‘26/11’चा हल्ला : ‘स्लीपर सेल’ मोकाट का?

>> प्रा. केशव आचार्य  

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मुंबई येथील सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या लष्करातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे, अशी बातमी मध्यंतरी वाचली. याबाबत प्रश्न असा निर्माण होतो की या हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणार्‍या स्थानिक हस्तकांना कधी पकडणार? पाकिस्तानमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयात 26/11च्या हल्ल्याबाबत खटला पुन्हा सुरू झाला आहे. अमेरिकेने हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली  याला 35 वर्षांची शिक्षा केली आहे. मुंबईवरील हल्ला हे हिंदुस्थानविरुद्ध एकप्रकारचे युद्धच होय. त्यामुळे आता भूमिगत मदतनीसांचा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे.  

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ताज हॉटेलमधील धुमश्चक्रीत दहशतवादी सर्वत्र एखाद्या माहितगाराप्रमाणे सीसी टीव्ही कॅमेरे चुकवून फिरत होते. हॉटेल मॅनेजरच्या फ्लॅटमध्ये अगदी अचूक घुसून दहशतवाद्यांनी त्याला ठार मारले. सर्व दहशतवाद्यांकडे बंगलोरमध्ये बनवलेली ओळखपत्रे होती. हल्ल्याला मदत करणारे बहुतेक सर्व स्लिपर सेल अजून मोकाट फिरत आहेत. तरीही त्याबाबत आपली शासकीय यंत्रणा अजूनही निष्क्रिय दिसते आहे. स्थानिक मदतनिसांवरुद्ध पुन्हा तपास सुरू करून त्यांच्यावर खटला भरण्याची आवश्यकता आहे. सुदैवाने मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या अबू हमजा (जिंदाल) ऊर्फ झबिउद्दिन अन्सारी हा सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये दुसर्‍या एका गुह्याखाली शिक्षा भोगतो आहे. हल्ल्याच्या वेळी तो हिंदुस्थानात नव्हता. कराचीहून 10 पाकिस्तानी दहशतवादी बोटीने समुद्रमार्गे निघाले. त्या वेळी त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी तो कराची बंदरात हजर होता. हल्ल्याच्या वेळी कराची येथे हाफीज सईदबरोबर तो सॅटेलाईट फोनवरून दहशतवाद्यांना मार्गदर्शन करीत होता. त्याने सर्व दहशतवाद्यांना हिंदी आणि उर्दू शिकविले. म्हणजेच हल्ल्यापूर्वी अनेक दिवस तो पाकिस्तानमध्ये होता. या अबू जिंदालकडे चौकशी केली आणि त्याच्यावर ब्रेन मॅपिंग व नार्को ऍनासिस टेस्ट केल्यास 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील स्थानिक मदतनिसांना अजूनही पकडता येईल.

या हल्ल्यात स्थानिक मदतनिसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले होते. त्यामुळे सुद्धा स्थानिक मदतनिसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नसावा. परंतु स्थानिक मदतनिसांच्या सहभागाशिवाय इतका योजनाबद्ध हल्ला शक्य नाही, असे अनेक पोलीस अधिकारी म्हणतात. चिदंबरम यांच्या सूचनेपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने स्थानिक मदतनिसांची बरीच माहिती शोधून काढली होती. त्यानुसार फहिम अहमद अन्सारी (वय 35 वर्षे) आणि सबाहुद्दिन अहमद शब्बीर नावाच्या लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकांनी हल्ले करण्याच्या सर्व ठिकाणांचे नकाशे हल्ल्याच्या बरेच दिवस आधी पाकिस्तानमध्ये पाठवले होते. त्यासाठी फहिम अन्सारी हा डिसेंबर 2007 ते जानेवारी 2008 या काळात साहिल पावसकर या नावाने गोरेगावमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहात होता. या दोघांनी पुरवलेल्या नकाशांमुळेच दहशतवाद्यांना हव्या असलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ले करणे सोपे गेले. या दोघांनी ताज महाल हॉटेल, ट्रायड्रेंट हॉटेल इत्यादी 12 महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी केली होती. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी फहीम अन्सारीला पकडल्यानंतर एटीएसच्या ताब्यात दिले. तो मोतिलाल नगर, गोरेगाव, मुंबई येथे राहात असे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर मोठा हल्ला करण्याची लष्कर-ए-तोयबाची तयारी चालू आहे, असे अन्सारीने सांगितले. तो पकिस्तानमधील मुझफराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात 6 महिने होता. फहिम अन्सारी आणि सबाहुद्दीन सिद्दिकी शेख या दोघांना पोलिसांनी पकडलेही.परंतु पुरेशा पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांना सोडून दिले.

