हरवले आहेत

  • डॉ. विजया वाड

हवासाने प्रेम वाढतं… पण कधीकधी अतिपरिचयात अवज्ञाही होते… राधाबाई सचिंत होत्या. कुमूद आणि तनय पुनः पुन्हा विचारीत होते, ‘‘काय एवढी वादावादी झाली की बाबा घर सोडून गेले. ते तर सांग ना!

मुकुंदरावांना अलीकडे जेवणच गोड लागत नाही. गोड दिलं तर तिखट हवं. तिखट दिलं तर गोड हवं. आता राधाबाईसुद्धा बहात्तर वर्षांच्या आहेत. मुकुंदराव ऐंशी! राधाबाईंनी पोळी कातरून पानात ठेवली. का? तर म्हाताऱ्याला काठ बोचतात. केळं कुस्करून त्यात साजूक तूप घातलं. फ्लावरचा रस्सा दिला. तरी चवणे चालूच.

‘मला ना, मिरची लसूण ठेचा दे!’ …

आता मात्र राधाची सहनशक्ती संपली. ‘मला ठेचा आता. ऐंशी वर्ष खाताय तरी जीभ मागतच सुटलीय. बायको काही तरणी नाही.

तसे पान टाकून मुकुंदराव उठले नि पायात चपला घालून बाहेर निघून गेले.

‘‘ही मिजास? भरल्या ताटावरनं उठायची?’’ राधा कडाडली.

तास गेला… चार तास गेले तशी राधा घाबरली. लेक कुमुदला फोन केला. ‘‘बाबा हरवले आहेत. ये ताबडतोब.’’ लेक-जावई आले. राधाबाईंचं चित्त थाऱ्यावर नव्हतं.

‘‘हरवले आहेत अशी कम्प्लेंट दे कुमी.’’

‘‘अगं पण ते तुजवर रागावून निघून गेले ना?’’ …

‘‘बावन्न वर्षे या तऱ्हेवाईक माणसाला सोसलं गं. आता अंती बट्टा नको पदरी.’’ त्या रडत उठल्या.

चांगल्या पाव किलो मिरच्या नि खूपशा लसूण पाकळ्या मीठ घालून मिक्सीतून काढल्या नि बरणीत भरल्या.

‘‘आता हे कोण खाणार?’’ कुमुद हसत म्हणाली.

‘‘बाप घर सोडून गेला नि तू हसतीयस?’’ राधाबाई रागावल्या.

‘‘ते माझ्या घरी आले. जाणार कुठे? मी दिला मिरचीचा ठेचा करून आता. जेवून झोपलेत निवांत.’’

राधाबाई बघतच राहिल्या. ‘‘आता मीच जाते कुठेतरी.’’ त्या म्हणाल्या.

तनय म्हणाला, ‘‘खरंच जा! बाबांना तुमची किंमत कळेल.’’

प्रिय वाचकांनो, इतकाल्या वर्षात किंमत कळते हो… पण अति परिचयात अवज्ञा होते ना! मग लक्षात येतं हरवले आहेत – सहनशक्तीचे सूर!