निःशस्त्र क्रांतिकारक येसूवहिनी

>> प्रतीक राजूरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वहिनी येसूवहिनी यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान सांगणारा लेख. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढयात अनेक महान राष्ट्रभक्तांचे योगदान आहे, पण या स्वातंत्र्य लढयात सर्वात जास्त उपेक्षा ही क्रांतिकारक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याच वाटयाला आली, विशेष करून स्त्रियांनी आलेल्या परिस्थितीचा धैर्याने केलेला सामना अतुलनीय आहे.

सावरकर कुटुंबातील स्त्रियासुद्धा त्याला अपवाद नाहीत. मुळात सावरकर कुटुंबातील तात्यारावांचीच उपेक्षा स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात झाली तिथे सावरकर कुटुंबातील व्यक्तींच्या अभूतपूर्व त्यागाला सन्मान मिळणे दुरापास्तच आहे. मध्यमवर्गीय फडके कुटुंबातील यशोदा यांचा भगूरचे जहागीरदार सावरकर यांचा ज्येष्ठ पुत्र गणेश सावरकर यांच्या सोबत विवाह झाला. घरातली मोठी सून म्हणून घरातील जबाबदारी यशोदा यांच्यावरच आली. यशोदा, तात्याराव त्यांची बहीण साधारणपणे एकाच वयोगटातले. यशोदा या सर्वांच्या येसू वहिनी झाल्या. त्यांच्यात जिव्हाळा सारखाच. नारायणराव सर्वात लहान म्हणून त्यांना सर्व बाळ म्हणत.

इकडे दामोदर सावरकरांचे प्लेगने निधन झाले आणि तिकडे नारायणराव सावरकरांना लहान वयात प्लेगने गाठले. प्लेगच्या भीतीने कुणीही आप्तस्वकीय भेटण्यास टाळाटाळ करायचे, पण त्याही परिस्थितीत येसू वहिनींनी लहानग्या नारायणरावांची मातेसमान सेवा शुश्रूषा केली. नाशिकच्या रामभाऊ दातार यांच्या मदतीने नारायणराव सावरकर यांना इस्पितळात भरती करून सर्व सावरकर कुटुंबीयांना त्यांनी आपल्या घरी आश्रय दिला. दामोदर सावरकरांच्या निधनानंतर सावरकर घराण्याच्या जहागीरदारीला उतरती कळा लागली. आर्थिक अडचणींमुळे तात्याराव आणि नारायणराव यांचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता येसू वहिनींनी आपले लक्ष्मीरूपातील सर्व दागदागिने दोन्ही दिरांना सरस्वतीचे अध्ययन होवो म्हणून अर्पण केले. ईश्वराने सावरकर बंधूंचे मातृछत्र हिरावून घेतले असले तरी पण येसू वहिनींच्या रूपात पुन्हा मातृत्व बहाल केले होते, त्यांना मातृत्वाची उणीव येसूवहिनींमुळे कधीच जाणवली नाही, न येसूवहिनींना कधी आपल्या अल्पायुषी अपत्यांची. तात्याराव सावरकरांनी बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाल्यावर आपल्या वहिनीला लिहिलेल्या पत्रात येसू वहिनींचे असे वर्णन केले आहे,

जयासी तुवां प्रतीपाळले। मातेचे स्मरण होऊ न दिलें
श्रीमती वहिनी वत्सले। बंधू तुझा तो तुज नमी।।

घरातच नाहीतर राष्ट्र कार्यातसुध्दा येसूवहिनींचा सहभाग होता. येसूवहिनींनी आत्मनिष्ठ युवती संघ स्थापन करून स्वदेशीचे महत्त्व, राष्ट्रभक्तिपर गीत, स्वातंत्र्याचे महत्त्व सारखे उपक्रम त्या राबवीत असत. तात्यारावांच्या विलायतेला प्रयाणानंतर सावरकर कुटुंबीयांवर आता एका मागून एक आघात सुरू झाले. घरातील मोठय़ा भावाची पत्नी आणि इतरांना मातृतुल्य असलेल्या येसूवहिनींना त्याची झळ सर्वात आधी बसायची. तात्यारावांचा मुलगा प्रभाकर अल्पायुषी ठरला. त्याच्या वेदना संपत नाहीत तोच बाबाराव सावरकर यांना अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली. नारायणराव शिक्षणाकरिता बाहेर, तात्याराव इंग्लंडला, मुलाचा मृत्यू झाल्यावर तात्यारावांच्या पत्नी माहेरी होत्या. बाबारावांवरील आरोपामुळे रात्री-अपरात्री इंग्रज अधिकाऱयांची घरावर धाड पडायची. त्याही परिस्थितीत येसूवहिनी धैर्याने सामोरे गेल्या.

