भ्रमाचा भोपळा फुटला

द्वारकानाथ संझगिरी

‘भ्रमाचा भोपळा फुटणं’ या म्हणीचा अर्थ परवा हिंदुस्थानी संघाने नीट समजावून सांगितला. 2019चा विश्वचषक आपल्या खिशात आहे या भ्रमात आपण फिरत होतो. अचानक खिसा कापल्याची भावना झालीय. नवखा ऑस्ट्रेलियन संघ इतका निष्णात पॉकेटमार असेल याची आपल्याला कल्पना नव्हती. फक्त काही महिन्यांपूर्वी त्यांच्या देशात विराट कोहलीच्या संघाने त्यांना जमिनीत गाडून वर मूठ, मूठ, माती टाकलीय असे वाटले होते. सापाच्या शेपटीवर पाय देऊ नये असे म्हणतात, पण कांगारूच्या शेपटीवरचा पायही असा दंश करतो?

मला वाटले की, इंग्लंड दौऱ्यानंतरच्या विजयाने आपण गाफील राहिलो. संघाला आलेली सूज आपल्याला बाळसं वाटली. आपल्या संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि काही प्रमाणात धोनी काढला की आपला संघ सामान्य वाटायला लागतो हे एका नवख्या ऑस्ट्रेलियन संघाने दाखवून दिले.

चला एका एका खात्याचा विचार करू.

प्रथम क्षेत्ररक्षण. एक वन डे आपण क्षेत्ररक्षणामुळे घालवली. आजही विराट कोहली उत्कृष्ट झेल घेतो. भन्नाट थ्रो करून धावचीत करतो. स्वतःला झोकून देतो. इतर किती तसे करतात? क्षेत्ररक्षक ही माणसे असतात, देव नसतात. एखादा झेल सुटू शकतो, पण साथ आल्यासारखे झेल सुटतात तेव्हा आजच्या युगात धक्का बसतो. वयाच्या सदतिसाव्या वर्षी धोनी हाच आपला उत्कृष्ट यष्टिरक्षक असावा ही आपली शोकांतिका आहे. वृषभ पंतला यष्टिरक्षक समजणे हा यष्टिरक्षणाच्या कलेचा अपमान आहे. त्याला गोलकीपर म्हणणे हे फुटबॉल, हॉकीच्या गोलकीपरना कमी लेखणे होईल. तो चोर पकडून देणारा गुरखा नाही. तो डुलकी घेणारा यष्टीमागचा गुरखा आहे. झेल नावाचे चोर त्याच्या हातावर तुरी देऊन सटकतात. त्याने ‘झेल घेणे’ ही ब्रेकिंग न्यूज आहे. अरे, त्या रिद्धिमान साहाचा फोटो ‘आपण यांना पाहिलंत का?’ या सदरात टाकून पहा. तो सापडेल कदाचित. नाहीतर सीबीआयला सांगा. नको, ते गोंधळ घालतील. अरे शोधा त्याला. धोनीला जर दुखापत वगैरे झाली (शुभ बोल रे नाऱ्या!) तर तोच योग्य आहे.

