।। प्रभाते करदर्शनम् ।।

  • ज्योत्स्ना गाडगीळ

सकाळी उठून आपल्या हातांचे दर्शन घेणे ही पूर्वापार परंपरा. काय असावे यामागचे कारण…

खादी गोष्ट आपल्या आवाक्यात नसेल तर आपण म्हणतो, ‘‘हे माझ्या ‘हाता’त नाही’’, एखादी व्यक्ती मर्जीतली असेल तर आपण तिला ‘उजवा हात’ म्हणतो, एखाद्याला आधार द्यायचा असेल तर आपण ‘पाठीवर हात’ ठेवतो, धीर द्यायचा असेल तर ‘हातात हात’ घेतो. एवढेच काय, तर भविष्य बघायचे असेल तरी आपण ‘हात’ दाखवतो आणि एखाद्याला निरोप द्यायचा असेल तरीही आपण ‘हात’च दाखवतो. केवढे महत्त्व आहे आपल्या ‘हाता’ला! त्याचे कारण काय तर आपले सगळे कर्तृत्व आपल्या हातामध्ये दडलेले आहे. म्हणूनच झोपून उठल्यावर सर्वात पहिले स्वतःच्या हाताचे दर्शन घ्या, असे आपले शास्त्र सांगते.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।

सकाळी उठल्यावर आपले दोन्ही हात पुस्तकासारखे उघडून त्याकडे बघायचे. दिवसभरात आपल्याला या हातांनी कोणकोणती चांगली कामे करता येणार आहेत याचा आढावा घ्यायचा आणि दोन्ही हात मिटून भगवंताचे स्मरण करायचे. का? कारण आपल्या हाताच्या अग्रभागावर लक्ष्मी वास करते. म्हणून पैसे मोजताना बोटांचे अग्रभाग नकळत जोडले जातात. हाताच्या मध्यभागी सरस्वतीचा वास आहे. म्हणून आपल्या डोक्यातील कल्पना आपण हातांच्या मदतीने साकार करता येतात. ते साकार करण्यासाठी लागणारी चेतना, चैतन्य, शक्ती भगवान गोपाळकृष्णामुळे मिळते. म्हणून ‘प्रभाते करदर्शनम्!’ असे स्मरण केल्यावर लगेच उठायचे नाही, तर आपला भार पृथ्वीवर टाकण्याआधी तिची क्षमा मागायची,

समुद्र वसने देवी, पर्वतस्ननमंडिते।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यम् पाद स्पर्शम् क्षमस्वमे।।

पंचमहाभूतांनी नटलेली पृथ्वी, तिला आपला पदस्पर्श होण्याआधीच तिची क्षमा मागायची आणि आपली पावले चुकीच्या दिशेने पडू नयेत याकरिता तिने आपल्याला सावरावे म्हणून प्रार्थना करायची. दिवसभर ती आपला भार सहन करणार आहे, तिचा विसर पडू नये म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचे प्रातःस्मरण आपण केले पाहिजे अशी शिकवण आपल्याला बालपणापासून दिली गेली आहे. या दोन श्लोकांवरून आपल्याला लक्षात येईल की, आपल्या पूर्वजांनी बारीकसारीक गोष्टींचा किती सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे. आपल्याला सतत दुसऱयावर विसंबून राहण्याची सवय असते, ती सवय मोडण्यासाठी ‘कराग्रे वसते लक्ष्मी’ श्लोकाची रचना केली असावी. जेणेकरून आपल्या लक्षात येईल, ‘सगळे काही आपल्याच हातात असते!’ तर दुसरा श्लोक आपल्याला नम्र राहायला शिकवतो. आपला चुकूनही कोणाला पाय लागला, तर आपण पटकन नमस्कार करतो, ‘सॉरी’ म्हणतो. मात्र, जिच्यावर आपण सबंध देहाचा भार टाकतो, तिचे ऋण मान्य करायलाच विसरतो. तसे होऊ नये म्हणून ‘पादस्पर्शं क्षमस्वमे!’

सद्यस्थितीत या दोन्ही श्लोकांची आपल्याला नितांत गरज आहे. व्यस्त दिनचर्येमुळे रात्री लवकर झोपण्याची सवय मोडली आहे,. जागरणामुळे झोप पूर्ण होत नाही आणि आपसूक जागही येत नाही. आपली सकाळ होते ती अलार्मच्या आवाजाने! वेळ बघण्यासाठी आपण मोबाईल हाती घेतो आणि त्याचा प्रखर उजेड आपल्या किलकिल्या डोळ्यांवर पडल्यामुळे डोक्यावर अधिकच ताण येतो. दिवसभराच्या कामांची यादी डोळ्यापुढे उभी राहते आणि ती कशी पार पडणार या विवंचनेत आपण झटपट उठतो आणि कामाला लागतो. मात्र, अशा प्रकारे उठणे चुकीचे असल्याचे योगशास्त्रात म्हटले आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांवर, मेंदूवर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो हे वैद्यकीयदृष्टय़ादेखील सिद्ध झाले आहे. म्हणून ‘स्वार्थ आणि परमार्थ’ साधण्यासाठी ‘हात’ दाखवून अवलक्षण न करता ‘हात’ जोडून प्रभाते करदर्शन घेऊया.

‘कराग्रे वसते लक्ष्मी’ हा श्लोक सिद्धी मंत्र म्हणूनही सांगितला जातो. मात्र, त्याचा गुह्य अर्थ हाच आहे की, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. कर्म चांगले असेल तर यश, ऐश्वर्य आणि ज्ञान याची निश्चितच प्राप्ती होईल.