एक गमतीशीर भेट सासू आणि जावयाची…

>> डॉ. विजया वाड

राधा इतकी नटली की ती पन्नास ऐवजी चाळीसची वाटू लागते हे गोविंदरावांचे मत पुन्हा एकदा दृढ झाले. ‘‘काय छान दिसते आहेस गं! काही विशेष?’’ नवरा निवृत्तीच्या उंबरठय़ावर आला की बायको एकटीच नटून थटून बाहेर गेलेली त्याला बिलकूल आवडत नाही. हेच खरं! मग नसत्या चौकश्या हो! पण राधा काही कमी नव्हती?
‘‘मी डेटवर जात्येय.’’ राधा ठेचात म्हणाली.

‘‘डेटवर?’’… ‘‘हो डेटवर.’’ ठसका कायम. निघाली की रुबाबात. गोविंदाच्या घालमेलीकडे साफ दुर्लक्ष हो! राधा हॉटेल अतिथीत पोहोचली. मुकुंद तिची वाट बघत होता. ‘‘उशीर नाही ना रे झाला? हे नसत्या चौकश्या करीत होते मग म्हटलं मी ‘डेट’वर जात आहे.’’

‘‘डेट? मग जळले असतील ना जाम?’’ मुकुंद मोठय़ांदा हसला. राधाही.

‘‘जेवण व्हेज सिझलर्स मागव.’’ त्या म्हणाल्या. जेवण छान झालं वर कस्टर्ड कॅरामलही!

‘‘हे बघ मुकुंदा, मी मुद्दाम तुजजवळ डेट मागितली, कारण मी नि जया अगदी फूलपानांसारख्या एकजीव मायलेकी आहोत. आता जया तुझी होणार! आम्हाला दुरावणार. मी नि हे अगदी एकटे पडू. माझ्या कितीतरी मैत्रिणी लाडाच्या लेकींची लग्न झाल्यावर डिप्रेशनची शिकार होऊन हॉस्पिटलाईझ झाल्यायत. मला किंवा जयाच्या बाबांना असा अनुभव नको रे बाबा! म्हणून तुला सांगते, आठवडय़ातून निदान एकदा तरी माझ्या लेकीला आमच्यात अगदी एकटी पाठव. आम्ही आवडत्या लेकीबरोबर मनसोक्त गप्पा मारू. मी तिच्या अगदी आवडीचे पदार्थ करून तिला सुखवीन. बाबा तिला लाडाचा घास भरवतील. आम्ही मग पाच तीन दोनचा पत्त्याचा डाव खेळू. गावांची अंताक्षरे खेळू. बाबा तिला सुंदर गजरा आणतील. मी तिचे लांबसडक केस धुवून, उदवून देईन. तुझ्या घरी सहा दिवस नि मजकडे एक दिवस! म्हणजे काही फार मागत नाही नं मी राजा! सायंकाळी तिला घ्यायला म्हणून ये नि रात्रीचा आमच्यात जेव. मग जा घेऊन आपल्या राणीला. करशील एवढं?’’
‘‘नक्की करेन आई नि जयाला या डेटबद्दल न सांगता करेन.’’ तो सासूला (होणाऱया) वदला.

‘‘मग तर काय! नवरा म्हणून तुझा भाव आणखीच वधारेल! किती समजूतदार गं बाई माझा मुकुंद! असं म्हणेल जया अभिमानानं.’’ दोघं मनसोक्त हसली. अत्यंत समाधानानं दोघं अतिथीच्या बाहेर आली. ‘‘मी येऊ का घरी सोडायला जयाची आई?’’

‘‘नको. मग आपल्या डेटचं भांडं फुटेल ना मुकुंदा!’’ ती गोड हसून म्हणाली.

‘‘बरं बरं. मी रिक्षा पकडून देतो.’’ अशी राधा घरी पोहोचली. खूप खुशीत होती.

‘‘खूश दिसतेस कुणाबरोबर होती डेट?’’ गोविंदरावांनी खडा टाकला.

‘‘गोविंदराव, इतकाली वर्षे झाली लग्नाला! पण बायकोवर विश्वास नाही?’’ राधाने जाम ‘डेड एंड’ केलान डेटपुराणाचा. तुम्हीही नका सांगू हं डेटबद्दल त्यांना. जळूदेत जरा!