गतिमंदांचा ‘आधार’स्तंभ

>>अवधूत सहस्त्रबुद्धे

‘आधार’ ही प्रौढ गतिमंद व्यक्तींच्या आजीवन संगोपन करणारी सर्वात मोठी संस्था. पालकांनी एकत्र येत सरकारी योजना आणि मदत याची वाट न बघता पालकांनी पालकांसाठी चालवलेली ही संस्था. संस्थापक कै. माधव गोरे यांनी हे समाजसेवेचे स्वप्न बघितले आणि 1994 पासून ही संस्था कार्यान्वित झाली. 1988 मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीने (एका गतिमंद मुलाच्या आईने आपल्यानंतर आपल्या मुलाचे काय होईल या चिंतेने त्याचा जीव घेतला) विषण्ण झालेल्या एका संवेदनशील व्यक्तीने आपल्या वयाच्या 65व्या वर्षानंतर लावलेले हे रोपटे म्हणजे ‘आधार’ गतिमंद मुलांच्या पालकांची अवस्था आणि मनःस्थिती अचूक समजून घेऊन त्यांच्या पाल्यांच्या आजीवन संगोपनासाठी काळाच्या पुढे जाऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ‘आधार’. पालकांना एकत्र आणून व केवळ सरकारी योजना आणि मदत याची वाट न बघता पालकांनी पालकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे ‘आधार’.

संस्थापक कै. माधव गोरे यांनी हे समाजसेवेचे स्वप्न बघितले आणि 1994 पासून कार्यान्वित झालेली ही संस्था आज 320 प्रौढ गतिमंद मुलांची (237 पुरुष आणि 82 महिला) आजीवन काळजी आणि संगोपन करते आहे. सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरांच्या गतिमंदांना या संस्थेत प्रवेश उपलब्ध आहे आणि गेली 25 वर्षे एकही दिवस न थांबता ही संस्था अविरतपणे सेवाभाव करत आहे. 10 मुलांपासून 320 मुलांपर्यंत आणि एका ठिकाणच्या 2 वसतिगृहापासून 2 वेगळय़ा ठिकाणी (बदलापूर 220 आणि नाशिक 100) वसलेल्या 20 विशिष्ट इमारतींपर्यंत झालेली ‘आधार’ची वाढ आणि प्रगती ही थक्क करणारी आहे. 7 वेगळय़ा धर्माची, 16 वेगळय़ा मातृभाषा असणाऱया 18 विविध राज्यांमधून आलेली ही प्रौढ गतिमंद मुले आज ‘आधार’च्या छायेत त्यांच्या स्वतःच्या एका वेगळय़ा विश्वात रमली आहेत. फक्त ‘काळजी’ न करता ‘आधार’ने त्यांना एक अर्थपूर्ण आणि सन्मानित आयुष्य जगायची दिशा दिली आहे.

कै. माधवरावांच्या पश्चात इतर विश्वस्तांच्या आग्रहाखातर कोणत्याही ‘वारसा’ हक्काने न प्रभावित होता आणि आपल्या वडिलांची संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारी ओळखून विश्वास गोरे हे सध्या या संस्थेचा कार्यभार अत्यंत यशस्वीपणे सांभाळत आहेत. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या आणि अनेक वर्षे व्यावसायिक अनुभव असलेल्या विश्वास यांच्या कारकीर्दीत संस्थेची भरभराट आणि विस्तार हा कुशल संयोजित प्रकारे होताना दिसतो. ‘आधार’ला गेल्या दहा वर्षांत तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे आणि इतर अनेक संस्थांमार्फत गौरव झाला आहे. हिंदुस्थानातील सर्वोत्कृष्ट पालक संघटना आणि दिव्यांगांसाठी समग्र आणि व्यापक सेवा पुरवणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान हा ‘आधार’च्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.

‘आधार’ने आजपर्यंत सुमारे 500 कुटुंबीयांना सर्वतोपरी दिलासा आणि निश्चिंत भविष्य दिले आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील तीनशेहून अधिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. कुठलीही सरकारी मदत अथवा अनुदान न मिळवता संपूर्णपणे पालकांच्या योगदानावर आणि समाजाने केलेल्या देणग्यांवर चालणारी ही संस्था बहुधा हिंदुस्थानातील अशा प्रकाराची सर्वात मोठी व एकमेव संस्था आहे, जी गरजू पालकांना आर्थिक अनुदानसुद्धा उपलब्ध करते.

