मी तात्या बोलतोय

  • शिरीष कणेकर

‘हॅलो ’
‘हॅलो.’
‘मी तात्या बोलतोय.’
‘कोण तात्या?’
‘तात्या-तात्या’
‘ऐकलं मी पण कळलं नाही.’
‘तात्या हो.’
‘तेच तेच परत बोलल्यानं माझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही. पुन्हा विचारतो – कोण तात्या?’
‘तुम्ही मला तात्या म्हणूनच ओळखता.’
‘मी कोणाही तात्याला ओळखत नाही. तात्याराव सावरकर होते, पण मी त्यांना ओळखत नव्हतो. डॉ. तात्या लहाने यांनाही मी ओळखत नाही. मी डोळे तपासायला दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पेंटँग्युलरच्या जमान्यात पारसी स्टँडमधले पारशी प्रेक्षक ईस्ट स्टँडमधल्या मराठी प्रेक्षकांची ‘ए तात्या’ म्हणून निर्विष चेष्टा करीत. त्यातले तुम्ही कोणते तात्या?’
‘कमाल आहे यार. अख्खी दुनिया मला तात्या म्हणून ओळखते.’
‘मी तुमच्या दुनियेतला नसेन कदाचित. असतात काही माणसं परग्रहावरची. उदाहरणार्थ, विजय मल्ल्या. तात्या सोडून तुमची वेगळी काही ओळख असेल तर कृपया सांगा. मला मानसिक थकवा यायला लागलाय.’
‘ठिक आहे. तो वारला ना, त्याच्या खाली राहतो मी.’
‘ही ओळख अचूक आहे, पण वरच्या मजल्यावर राहून वारलेल्या माझ्या माहितीतल्या सगळ्यांची नावं मला आठवावी लागतील. त्यानंतर त्यांच्या खाली कोण कोण राहत होते ते आठवावं लागेल. त्यानंतर त्यातला तात्या कोण हे शोधून काढावं लागेल. त्यात प्रदीर्घ काळ जाईल. तुमचं टेलिफोन बिल भयंकर वाढेल. माझी बहुमोल वेळ चुलीत जाईल. काय करताय?’
‘आणखी एक ओळख सांगतो.’
‘सांगा – सांगा, माझी उत्सुकता तुटेपर्यंत ताणली आहे. तुम्ही तात्या टोपे तर नाही? पण शालेय इतिहासानुसार तात्या टोपे हयात नाही. तुम्ही चांगलेच हयात दिसताय. दिसताय म्हणजे टेलिफोनवरून दिसत नाही हो, ती बोलण्याची एक पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ कॉल करता का? म्हणजे तुमचा चेहरा पाहून मी तुम्हाला कदाचित ओळखू शकेन. हा चेहरा आणि हा तात्या अशी हा सूर्य व हा जयद्रथ अशी मी सांगड घालू शकेन.’
‘माझ्याकडे मोबाईल नाही.’
‘तसा माझ्याकडेही नाही म्हणा. लेटस् कंटीन्यू.’
‘हां, तर आणखी एक ओळख देतो. मी तुमच्याकडे कोलंबी पाठवली होती.’
‘कोलंबी? मला बाधते.’
‘पण मी पाठवली होती. तुम्हाला मिळाली की घेऊन येणाऱ्या बुटल्यानं मधल्या मध्ये ती फस्त केली?’
‘कोण बुटल्या? तात्या कोण कळायच्या आधीच हा नवीन बुटल्या दाखल होतोय.’
‘तुम्हाला बुटल्याही माहीत नाही? शिवाजी पार्कला डोळे उघडे ठेवून फिरता ना?’
‘हो, पण मी पुरुषांकडे बघत नाही. तात्या कोण सांगताय ना? तुम्हाला आडनाव वगैरे काही असेल ना?’
‘अक्षयकुमारला आडनाव असेलही, पण आडनावावरून त्याला कोण ओळखतं? तो अक्षयकुमार तसा मी तात्या.’
‘अक्षयकुमारला माहीत असेल का, तात्या कोण ते?’
‘त्याला माहीत असेल का, मी कसं सांगू? तोही तुमच्यासारखाच असेल तर त्यालाही माहीत नसणार.’
‘आधारकार्डावर तुमचं पूर्ण नाव असणारच.’
‘तिथंही तात्याच आहे.’
‘काय सांगताय? मला हे मोदीजींच्या कानावर घालावंच लागेल.’
‘मोदीजीही मला तात्या या नावानंच ओळखतात.’
‘आणि अमित शहा?’
‘मी त्यांना ओळख देत नाही.’
‘आणि आशीष शेलार, जितेंद्र आव्हाड या मातब्बर मंडळींचं काय?’
‘कोण आहेत हे लोक? तात्या ऐऱ्यागैऱ्यांना ओळखत नाही. राम रहीम, सुब्रतो रॉय, छगन भुजबळ, आसाराम बापू यांसारख्या दिग्गजांबरोबर तात्याची उठबस असायची. आता ते ‘आत’ आहेत, तात्या ‘बाहेर’ आहे.
‘तात्याजी, तुम्ही मला फोन केलायत म्हणजे मी आता ‘बाहेर’ असलो तरी नजीकच्या भविष्यकाळात ‘आत’ जाण्याची दाट शक्यता आहे असा अर्थ होतो काय?’
‘नाही नाही, शेजारच्या कांदळगावकरांना बोलवा हे सांगायला मी फोन केलाय.’
‘आमच्या शेजारी किंवा फॉर दॅट मॅटर आमच्या बिल्डिंगमध्येही कोणी कांदळगावकर राहत नाहीत.’
‘काय सांगताय? तात्याला कोणीतरी चुकीचा नंबर दिलेला दिसतोय. तुम्ही खालमुंडे ना?’
‘नाही, मी पाताळधुंडे.’
‘सॉरी, ठेवा फोन.’
‘ठेवतो, पण म्हणजे याचा अर्थ तात्या कोण हे न कळताच मी इहलोक सोडणार तर!’
‘तुमचं दुर्भाग्य म्हणायचं.’
[email protected]