माझी फी

  • डॉ. विजया वाड

देव एखादी गोष्ट काढून घेतो, पण दोन्ही हातांनी भरभरून आनंदाचे दानही देतो…!

‘‘शी शी शी… रोहन या बाईला सांग… माझ्या मुलाचे पचापचा पापे घेऊ नकोस म्हणून. सगळी थुंकी माझ्या पप्पू बाळाच्या गालाला लागते. शीsss गं बै.’’

माझी सून किंचाळली. मुलगा एकदम बावरला. हळू आवाजात म्हणाला, ‘‘सुधा, अगं आईला काय वाटेल? जरा हळू बोल.’’ पण रमेशला जरबेत घेण्याची माझ्या सुनेची जुनीच सवय. ‘‘रोहन, तुझ्या भावाला सांग… मधे पडू नकोस. रम्या रम्या… निगम्या गम्याय तो. तोंडातल्या तोंडात पुटपुटायची घाणेरडी सवय आहे त्याला. रोहन, माझ्या पप्पूला आईकडून घेऊन ये तुझ्या. गाल डेटॉलने धू त्याचा. डेटॉल डायल्यूट कर हं. माझ्या पप्पू बाळाचे गाल सायीचे आहेत. मी पोळ्या करत्येय म्हणून तुला सांगत्येय.’’ माझा धाकटा रोहन बाहेर आला नि खसकन पप्पू बाळाला माझ्या हातून खेचलंन हो. पप्पू घाबरला. त्यानं ओठ वाकडा केला, पण बाळानं तोंडातून आवाज नाही हो काढला. रम्या माझा गरीब! नि रोहन? वहिनीचा पाठीराखा. ‘ती माझ्यासाठी पोळ्या करते, भाजी करते. तू काय करतेस आजी?’ ‘मी तुझी आई आहे. पप्पूची आजी.’ मी समज दिली तरी तो आजी, म्हातारी अशीच संबोधनं आईला वापरतो. वहिनीला फितूर हो! मला स्वयंपाकघरात मज्जाव आहे. मला कुठलाही रोग नाहीय हो. पण सुनेची ताकीद हो! औरंगजेब आहे ती.

पण अचानक मला लॉटरी लागली. माझी मैत्रीण सिंधू मुलीकडे लंडनला सहा महिने जायला निघाली नि मला बोलवलंन बघा. म्हणाली, ‘‘माझं छोटंस पाळणाघर सांभाळशील का सखी सहा महिने? मी तुला पैसेही देईन. म्हणजे दरमहा बायका दीड हजार देतात. मुलांचं खाणं देतात. शिवाय हेल्पर असतेच. पाच तर बाळं आहेत. नीट सारं निगुतीनं करता यावं म्हणून संख्या वाढवली नाहीय हे तुला ठाऊकच आहे सखी.’’ मला ‘आनंद मनी माईना’ अशा स्थितीचा जिवंत अनुभव तक्षणी मिळाला. सुनेला विचारू? मुलांना विचारू? छट्! संबंध काय? सहा महिने मी निवांत राहणार दिवसभर, माझी मैत्रीण सिंधू हिच्या घरी. रात्री झोपायला देहाचं गाठोडं घरी नेऊन टाकायचं! बास! आता दीड गुणिले पाच म्हणजे पाच दीडं साडेसात मला मिळतील. त्यातले दीड त्या केअरटेकरचे. तरी सहा उरतातच की! रग्गड झाले हो. इथे छनछन रुपयांची हौस नाहीय हो मला. हे फोटोत बसले, पण मला पेन्शन येते त्यांची. मी त्या बायकांना खरंच सांगणारे… माझी फी! तुमच्या बाळांचा रोज एक गोग्गोड पापा! बास आणखी काय हवं मला!