आठवणींचे दीप

  • डॉ. विजया वाड

कोणतीही गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली की सारा नूरच पालटून जातो.

सुजय कारखानीस बहात्तराव्या वर्षी गेले. पत्नी यशोमती सत्तर. दोघेही जुनेजाणते डॉक्टर्स. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचे हुशार विद्यार्थी! अर्थात त्यांच्या काळातले! ही जोडी सुजय एमएस होताच विवाहबद्ध झाली नि यशोने तिचे एमडी विवाहोत्तर पूर्ण केले. एक समृद्ध, सफल आयुष्य दोघे जगले. मुले आशा नि दीप दोघेही डॉक्टरच झाली आणि विवाहोत्तर सुखी आयुष्याला सामोरी गेली.

ऑल इज नॉट वेल माय डिअर! आपल्याला ऐकू कुठे येते? खरं ना? तसंच झालं सुजयच्या बाबतीत. सकाळच्या हास्यक्लबमध्ये एकाएकी अंत! ध्यानी न मनी. यशो हिरवळीवर ध्यानस्थ. सूर्याची प्रार्थना करीत होती. अन् लाफ्टर क्लबमधला कल्लोळ कानी पडला. काही इमर्जन्सी झाली का? तिच्यातली डॉक्टरीण जागी झाली. मनातला डॉक्टरकीचा कप्पा उघडून ती लाफ्टर क्लबच्या कोंडाळ्याकडे गेली. ‘काय झालं?’

‘सुजय… सुजय इज नो मोअर’ तिचाच जोडीदार. नंतरच्या घटना विद्युतवेगानं घडल्या. शरीर दान-देहदान-इस्पितळाकडे रवाना. मुलं आईच्या कुशीत. परत लहान झालेली. पोरकेपणाचा प्रथमानुभव! बापाचं छत्र असेपर्यंत पोरं कुठे ‘मोठी’ होतात?

सायंकाळी समाचाराला माणसे आली तेव्हा यशोमती पांढरी शुभ्र सिल्कची साडी नेसून हॉलमध्ये आदबशीर बसलेल्या. शेजारी डॉ.सुजयचे तैलचित्र. त्यापाशी पाच कमलपुष्पे. मुलेही सुरेख श्वेतवस्त्रात आईशेजारी समोर शोकग्रस्त मित्र-आप्त.

‘जन्म आणि मृत्यू कोणासही चुकले नाहीत. सुजय जे आयुष्य जगला ते फार अर्थपूर्ण होते. प्रतिक्षणी बरोबर असणाऱ्या या माझ्या प्रिय सोबत्याच्या आठवणी सोनचाफ्यागत सुगंधी आहेत. त्या मी उजळणार आहे. फक्त आपणासाठी आज रडायचे नाही. एक सांगू, ही सुजयची इच्छा होती दोघांना एकदम जाता येत नाही. पण जो मागे राहतो, त्यानं गेलेल्याचे काम नेटाने पुढे न्यावे असे सुजय म्हणायचा. मी तेच करणार आहे. लोकांना आनंदी ठेवा, सुखाचे क्षण त्यांच्या आयुष्यात पेरा असे तो म्हणे. मी आणि माझी मुले हे क्रत नक्की चालू ठेवू बरं सुजय!’ यशोनं सुजयच्या फोटोस चंदनाचा हार घातला नि सर्वांना बदामाचे घोटीव दूध दिले.

‘सुजयला हे दूध फार प्रिय होते. त्याला आठव!’ ती म्हणाली. लोक विस्मयचकित! मृत्यो तुझेही स्वागत करतो आम्ही… ही फिलॉसॉफी प्रत्येकासाठी नवी होती. ‘आता ज्यांना सुजयची चांगली आठवण सांगावी वाटते त्याने फोटोपाशी या. आठवण सांगा नि एक दीप उजळा’. ती म्हणाली. नि पाहता पाहता आठवणींचे दीप उजळले मित्रांनो… मृत्यूकडे सुंदरतम दृष्टीने बघूया का आपणही?