवृंदाचे ३००० पेक्षा जास्त प्रयोग झाले आणि २ ऑक्टोबर २०१८ ला ही कलावंत मंडळी अमेरिकेत कार्यक्रम सादर करणार आहेत. आतापावेतो हा कार्यक्रम दलाई लामा, गुलझार, नाना पाटेकर, अजय-अतुल, जगजीत-सिंग, अशोक सराफ, संजय नार्वेकर आणि माननीय उद्धवजी ठाकरे इत्यादी मान्यवरांनी पाहिला आहे आणि त्यांनी त्याचं मनापासून कौतुक केलंय.

आम्ही पाहिलं त्या कार्यक्रमात रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेलेले श्री. पुरुषोत्तम बोटलावार, जन्मांध उज्ज्वला गवळी आणि जन्मानंतर काही काळानंतर अंध झालेल्या मनीषा बारसागडे यांचे सादरीकरण पाहताना या मंडळींनी आपल्या अपंगत्वावर मात केल्याचं निर्विवादपणे दिसलं. अंध मुलांनी सादर केलेलं नृत्य पण आम्ही पाहिलं. त्यात त्यांच्यात असलेला समन्वय वाखाणण्यासारखा होता. अपंगांनी व्हीलचेअरवर केलेलं नृत्य तर खास आणि थरारक होतं. या कार्यक्रमानं या कलाकारांना जो आत्मविश्वास आणि सन्मान त्यांना दिलाय त्याचं एक वेगळंच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्याशी बोलताना दिसलं. याच कार्यक्रमात डॉ. भारतीनं बाबांची एक कविता सादर केली. त्याआधी तिनं “आजच्या कार्यक्रमाला माझे वर्गमित्र आलेले आहेत, त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आहे’’ असं सांगितलं तेव्हा नाही म्हटलं तरी आम्ही गहिवरून गेलोच. दुसऱ्या दिवशी डॉ. विकास आमटेंची भेट झाली तेव्हा “तुम्ही छटाकभरच कार्यक्रम पाहिला. संपूर्ण कार्यक्रम संधी मिळेल तेव्हा नक्की पाहा’’ असं ते म्हणाले. हा माणूस थोड्यावर समाधान मानणारा नाही हे जाणवलं.

याच दिवशी डॉ. विकास आणि डॉ. भारती या दांपत्याचा मुलगा कौस्तुभ आणि सून पल्लवी यांची भेट झाली. कौस्तुभनं आता पाण्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. त्याच्या मते आपण आतापावेतो भूपृष्ठावरील पाण्यावर जास्त विचार केला. हे पाणी एकूण पाण्याच्या दहा टक्के आहे. भूपृष्ठाच्या खाली असलेल्या ९० टक्के पाण्यावर विचार करून काही मार्ग निघतो का, ते पाहणार असल्याचं त्यानं सांगितलं. पल्लवीनं पौगंडावस्थेतल्या मुलींच्या, विशेषतः अपंग मुलींच्या मासिक पाळीसंबंधी समस्यांवर लक्ष द्यायचं ठरवलंय. त्यासाठी राज्यपातळीवर एक पाहणी केली असून त्यातून मिळालेल्या माहितीची छाननी चालू असल्याचं तिनं सांगितलं.

रात्री रुचकर जेवणानंतर दिलेल्या निर्देशानुसार बेसिनपाशी स्वतःची ताट-वाटी घासून-पुसून ठेवताना आनंदनात श्रम-संस्कार कसे होतात त्याची झलक दिसली.