तरतूद भविष्याची…

  • नितीन फणसे

आजी-आजोबांना फक्त देणं ठाऊक. पण आजच्या काळात स्वतःच्या भविष्याची तरतूदही महत्त्वाची ठरते.

ध्या हिंदुस्थानात ज्येष्ठ नागरिकांची म्हणजे वयाची ६० वर्षे उलटलेल्या नागरिकांची संख्या साडेनऊ कोटी एवढी आहे. यातील ८० लाख लोकांचे वय ८० वर्षांच्या पुढे आहे. शरीराने कितीही फिट असलो तरी निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्याही मजबूत असण्याची खूप गरज असते. निवृत्तीचा काळ जवळ येतो तसतशी भविष्याची काळजी मनात फेर धरायला लागते. सरकारी नोकरी असेल तर पेन्शन बऱ्यापैकी मिळते, पण सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळालेली नसते. खासगी क्षेत्रात पेन्शन जास्त मिळत नाही. अशा वेळी भविष्यात आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे सुरक्षित वाटण्यासाठी जीवन विमा पॉलिसींचा बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. जीवन विमा पॉलिसी असतील तर निवृत्तीनंतरच्या कालावधीसाठी आणि आपल्यानंतर आपल्या वारसांसाठी काहीतरी ठेवल्याचे समाधान असते. म्हणून नोकरीच्या काळातच एलआयसी पॉलिसीज घेऊन ठेवायच्या.

एलआयसी पॉलिसींची गरज बऱ्याच कारणांसाठी असू शकते. सर्वात पहिले कारण म्हणजे कुटुंबाला आधार. कारण निवृत्तीनंतर घरातील कर्त्या माणसाचे उत्पन्न एकाएकी थांबते. पेन्शन मिळून तरी कितीसे मिळणार… त्यात मुलांचे शिक्षण, पत्नी व आपले आजारपण यासाठी तरतूद असावीच लागते. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. गाठीशी दोन पैसे असतील तर समाजात मानही मिळतो. निवृत्त झाल्यानंतर पैशासाठी वणवण फिरण्याऐवजी जीवन विम्याच्या पैशांचा उपयोग होऊ शकतो. दुर्दैवाने कर्ता माणूस निघून गेला तर त्याच्या मागे कुटुंबीयांचे हाल होऊ नयेत यासाठीही जीवन विम्याची गरज असते.

केवळ एलआयसीच नाही, तर अनेक कंपन्यांतर्फे जीवन विमा पॉलिसीज आलेल्या आहेत. जीवन विमा पॉलिसीज दोन प्रकारांत असतात. पहिला प्रकार म्हणजे ‘होल लाईफ इन्शुरन्स प्लान’ आणि दुसरा ‘टर्म लाईफ इन्शुरन्स प्लान’. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गॅरंटीड लाईफ इन्शुरन्स प्लान’ असतो. तो पाहूनच कोणतीही पॉलिसी घ्यायची. होल लाईफ पॉलिसीमध्ये २० ते २५ वर्षे विम्याचा प्रीमियम भरत राहून तेवढी वर्षे झाल्यानंतर मॅच्युरिटी मिळते. पण टर्म लाईफ इन्शुरन्स प्लान्समध्ये ठरावीक वर्षे आपण निवडायची असतात. तेवढ्या वर्षांनंतर आपली जमा रक्कम परत मिळते. काही पॉलिसीज मनी बॅकही असतात. ठरावीक वर्षांनी एक ठरावीक प्रमाणात रक्कम मिळते. या वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसींचा नीट अभ्यास करून भविष्याची तरतूद म्हणून कोणती पॉलिसी योग्य ठरेल ते ठरवायचे.

८० व्या वयानंतरही सुविधा
ठरावीक वयानंतर जीवन विम्याची सुविधा मिळत नाही असं काहीजण म्हणतात. वास्तविक असे काही नसते. ८० व्या वयानंतरही ज्येष्ठ नागरिकांना जीवन विम्यासाठी अर्ज करून विमाकवच मिळवता येते. एलआयसीच्या पॉलिसीज यासाठी वय वर्षे ८५ नंतरही घेता येण्यासारख्या पॉलिसीज आहेत. वयाची पासष्ठाr पूर्ण केलेल्यांना, पन्नाशी पूर्ण केलेल्यांना तसेच सत्तरी गाठलेल्यांनाही विम्याची सुरक्षितता मिळवता येते. यासाठी आपला फिटनेस एलआयसीला पटवून द्यावा लागतो इतकेच.

असे मिळतात फायदे

  • ज्येष्ठांना एकटेपणाची जाणीव होऊ नये, निवृत्तीनंतरही त्यांना ताठ मानेने जगता यावे आणि कुणाच्याही पाठिंब्याशिवाय स्वतःच्या पायावर उभे राहाता येते.
  • निवृत्तीनंतरच्या पैशांची काळजीच मिटते. ऍन्युईटी सुविधेमुळे वर्षाला ठरावीक रक्कम हातात पडते. यामुळे मनाला समाधान मिळते.
  • नोकरीत असताना जीवन विमा पॉलिसींवर आयकरात सूटही मिळते.
  • आपल्यानंतर कुटुंबीयांचे काय, हा विचार निघून जातो.
  • जीवन विमा पॉलिसींमुळे वृद्धापकाळात कोणत्याही प्रकारचा खर्च, मेडिकल सुविधा भागवता येणे शक्य होते.
  • पॉलिसीद्वारे आलेले पैसे मुला-बाळांच्या कल्याणासाठी वापरता येते.

लक्षात ठेवा हे प्लान्स

  • रिलायन्सच्या लाईफ सुपर प्लानमध्ये एसआयपीद्वारे दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतवून भविष्य सुरक्षित करता येते. त्यांचे आठ वेगवेगळे फंड आहेत. आपल्याला हवा तो त्यातून निवडता येतो. विशेष म्हणजे एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये कधीही स्वीचओव्हर करता येते. मुदतपूर्तीनंतर टॅक्सफ्री रक्कम मिळू शकते.
  • एलआयसीच्या न्यू जीवन निधी प्लानमध्येही बरेच फायदे आहेत. यात सर्वसाधारण मृत्यूनंतर मिळणाऱ्या फायद्यांबरोबरच अपघाती निधनाचेही फायदे मिळतात.
  • वरिष्ठ पेन्शन विमा योजना या एलआयसीच्याच प्लानमध्ये वर्षभरात ऍन्युईटीची रक्कम कधी हवी, कशा हप्त्यात हवी ते ज्येष्ठ नागरिकांना निवडता येते.