मूर्तिमंत माणुसकी आणि साधेपणा

  • द्वारकानाथ संझगिरी

यावेळी लंडनमध्ये मला एक आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व भेटलं. ‘‘साधेपणा कसा असतो?’’ असं मला कुणी विचारलं तर मी सांगेन ‘‘त्यांच्यासारखा’’.

त्यांचं नाव डॉ. गोविंद काणेगावकर. ते सर्जन असल्यामुळे त्यांना तिथे मिस्टर काणेगावकर म्हणतात. सर्जनला मिस्टर म्हणायची ही तिथली पद्धत.

मी लंडनला ‘काळे ट्रस्ट’च्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या काळे ट्रस्टची कथाही रंजक आहे, पण आधी काणेगावकरांबद्दल सांगतो. तिथे जाण्यापूर्वी माझं त्यांच्याशी दोन-चारवेळा फोनवर बोलणं झालं होतं. माझा अमेरिकेतला एक जवळचा मित्र संदीप पाध्ये पूर्वी लंडनमध्ये राहायचा. तो मला म्हणाला होता,‘‘डॉ. काणेगावकरांसारखा माणूस तुला क्वचित सापडेल. हजारो पौंडांची देणगी तो महाराष्ट्र मंडळाला देतो आणि पुन्हा मंडळात दादागिरी नाही. कार्यक्रमाच्या वेळी खुर्च्या लावायलाही तेच पुढे असतात. जमल्यास त्यांच्या केंट परगण्यातल्या बंगल्यावर जा, राजा माणूस म्हणजे काय ते कळेल.

किती कौतुकाने बोललाय संदीप डॉक्टरांबद्दल! पण तरीही त्यांना भेटल्यावर मला वाटलं, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसांचं कौतुक हात राखून करतो. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी त्यांची माझी भेट झाली. त्यानंतर प्रत्येक पावलावर मला वाटलं की, साधेपणाच्या हातात हात घालून मी फिरतोय.

आधी मी त्यांचं वैभव सांगतो. म्हणजे तुम्हाला त्यांच्या साधेपणाचं महत्त्व कळेल. ते मूळचे सोलापूरचे. पुण्यात डॉक्टर झाले. इंग्लंडला आले. एफआरसीएसपासून अनेक पदव्या त्यांनी घेतल्या. कान, नाक, घसा तज्ञ झाले. त्यातल्या कॅन्सरच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलं. त्यांच्या सौभाग्यवती विजूताईसुद्धा डॉक्टर, मुलगा डॉक्टर. एक कृतकृत्य असं त्यांचं आयुष्य! केंट परगण्यात हाईथ नावाच्या टुमदार गावात त्यांचं घर आहे. मी माझा मित्र प्रमोद नवाथे आणि मुकुंद नवाथेबरोबर त्यांच्याकडे जाताना प्रमोद रस्ता चुकला. गावात एक पोस्टमन भेटला. त्याला पत्ता विचारला. तो म्हणाला, ‘‘नॉर्दर्न रोडवरून सरळ जा. डोंगरावर तुम्हाला एक कॅसल (किल्ला) दिसेल. आम्ही त्याला किल्लाच म्हणतो. ते त्यांचं घर.’’

घरात शिरल्यानंतर मी विजूताईंना म्हटलं, ‘‘घराची एक गाईडेड टूर ठेवा. मग कुठे काय आहे ते कळेल.’’ घराच्या समोर मस्त फुललेली बाग! इंग्लंडमध्ये बागेत टपोरी वेगवेगळ्या रंगांची गुलाबं आहेत. ही बातमी नसते, पण त्या गुलाबासहित अनेक सुंदर सुंदर फुलं तिथं होती. त्यातल्या लीलीच्या झाडाकडे बोट दाखवून गोविंदराव म्हणाले, ‘‘ही लीलीची फुलं आम्ही लावली नाहीत, ती आपोआप उगवली.’’