याबाबत प्रश्न असा निर्माण होतो की, पुरेसा पुरावा पोलिसांनी का मिळवला नाही? अथवा तो न्यायालयापुढे नीट का सादर केला नाही? लष्कर-ए-तोयबाचे सभासद असणे, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेणे, बनावट ड्रायव्हिंग लयसेन्स बाळगणे हा पुरेसा पुरावा नाही; मात्र साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी चार वर्षांपूर्वी विकलेल्या मोटरसायकलवर मालेगाव 2008 बॉंबस्फोट झाला, हे एकच कारण त्यांना 8 वर्षे जामीन नाकारण्यास पुरेसा पुरावा ठरू शकतो, हे कसे? साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या महिला असूनही त्यांच्यावर त्यांच्या इच्छेविरुद्ध चार वेळा नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टस् करण्यात आल्या; तशा टेस्ट्स वरील संशयितांवर का करण्यात आल्या नाहीत?

अमेरिकेतील 11/9 (2001) हल्ल्यानंतर आणि लंडनमधील 7/7 (2005)हल्ल्यानंतर तेथील चौकशी समित्यांनी शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि ते सरकारला आणि तेथील जनतेलाही सादर केले. आपल्या सरकारने राम प्रधान समितीवर अनेक बंधने टाकून मर्यादित स्वरूपात अहवाल तयार करायला लावले. राम प्रधान समितीने 64 पानांचा अहवाल तयार केला. सरकारने त्यावरही उचित कारवाई केली नाही.

अमेरिका आणि अन्य परदेशी लोक दहशतवादाबाबत जेवढे जागरूक आहेत, तेवढे हिंदुस्थानी लोक नाहीत, अशी खंत ऑड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क या ब्रिटिश पत्रकारांनी ‘रेडिफ’ या संस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली होती. या द्वयीने खूप संशोधन करून “The Siege: The Attack on the Taj ” नावाचे पुस्तक 2013 मध्ये लिहिले आणि ते पेंग्विन प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. दहशतवाद्यांचे दूरध्वनीवरील संभाषण, कसाबवरील खटला, शेकडो संबंधित लोकांच्या मुलाखती इत्यादी अनेक माहितीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.

मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात आयएसआयला मदत करणारी एक व्यक्ती दिल्लीत उच्च पदस्थ होती, असे ऑड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्या व्यक्तीला त्यांनी ‘हनी बी’ (मधमाशी) असे संबोधले आहे. मुंबईतील मदतनिसांना त्यांनी ‘उंदीर’ म्हटले आहे. त्या मधमाशीबद्दल ठोस पुरावा नसल्यामुळे तिचे नाव दिलेले नाही, पण काही संशय व्यक्त केले आहेत आणि एक ना एक दिवस ती व्यक्ती सापडेल, असे म्हटले आहे. हिंदुस्थान सरकारने या मधमाशीचा आणि उंदरांचा शोध घेण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल लेखकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

26/11 मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान नवाज़ शरीफ यांनी काही महिन्यांपूर्वी मान्य करून सर्वत्र मोठीच खळबळ उडवून दिली. त्यानुसार पाकिस्तानमध्ये दहशतवाद-विरोधी न्यायालयात 26/11च्या हल्ल्याबाबत खटला पुन्हा सुरू झाला आहे. अमेरिकेने हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली (ऊर्फ दाऊद गिलानी) याला 35 वर्षांची शिक्षा केली आहे. मुंबईवरील हल्ला हे हिंदुस्थानविरुद्ध एकप्रकारचे युद्धच होय. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही. आता केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारे बदलली आहेत. त्यामुळे आता भूमिगत मदतनीसांचा तपास पुन्हा सुरू झाला पाहिजे.