आजवरच्या 25 वर्षांच्या अनुभवातून आणि त्याबरोबर आलेल्या कौशल्यातून ‘आधार’ संस्था आपल्या पुढील वाटचालीत इतर अनेक पालक संघटना आणि संस्थांना मदत करू इच्छिते आणि त्याचबरोबर या विशेष अपंगत्वाबद्दल अधिकाधिक सामाजिक जागृती व्हावी म्हणून प्रयत्नशील आहे. आज संस्थेतील 320 मुलांपैकी जवळपास 80 मुलांचे पालक अस्तित्वात नाहीत आणि तरीही त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींच्या सहकार्याने ही संस्था त्यांची अखंड काळजी घेत आहे. यातून हे स्पष्ट होते की, ‘माझ्या नंतर काय?’ या ‘आधार’च्या स्थापनेमागच्या उद्दिष्टाचे सर्वार्थाने प्रतीक असणारी अशी ही संस्था आहे.

गतिमंदत्व या एकमेवाद्वितीय दिव्यांगाबद्दल लिहिलेली ही लेखांची मालिका वाचकांना आवडली असेल आणि त्यामधून मिळालेली माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा करतो. यासोबतच काही संस्थांचा परिचयही या माध्यमातून देत आहे. महाराष्ट्रात प्रौढ गतिमंद व्यक्तींसाठी अनेक निवासी संकुल योजना सामाजिक संस्थांद्वारे चालविल्या जातात. अशाच काही संस्थांची माहिती घेऊ.

निर्धार प्रतिष्ठान, विरार
गतिमंद मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन 1990 मध्ये निर्धार प्रतिष्ठानची स्थापना केली. सुरेश नाईक हे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहेत.
www.nirdharprati.org 91387625555

नवक्षितिज, पुणे
डॉ. नीलिमा देसाई यांच्या पुढाकाराने 2003 मध्ये ‘नवक्षितिज’ची स्थापना झाली
www.navkshitij.org
9850092195/642

प्रबोधिनी संस्था, नाशिक
1977 मध्ये ज्येष्ठ समाजसेविका रजनी लिमये यांनी या संस्थेची स्थापना केली. गतिमंद मुलांसाठी विशेष शाळा व संकुल इथे उभे करण्यात आले आहे.
www.prabodhinitrustnsk.org
91-253-2580249

बेरू गतिमंद प्रतिष्ठान, बदलापूर
बेरू यांनी 1989 मध्ये ‘बेरू गतिमंद प्रतिष्ठान’ची स्थापना केली व 1995 मध्ये राहटोली, बदलापूर येथे निवासी संकुल चालू केले.
www.berumatimandpratishthan.com
9822558641

संगोपिता संस्था, बदलापूर
2003 मध्ये सुगवेकर दांपत्याने चालू केलेली ही संस्था आज 40 प्रौढ गतिमंद व्यक्तींसाठी निवासी संकुल चालविते.

Home


91-251- 291 0585

सावली गतिमंद संस्था,पुणे
वसंत आणि प्रभा ठकार या दांपत्याने या कार्यासाठी प्रेरित होऊन ‘सावली’ संस्थेची स्थापना 1992 मध्ये केली.
www.savalimrcp.org
91-20-25282379

अमेय पालक संघटना (घरकुल उपक्रम), खोणी, डोंबिवली –
1991 मध्ये गतिमंद व्यक्तींच्या काही पालकांनी एकत्र येऊन ‘अमेय पालक संघटना’ स्थापन केली. [email protected]
www.ameyapalaksanghatana.org

घरकुल परिवार संस्था, नाशिक
विद्याताई फडके यांनी 2006 मध्ये सुरू केलेली फक्त गतिमंद महिला व मुलींच्या संगोपनासाठी ‘घरकुल’ची स्थापना केली. हे महिलांसाठी असलेले निवासी संकुल आहे.
www.gharkulparivar.com
9860552324/91-253-2029382

[email protected]