पाकिस्तान-अफगाणिस्तानचे सीमा विभाजन

  • मुजफ्फर हुसेन

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सीमावाद आहे. हा वाद कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आता या दोन्ही देशांमध्ये तार कंपाऊंडरूपी कायमची भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानला अशी भिंत बांधायची आहे तर अफगाणिस्तानला मात्र अशी भिंत नको आहे. अमेरिका तूर्तास अफगाणिस्तानच्या बाजूने दिसत असली तरी यामागे अमेरिकेचे आपले वर्चस्ववादी धोरण आहे.

दोन देश वेगळे आहेत हे दाखवून देण्यासाठी पर्वत, नदी, समुद्र अशा नैसर्गिक गोष्टींची सीमा निर्धारित करण्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची भूमिका असते. जिथे अशा नैसर्गिक बाबी उपलब्ध नसतात तिथे मनुष्य दोन देशांचे वेगळेपण दाखवून देण्यासाठी कृत्रिम सीमा आखतो आणि दोन देश वेगळे असल्याचे मानू लागतो. परंतु बऱ्याचदा अशा बळजबरीच्या सीमा आखल्यानंतर दोन्ही देशांच्या नागरिकांत विरोध निर्माण होतो. परिणामी दोन्ही देशांत वेळोवेळी लष्करी चकमकी घडू लागतात. संयुक्त राष्ट्रसंघापासून ते मोठ्यात मोठ्या जागतिक पातळीवरच्या संघटना दोन देशांमध्ये शांतता कायम राहावी याकरिता नियमित प्रयत्नरत असतात. दोन्ही देश जेथे आपली सीमा आहे असे मानतात त्या आपापल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर लष्कर तैनात करतात, परंतु सीमेबाबत समाधानकारक तोडगा निघणे शक्य नसते तेव्हा दोन्ही देशांचे लष्कर युद्धाला तयार होतात. दोन देशांमध्ये प्रत्यक्षात युद्धही होते. प्रत्यक्षात युद्धानंतरही हा प्रश्न सुटत नाहीच. युद्धानंतर दोन्ही देशांचे पहिले अतिशय अवघड काम हे असते की, त्यांना आपल्या देशाची सीमा पुन्हा ठरविण्याची आणि ती सुरक्षित करण्याचीच वेळ येते.

स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानी उपखंडात धर्माच्या नावावर हिंदुस्थानचे विभाजन झाले खरे, पण काही काळातच स्वतंत्र झालेल्या आणि एक इस्लामी राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानचे पुन्हा एकदा विभाजन होऊन एक तिसरा देश बांगलादेश जन्माला आला. १९४७ साली जीना यांनी धर्माच्या नावावर एका स्वतंत्र देशाची मागणी केली तेव्हा हिंदुस्थानने हा कडू घोट पचवत पूर्व आणि पश्चिम सीमेवर दोन तुकड्यात तयार झालेल्या पाकिस्तानला मान्यता दिली होती. अशा रितीने पूर्व आणि पश्चिम भागात दोन तुकड्यात एक इस्लामी राष्ट्र अस्तित्वात आलेही होते, पण इस्लामी किंवा एकाच धर्माचे असूनसुद्धा कालांतराने पूर्वेकडील तुकडा पाकिस्तानपासून वेगळा होऊन बांगलादेशच्या रूपाने एक नवीन राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलाच.

वास्तविक पाहता हिंदुस्थानी उपखंड अतिशय मोठा, नैसर्गिक आणि सांस्कृतिक क्षेत्र आहे. त्यातूनच श्रीलंका, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश ही राष्ट्रेही अस्तित्वात आलेली आहेत, परंतु अगदी पाकिस्तानातून वेगळा होऊन अस्तित्वात आलेल्या बांगलादेशसह श्रीलंका, नेपाळ, भूतान, ब्रह्मदेश यापैकी कोणत्याही राष्ट्रांशी हिंदुस्थानचा संघर्ष झाला नाही. याचे खरे कारण ही सर्व राष्ट्रे अखंड हिंदुस्थानी उपखंडातील एकाच हिंदुस्थानी संस्कृतीचाच भाग आहेत. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष होण्याचे कारणही नाही. फक्त धर्माच्या नावाखाली वेगळ्या झालेल्या पाकिस्तानने मात्र नेहमीच संघर्षाचीच भूमिका स्वीकारलेली आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांच्यात नेहमी घडत असलेल्या चकमकी वगळता पाकिस्तानने धर्माच्या नावाखाली तीन वेळा हिंदुस्थानशी युद्ध केले. आजही पाकिस्तानचे डोके ताळ्यावर आलेले नाहीच. हिंदुस्थानने ही परिस्थिती लक्षात घेऊन हिंदुस्थान आणि पाकिस्तान सीमेवर काटेरी तारा बांधून आपली सीमा सुरक्षित करून घेतलेली आहे. सीमा बांधूनही पाकिस्तानचा त्रास कायम आहेच, तरीही हिंदुस्थानची भूमिका कायमच शांत राहण्याची असते.