नियतीचे सावरकर कुटुंबीयांवर वज्राघात सुरूच होते. बाबारावांच्या जन्मठेपेनंतर घरावर इंग्रजांनी जप्ती आणली. अंगावरच्या कपडय़ानिशी दोन क्रांतिकारकांच्या या असामान्य सहचारिणी मोजकेच सामान घेवून बेघर झाल्या. तात्यारावांच्या पत्नींचे वडील जव्हार संस्थानाचे चाकरमानी असल्याने आश्रय दिला म्हणून त्यांचेवर इंग्रजांचा राग येऊ नये या कारणास्तव येसू वहिनींनी येण्यास नकार दिला. याच कारणास्तव त्यांच्या मामानेसुद्धा आश्रय देण्यास असमर्थता दर्शविली. काही दिवस दातार यांच्याकडे घालवून येसू वहिनींनी देवळातील खोलीत आपला मुक्काम हलविला. काही दिवसांनी नारायणरावांना अटक झाली. हे सर्व तात्यारावांना कळल्यावर तात्यारावांनी येसूवहिनींना पत्र पाठवून या शब्दांत धीर दिला,

अमर होय ती वंशलता। निर्वंश जिचा देशा करिता।
दिंगती पसरे सुगंधता। लोकहित परिमलाची।।

नियतीने आपल्या क्रौर्याची परिसीमा ओलांडूनही येसूवहिनींची सहनशक्ती आपल्या कुटुंबाच्या देशाप्रतीच्या त्यागाने नियतीला समर्थपणे तोंड देत होती. नारायणरावांच्या सुटकेमुळे येसूवहिनींना पुन्हा आधार मिळाला. तात्यारावांच्या सहकारी कामा मॅडम काही पैसे पाठवत असत त्यात नारायणरावांचे शिक्षण आणि येसूवहिनींचा उदरनिर्वाह चालत असे, पण अनेकदा उपाशी पोटीसुद्धा झोपण्याची वेळ येई. देवळातल्या खोलीत त्यांचा एकटीचा संसार चालायचा, तर अनेकदा तात्यारावांच्या पत्नी त्यांच्या समवेत असत.

तिकडे तात्यारावांना अटक होऊन जन्मठेपेची शिक्षा झाली आणि सावरकर कुटुंबीयांवर जणू आभाळच कोसळले. येसूवहिनी, तात्यारावांच्या पत्नी यांना पुन्हा आपल्या पतींचे दर्शन होईल का याची विवंचना होती. अंदमानच्या कोठडीतून बाहेर येणे म्हणजे पुनर्जन्मच होता. तिकडे नारायणरावांनी आपले वैद्यकीय शिक्षण त्याही परिस्थितीत पूर्ण केले. संकटांचे पहाड कोसळूनसुद्धा येसू वहिनींनी नारायणरावांच्या विवाहात आपले कर्तव्य वरमाता म्हणून पार पाडले. त्यांच्या दुःखात वाटा उचलण्यास आता सावरकर कुटुंबात शांताबाई यांचा नारायणरावांच्या पत्नीरूपात अजून एक सदस्य आला होता. नारायणरावांचे बाबाराव आणि तात्यारावांना अंदमान भेटीचे शासकीय स्तरावर प्रयत्न चालविले होते. परवानगीची वाट बघत सावरकर कुटुंबीय एक एक दिवस काढत होते, १२-१३ वर्षं येसूवहिनी आणि तात्यारावांच्या पत्नी दर्शनास आतुर होत्या, पण नियतीने अजूनच वेगळे लिहून ठेवले होते. या सर्व एकामागोमाग आलेल्या संकटांनी येसूवहिनींच्या मनावर परिणाम झालाच. त्यांना बाबाराव सुटून आल्याचा भास व्हायचा, आणि त्यांचे स्वागत करण्यास आतुर होऊन त्या बाबारावांच्या स्वागताची तयारी करा, पंचारती द्या, असे ओरडत धावत सुटायच्या. त्यांची दुर्दशा बघवत नव्हती. या परिस्थितीत आपल्या पतीच्या दर्शनाकरिता व्याकूळ कपाळावरील सौभाग्याच्या कुंकवासमवेत या माऊलीने अखेरचा श्वास घेतला. तात्याराव आणि नारायणरावांची मातृतुल्य वहिनी आपल्या देशाचे स्वातंत्र्य न बघता, स्वतःच्या अंगावरील संकटे झेलून आयुष्यातून स्वतंत्र झाली आणि सावरकर बंधूंना अंदमानास भेटण्याची परवानगी मिळाल्याचा लेखी आदेश आला. ४-८ दिवस अगोदर ही परवानगी मिळाली असती तर कदाचित येसूवहिनींचे आयुष्य वाढले असते. सत्यवान सावित्रीला हेवा वाटावा असे तपस्वी आयुष्य येसूवहिनींचे होते. त्यांच्या सारख्या असंख्य वीरमाता आणि वीरपत्नींच्या अदृश्य हातांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यात आपल्या सांसारिक सुखाच्या आहुत्या दिल्या. स्वतःच्या आयुष्यातील अंधकारास धैर्याने सामोरे गेल्यामुळे आपल्या नशिबात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवली.

तात्याराव सावरकरांसारखे भाषाप्रभू जेव्हा पत्रात येसूवहिनींना ‘तू धैर्याची असशी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती’ म्हणून वर्णन करतात. त्यातून येसूवहिनींच्या धैर्याची प्रचीती येते, सावरकर कुटुंबातील या माऊलीच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी टाकून सावरकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीचा यज्ञकुंड पेटविला, त्यातील येसूवहिनींच्या निःशस्त्रक्रांती कार्याला विनम्र अभिवादन.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या