गोविंदरावांच्या उमद्या स्वभावाकडे पाहून लीलीलाही त्यांच्या बागेत स्वतःहून उमलायचा मोह झाला असेल. त्यांच्या बागेत फळांची झाडं आहेत. कुठली फळं असावीत? चेरी, सफरचंद, पिअर वगैरे! बागेतून त्यांच्या घरात शिरताना दगडी जिना संपला की, एक झोपाळा येतो. झोपाळ्यांची इतकी योग्य आणि सुंदर जागा मी क्वचित पाहिलीय. झोपाळ्यावर बसलं की, समोर ते टुमदार ‘हाईथ’ गाव दिसतं. त्याच्या पलीकडे समुद्र (नॉर्थ सी) दिसतो. त्याच्या पलीकडे डोळे किलकिले केले तर न्यूक्लियर रिऍक्टर असलेले आणि दीपस्तंभ मिरवणारं गाव अस्पष्ट दिसतं आणि तुमचं नशीब चांगलं असेल, आकाश निरभ्र असेल तर फ्रान्समधला कॅलेचा किनारा दिसतो. हातात चहा, बीअर, वाईन, व्हिस्की… काहीही! तुमचं लाडकं ड्रिंक घेऊन झोपाळ्यावर बसले आहात अशी कल्पना करा. नुसत्या कल्पनेने अंग शहारेल, तर प्रत्यक्ष बसल्यावर मला काय वाटलं असेल? बंगल्याच्या दारात एक लाल गाडी उभी होती. ती व्होल्व्हो कंपनीची स्पोर्टस् कार होती, पण चार सीटची. ते मला डोव्हरचे पांढरे कडे पाहायला घेऊन गेले. गाडी वरून उघडी, पण बाहेरच्या थंडीवाऱ्याशी मुकाबला करायला त्यांनी सीट गरम केल्या आणि उघड्या गाडीत गरम हवा सोडली. डोव्हरहून परतल्यावर त्यांनी गॅरेजमधली त्यांची अनमोल गाडी दाखवली. ती ‘रोल्स रॉईस’ होती. एकेकाळी रोल्स रॉईस ही वैभवाची फार मोठी खूण होती. आताही आहेच.

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ‘कपल इज ऑलवेज ऑड’ (जोडपं कधी अनुरूप नसतं), पण विजूताई आणि त्यांच्या स्वभावाचे साधेपणाचे आणि व्यवसायाचे ‘छत्तीस गुण जमतात’. आजतागायतच्या संपूर्ण आयुष्यात इंग्लंडमध्ये त्या फक्त साडीत वावरल्या. त्यांनी ऑपरेशनही साडीत केली.

अरे, एक गोष्ट सांगायची राहिलीच की, डॉ. गोविंदराव ‘अवघे’ एकोणऐंशी वर्षांचे आहेत. ‘अवघे’ हे विशेषण मी गंभीरपणे वापरतोय. ते छत्तीस मैलांची मॅरेथॉन धावतात आणि पूर्ण करतात. कधीतरी दोन वर्षांपूर्वी ते चॅरिटीसाठी लंडनहून पॅरिसला सायकलने गेले. ही चॅरिटी हिंदुस्थानी किंवा मराठी मंडळासाठी वगैरे नव्हती. ती होती इंग्लंडमधल्या बेघरांसाठी! आणि हो, त्यांनी महाराष्ट्र मंडळाला भरघोस देणगी दिली आहे. महाराष्ट्र मंडळाच्या देणगीदारांची पाटी वाचली तर एक नाव दिसतं डॉ. गोविंद काणेगावकर आणि समोर आकडा दिसतो चौपन्न हजार पौंड (पन्नास लाख रुपये)!

अशा माणसाने या कार्यक्रमात स्वतः ऑडियो व्हिज्युअलसाठी पडदा लावला. आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही त्यांना मदत केली. खुर्च्या लावल्या. जणू मीच सर्व काम करून दिल्याप्रमाणे त्यांनी मला स्वतः चहा करून आणून दिला. मी फक्त कप बेसिनमधे ठेवण्याची तसदी घेतली. पुलंच्या नारायणाप्रमाणे ते आणि प्रमोद नवाथे काम करत होते. आणि हे कशासाठी, तर ‘काळे ट्रस्ट’साठी! हा ट्रस्ट कुणाचा? सांगतो कथा. २५ वर्षांपूर्वी एक माणूस एका दुकानात कोसळला आणि मेला. पोलिसांना जाणवलं की, त्याला आगापिछा नाही. तो हिंदुस्थानी आहे. त्यांनी हिंदुस्थानी वकालतीला कळवलं. आडनावावरून त्यांना जाणवलं की, तो मराठी असावा. त्यांनी मराठी मंडळाला विचारलं. मराठी मंडळातल्या काही मंडळींनी सूर लावला, ‘‘तो मंडळाचा सभासद नव्हता मग कशाला भानगडीत पडायचं? मरू द्या’’, पण मुकुंद नवाथेंना ते पटलं नाही. त्यांना त्याचं मूळ शोधताना दोन महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. एक – त्यांचा एक भाऊ आणि बहीण हिंदुस्थानात आहेत आणि दुसरी- त्याने एक लाख पौंड मागे सोडले आहेत. काळेच्या बहिणीने त्यातून तिचा वाटा घेतला. भाऊ म्हणाला, ‘‘तुम्ही त्याच्या नावाने ट्रस्ट करून समाजाला मदत करा.’’ मग त्याच्या अंत्यसंस्कारापासून जबाबदारी मुकुंद नवाथे आणि काणेगावकरांनी घेतली. सामाजिक सेवेचं आणखी एक कंकण त्यांनी हातात बांधलं. सर्वसाधारण मराठी माणूस त्याला लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणू शकतो.

हे वाचल्यावर तुम्ही डॉक्टर काणेगावकरांना काय म्हणाल?

मी म्हणतो, मूर्तिमंत माणुसकी आणि साधेपणा!

[email protected]