गाडगेबाबा

  • नमिता वारणकर

गाडगेबाबा… स्वच्छतेचा, समाजसुधारणेचा ध्यास घेऊन त्यासाठी हाती खराटा घेऊन निघालेले संत…
येत्या २० तारखेच्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

माजात स्वच्छतेचे बीज पेरून अंधश्रद्धा, अज्ञान यांच्या जोखडात अडकलेल्या गोरगरीबांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे संत गाडगेबाबा… खेड्यापाड्यातली माणसे व्यसनाधीनता आणि निरक्षरता यापासून मुक्त व्हावीत यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य खर्ची घातले. लहानपणापासून प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या गाडगेबाबांनी सामाजिक परिवर्तनासाठी सतत पन्नास वर्षे समाजाचे प्रबोधन केले. आजच्या काळातही त्यांची दिलेली स्वच्छतेची शिकवण आचरणात आणण्याची आवश्यकता आहे.

अखंड सेवाव्रत अंगीकारलेले ते स्वच्छतेचा मूलमंत्र देत गावोगावी फिरत असत. त्यांच्याजवळ असलेल्या फुटक्या गाडग्यामुळे त्यांना ‘गाडगेबाबा’ नाव पडले.

ज्या गावी जायचे त्या गावी स्वतः खराटा मारून ते गाव स्वच्छ करत. मगच कीर्तन सुरू करत. कीर्तनात लोकांनाच प्रश्न विचारून ते त्यातून उपदेश करत. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी आणि पंढरपूर येथे धर्मशाळा बांधल्या. रंजलेगांजले, गरीब, अनाथ, अपंग लोकांसाठी अन्नछत्रे उभी केली. फिरते दवाखाने सुरू केले. कुष्ठरोग्यांची सेवा केली. देव दगडात नसून माणसात आहे ठसवण्याचा प्रयत्न करणारे गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांना गुरू मानीत. तसेच मी कोणाचा गुरू नाही. मला कोणी शिष्य नाही असेही ते म्हणत.

ते आपल्या कीर्तनातून लोकांना उपदेश करताना सांगत, भुकेलेल्या जिवांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या,
समाजकार्य करत असताना लोक बाबांना विचारीत बाबा, आम्ही अडाणी ! आम्हाला धर्म कळत नाही आम्ही जगावे कसे, वागावे कसे? त्यावर बाबा म्हणत, धर्म सांगायचा नसतो, जगायचा असतो. धर्म ग्रंथांत नसतो जीवनात असतो.

बाबांची दशसुत्री

जे दुःखी व निराश आहेत त्यांना जगण्याची हिंमत द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब मुलगा-मुलींचे लग्न करून त्यांचा संसार उभा करा.

जे उघडेनागडे आहेत त्यांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या, बेकारांना रोजगार द्या.

सावकारांकडून कर्ज काढू नका, चैन करू नका, कष्टाशिवाय भाकरी खाऊ नका.

दारू पिऊ नका, प्राण्यांची हत्या करू नका असा संदेश देत गावोगावी हिंडत.

रस्त्यांची स्वच्छता
रस्त्यात थुंकणे, दुकाने, रेल्वे स्थानके, बस स्थानके, शाळा येथे कचरा टाकणे इत्यादींमुळे दुर्गंधी पसरून रोगराई पसरते. रस्त्यावर थुंकू नये यासाठी सरकारला दंड आकारवा लागतो. ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

परिसर स्वच्छतेचे महत्त्व
परिसर आणि घराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे. यातील बऱ्याचशा समस्या निकृष्ट राहणीमान आणि स्वच्छतेच्या सवयी न पाळल्याने होतात.

अशिक्षित नाही, तर बहुतांश वेळा सुशिक्षित व्यक्तीही स्वच्छतेची सवय नसणे, अव्यवस्थितपणा या अवगुणांमुळे परिसरात कुठेही कचरा फेकणे, कचरापेटीत कचरा न टाकणे, उघड्यावर शिळे अन्न फेकणे, थुंकणे अशा कृती केल्या जातात. यामुळे परिसर अस्वच्छ होऊन डासांची निर्मिती होते. त्याचा परिणाम म्हणून अनेक आजारांना तोंड द्यावे लागते.

स्वच्छतेच्या मूलमंत्राची आजही गरज
सार्वजनिक हिताची कामे सगळ्यांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा संत गाडगेबाबांनी गावकऱ्यांना शिकवला. त्यांनी वनवासातही लोकसेवेचे क्रत अंगीकारले. सार्वजनिक स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजवण्यासाठी सतत तळमळीने प्रयत्न केले. यासाठी कीर्तनाचा अवलंब केले. त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या मंत्राची आजही समाजाला गरज आहे. आपले कार्यालय, परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता प्रत्येकाने स्वतःहून प्रयत्न करायला हवेत. स्वतःबरोबर इतरांमध्येही जागरुकता निर्माण व्हावी यासाठी एकमेकांना मदत करायला हवी. काही वेळा फक्त स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्याच्या अट्टहासापायी घराबाहेर नको त्या ठिकाणी केरकचरा टाकला जातो. हे टाळायला हवे आणि संत गाडगेबाबांची शिकवण अंगीकारण्याची आज गरज आहे.

शौचालय स्वच्छता
यामध्ये कार्यालय, रस्त्यांवरील शौचालय हा भाग यामध्ये येतो. यांचा वापर करतानाही भरपूर पाण्याचा वापर करणं, कुठेही अनावश्यक कचरा न टाकणं, केस विंचरून केसांची गुंतवळ शौचालयात फेकणं यामुळे तिथे पाणी साचून राहते आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यासाठी सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जर ते स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर ते स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीला वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.