जगभरात अशी अनेक राष्ट्रे आहेत की, जी सीमा सुरक्षेसाठी तारेच्या कंपाऊंडच्या पुढे जाऊन बर्लिनसारखी भिंतच बांधून येण्या-जाण्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद करून टाकतात. अशीच वेळ सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात आल्याचे सांगितले जात आहे. हे दोन्ही देशसुद्धा मुस्लिम राष्ट्रेच आहेत. तरीही बर्लिनप्रमाणे सीमेवर भिंत बांधली तरच आपला देश सुरक्षित राहील असे त्यांनाही वाटते. क्वेट्टाहून प्राप्त होणाऱ्या बातम्या पाहता दोन्ही राष्ट्रांची सीमेवर बर्लिनप्रमाणे भिंत बांधण्याची तयारी आहे. एकदा का बर्लिनप्रमाणे भिंत बांधली की आपल्या सीमेचा प्रश्न कायमचाच सुटेल असे त्यांना वाटते. वास्तविक पाहता हा प्रांत अखंडच होता, परंतु आजचे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे दोन्ही प्रांत तत्कालीन ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते. १८९३ मध्ये तत्कालीन ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी आपल्या वसाहतवादी, स्वार्थी आणि दूरगामी धोरणानुसार पहिल्यांदा या दोन्ही देशांच्या मध्ये प्रत्यक्ष सीमा आखली होती. परंतु जोपर्यंत हे दोन्ही प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यात होते तोपर्यंत या दोन्ही प्रांतातील नागरिकांमध्ये कधीच संघर्ष झाला नाही. परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांच्यात सीमेवरून संघर्ष सुरू झाला, सीमेवर चकमकी घडू लागल्या. दोन्ही राष्ट्रे ही मुस्लिम असली तरी सत्तेपुढे धर्मही गौणच होऊन जात असतो. परिणामी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात सीमाविवाद वाढतच गेला.

पेटलेल्या या आगीवर अमेरिका तेल ओतत आहे. अमेरिकेचे धोरणच आहे की, दोन्ही देशांना भांडणात गुंतवून ठेवायचे आणि स्वतःचा प्रभाव कायम राखायचा. प्रत्यक्षात काबूल सरकारला अशी भिंत नकोशी आहे. त्यामुळे त्यांचा या भिंतीबाबत विरोध आहे. आजच्या परिस्थितीत अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात आणि अफगाणिस्तानच्या बाजूने असल्याचे दिसून येते. मुळात अमेरिका हिंदुस्थानी उपखंडात आपले महत्त्व कायम राखण्याची आणि आपले स्थान बळकट करण्याचीच चाल खेळत आहे.

पख्तूनी भटक्या जमातींना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील या सीमेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना नेमकी सीमा कोणती याचे ज्ञानही नाही आणि ज्या भागात या दोन देशांतील सीमा असल्याचे दिसून येते त्याकडे ते सरळ दुर्लक्षच करतात. याचे कारण गेली शेकडो वर्षे ते नैसर्गिक सहजीवन जगत आहेत आणि भौगोलिक सीमारेषांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यांची दोन्ही देशांत असलेल्या आपल्या आदिवासी भागात ये-जा चालूच असते. आगामी काळात मात्र या भटक्या पख्तूनी जमातींना बर्लिनसारख्या भिंतीचा मुकाबला करण्याची वेळ येऊ शकते. ही प्रस्तावित भिंत काही लहान नाही. चांगली अडीच हजार किलोमीटर लांबीची आहे. ती तूर्तास तार कंपाऊंडच्या स्वरूपात असेल. त्याची सुरुवात चीनपासून होईल. पख्तूनी लोकांना नागरिकतेचा पुरावा म्हणून पासपोर्ट, आयडेंटी कार्ड वगैरे बाळगावे लागेल.

येथे अशी अनेक क्षेत्रे आहेत, जी स्थानिक रहिवाशांना आपल्या देशाचे नागरिक असल्याचे सिद्ध करण्यापेक्षा त्यांचे स्थानिक पख्तूनी असणे आणि पख्तूनी म्हणून त्यांच्या जमातींचे एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या त्यांच्या पख्तूनी परंपरा आहेत. त्या पाळणे त्यांच्या दृष्टीने सन्मानजनक आहे, परंतु पाकिस्तानला तसे वाटत नाही. चमन नावाच्या पाकिस्तानी शहरातील एक अर्धसैनिक दलाचे स्थानिक कमांडर कर्नल मोहम्मद उस्मान म्हणतात की, सीमा ठरवणारी भिंत जर बर्लिनमध्ये होते, आता मेक्सिकोमध्येही होत आहे तर ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये का होऊ शकणार नाही?

[email protected]