गॅरेज एका फोनसरशी

प्रवास करत असताना अचानक गाडी बंद पडली… दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास… आजूबाजूला गॅरेज शोधताय… जवळपास मेकॅनिकही नाही… गाडी गॅरेजपर्यंत नेण्याची चिंता सतावतेय… पण आता काळजी करायची गरज नाही. कारण आता एका फोनवर गॅरेज तुमच्या दारी पोहोचणार आहे. ही आगळीवेगळी संकल्पना आहे डोंबिवलीच्या सागर जोशी या तरुणाची.

सागर जोशी आर.एस.ए. ऑटोकेअर प्रा. लि. या कंपनीचे संचालक आहेत. ते २०१५ साली आपल्या मित्रांबरोबर शिर्डीला जात असताना रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांची गाडी अचानक बंद पडली. जवळपास कुठेही गॅरेज नव्हते, काय करायचे कळत नव्हते. सागर स्वतः ऑटोमोबाईल इंजिनीअर असूनही आवश्यक साधनं जवळ नसल्यामुळे काहीच करू शकत नव्हते. गाडी पूर्ववत करण्यासाठी आठ ते नऊ तास त्यांचा खोळंबा झाला. अशावेळी त्यांच्या मनात विचार आला की या समस्येला अनेकांना तोंड द्यावे लागले असेल, इतरांसोबत व्हायला नको या विचारातून त्या रात्री आरएसए या संकल्पनेची निर्मिती झाली. आज प्रवास करत असताना अनेक समस्या येतात. अचानक गाडी बंद पडते. अशावेळी गॅरेजच्या शोधात ग्राहकांना फोनाफोनी करण्यात, शोधाशोध करण्यात तासन्तास घालवावे लागतात. पण फक्त एका फोनवर जर या समस्यांचे निवारण होत असेल तर कोणाला आवडणार नाही? या सगळ्या समस्या लक्षात घेऊन सागर जोशी यांनी तंत्रज्ञानाचा वापर ‘आर.एस.ए. ऑटोकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ या टेक्नॉलॉजी-ड्रीव्हन स्टार्ट-अपची निर्मिती केली आहे. हे स्टार्ट-अप १० सप्टेंबर २०१५ रोजी सुरू झाले असून आज या क्षेत्रातील पहिले सक्सेसफुल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यासाठी त्यांनी सध्याच्या काळातल्या ग्राहकांची समस्या लक्षात घेऊन त्यांना कशा पद्धतीने आणि किती तत्परतेने सेवा पुरवता येईल या बाबतीत विचार केला आहे.

एखादी गाडी रस्त्यात खराब झाल्यास अथवा बंद पडल्यास आठ प्रकारची मदत तुम्हाला लागते. तर ही मदत ‘आर.एस.ए. ऑटो आय केअर’ चोवीस तास सेवा तुम्हाला देत आहे. ‘आर.एस.ए. ऑटो आय केअर सेंटर’ हे आर.एस.ए. ऑटोकेअरचे पुढचे पाऊल आहे. या योजनेनुसार स्थानिक गॅरेजेस एक सोयीसुविधांनी सुसज्ज असे कार वर्कशॉप ग्राहकांपर्यंत सर्व्हिस पोहोचवू शकतात. आपल्याकडे स्वतः चालून येणारे हे सुसज्ज गॅरेज ग्राहकांसाठी नक्कीच फलदायी ठरणार आहे.

ग्राहकांसाठी सुविधा

रोडसाईड असिस्टंन्स डॉट हेल्प हे कंपनीचे संकेतस्थळ असून कंपनीचे ऍपदेखील ऍन्ड्रॉईड युझर्ससाठी चोवीस तास उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत हे ऍप सुरू होईल. ग्राहकांनी १८०० १२० १२०३ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तासाभरातच मदत मिळेल, असे सागर जोशी यांनी सांगितले.

अशी सेवा आहे

गाडीत बिघाड झाल्यास ‘आर.एस.ए. ऑटो आय केअर’ हे गॅरेज कमीतकमी वेळेत तुमच्या मदतीस तत्पर असणार आहे. वर्षभरात आर.एस.ए. ऑटोकेअर या कंपनीने हिंदुस्थानातील तब्बल १८००० गॅरेजेस सोबत संपर्क साधला. सर्व गॅरेजेस स्थानिक आहेत. पण यात फायदा असा झाला की, दुर्लक्षित आणि माहिती नसलेली गॅरेजेस प्रकाशझोतात येतील आणि त्यांना महत्त्व प्राप्त होईल. यामुळे आज कित्येक डगमगलेले व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने उभे राहतील, अशी कंपनीला अपेक्षा आहे. या कंपनीने सामान्य माणसासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.