फलंदाजीची मला जास्त भीती वाटायला लागलीय. आपली आघाडीची जोडी कोण? धवन-रोहित शर्मा आणि त्यांच्यासाठी पॅड लावून उभा राहुल! मुळात चेंडू स्विंग झाला की आपल्या दोन विकेटस् पटकन पडतात. आपण इंग्लंडच्या मोसमाच्या पूर्वार्धात खेळणार. त्यावेळी आकाशात ढग असणार, खेळपट्टीवरचे किंचित गवतही चेंडू स्विंग करते. आठवतंय ना, दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी कशी आपली दाणादाण उडवली होती! उदाहरण मुद्दामहून पाकिस्तानचे दिले. भीमाला द्रौपदी नेहमी दुःशासनाच्या मांडीची आठवण करून द्यायची, पण धवन पाच सामन्यांत एक तुफानी खेळी खेळतो.  त्याचे मागचे अपयश विसरले जाते. रोहित अंमळ चांगला आहे. पाचापैकी दोन खेळी खेळतो. पण त्याच्या काही अटी आहेत. चेंडू बॅटवर यायला हवा. जास्त स्विंग नको वगैरे. राहुल जबरदस्त गुणवान असल्याची नेहमी एखादी धमकी, सणासुदीला एखाद्या खेळीतून देतो. त्याची मैदानाबाहेरची गुणवत्ता आम्हाला ‘कॉफी वुईथ करण’मध्ये कळली, पण मैदानावरची अजून समजायचीय. थोडक्यात, ही आपली दर्शनी तटबंदी! काय आत्मविश्वास वाटणार? रायडू हा माझ्या मते अति चढवलेला (ओव्हररेटेड) फलंदाज आहे. तो यशस्वी होवो ही इच्छा! त्याने मला खोटे ठरवले तर मला आनंद होईल. पण ठरव लवकर बाबा! उगाच, ‘अजिंक्य रहाणे असता तर बरे झाले असते’ किंवा ‘त्याच्यापेक्षा पुजारा काय वाईट?’ ही चुटपुट मनाला लागायला नको. त्यानंतर जाडेजा, पांडय़ा, जाधव वगैरे. म्हणजे बनी तो बनी नहीं तो अब्दुल घनी! त्यातल्या त्यात जाधव हा ‘मराठा गडी यशाचा धनी’ आहे. कठीण समयी तो उभा राहतो आणि हो, एक राहिलंच.  आपला गरीबांचा ऍडम गिलख्रिस्ट – वृषभ पंत. त्याला आपण फक्त फलंदाजीसाठी घ्यायला निघालोय. त्याचं सिडनीतले शतक आता हळूहळू विस्मृतीच्या पडद्याआड जायला लागलंय. आणि त्याची अलीकडची फलंदाजी त्याला दारिद्रय़रेषेखालचा ऍडॅम गिलख्रिस्ट ठरवते. त्याच्याकडे गुणवत्ता नक्की आहे, पण नग्न गुणवत्ता क्रिकेटमध्ये नेहमीच सुंदर दिसते असे नाही. टेंपरामेंट, फटक्यांची योग्य निवड, वातावरणाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेणे वगैरे. हे कपडे, मेकअप आणि दागिने तिने घातले की ती रूपगर्विता ठरते हे त्याने समजून घेतले पाहिजे. आता उरले दोन फलंदाज, एक तळपता सूर्य, दुसरा डुबायला सज्ज असलेला सूर्य. विराट आणि धोनी!

धोनी जुने दिवस आठवू शकतो, पण तसा खेळू शकत नाही. त्यामुळे विराट हाच नेहमी आपला ‘ऍटलास’ ठरणार असेल आणि ऍटलासप्रमाणे संघाचे धावांचे ओझे खांद्यावर घेतले तरी तो देव नाही. आपल्यासारखा स्खलनशील माणूस आहे हे लक्षात ठेवूया. तो अपयशी झाला की हरायचं का?

आपल्या गोलंदाजीवरचा माझा विश्वासही कमी व्हायला लागलाय. जसप्रीत बुमराबद्दल बोलायचे नाही. दादासारखी गोलंदाजी टाकतोय. शमीचे सातत्यही चांगले आहे. भुवनेश्वर कुमार मात्र अलीकडे अचूकतेच्या बाबतीत तळय़ात मळय़ात असतो. पण इंग्लिश वातावरणाचा तिघांनाही फायदा होईल. मला काळजी आहे फिरकी गोलंदाजीची. कुलदीप-चहलच्या गोलंदाजीतली ‘जादू’ आता अनेकांनी ओळखलीय. ऑस्ट्रेलियन्स कुलदीपला डोळय़ांवर फडके बांधून खेळतील असे वाटायला लागले होते. आणि जाधवच्या सरळ चेंडूंना सरळ पुढे जाऊन कसे खेळावे हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दाखवून दिलेय. म्हणून तर ते चक्क 359 चा पाठलाग करून जिंकू शकले. इंग्लंडमध्ये मधली षटके (11 ते 39) फार महत्त्वाची ठरणार. कारण सुरुवातीला चेंडू स्विंग होताना ‘हीट थ्रू द लाइन’ (चेंडूच्या रेषेत येऊन फेकून देणे) वगैरे शक्य नाही. त्यामुळे धावा काढण्याचा प्रयत्न वर्तुळाबाहेर चार क्षेत्ररक्षक असताना या 11 ते 39 षटकांत होणार आणि तिथे आपली फिरकी गोलंदाजी दुभती गाय ठरली तर धावांचं बाळसं प्रतिस्पर्धी फलंदाजीवर चढू शकते. धोनी असल्यामुळे नेतृत्वाची काळजी नाही. नाहीतरी तो रिमोट कंट्रोल कॅप्टन आहेच. हिंदुस्थानी संघाचं ‘मिग’ विमान होऊ नये ही अपेक्षा. खडबडून उठायची वेळ झालीय. आता कामाला लागा.