पाणीदार आमीर

>> अरुण निगवेकर

महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण करायला लावून पाणी स्वावलंबी अर्थात पाणीदार बनवायचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘भगीरथ’ची प्रयत्न चालू आहेत. पानी फाऊंडेशनची महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना संजीवनी देण्याची मोहीम मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने हातात घेतली आहे.

बॉक्सऑफिसपेक्षाही अंमळ अधिक चिंता ‘तो’ सध्या पानी फांऊडेशनची करतोय. वॉटरकप स्पर्धेत गावंच्या गावं हिरिरीने सहभागी होतात तेव्हा त्याचा आनंद सेव्हेन्टी एमएमपेक्षा मोठ्ठा असतो. बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रिटी सामाजिक भान असणाऱ्या कामात सहभागी होतात. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी पोलीओमुक्त देशासाठी ‘एक बूंद जिंदगी की’ अभियान यशस्वीपणे चालविले. आपल्या देशाच्या सैनिकांसाठी अक्षयकुमार काम करतोय. ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खान हासुद्धा सध्या पाण्यासाठी घाम गाळतोय. गावागावात जाऊन प्रसंगी कष्टाचे काम करत गावकऱ्यांचा हुरूप वाढवतोय.

पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना संजीवनी देण्याची मोहीम आमीर आणि किरण राव या दांपत्याने २०१६ पासून हाती घेतलीय. गावातील लोकांनी स्वतः श्रमदानातून आपले गाव ‘पाणीदार’ करावे अशी मूळ कल्पना असलेली स्पर्धा ‘वॉटर कप’ यंदा तिसऱ्या वर्षी होत आहे. सामाजिक स्पर्धामध्ये सेलिब्रिटी म्हणजे फक्त फित कापणे, इव्हेंटला उपस्थिती या समजाला आमीर पूर्ण अपवाद आहे. १ मे रोजी होणाऱया श्रमदानाचे आवाहन करण्यासाठी पुण्यात नुकताच आलेला आमीर माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटला. तेव्हा ‘पाणीदार’ गाव कसं होणार याची आमीरने खडानखडा माहिती सांगितली. गावागावात भेटी देताना घडलेले किस्सेही तो सांगत होता.

महाराष्ट्रात २०१६ साली दुष्काळ पडला होता. ४३ हजार ६०० गावांपैकी सुमारे २९ हजार गावे सरकारकडून दुष्काळग्रस्त जाहीर केली गेली. त्याचवर्षी आमीरच्या पाणी फाऊंडेशनने काम सुरु केलं. आमीरचा बालमित्र सत्यजित भटकळ यांनीही या कामात स्वतःला झोकून दिले. पानी फाऊंडेशनचा सीईओ सत्यजित अत्यंत शांतपणे सर्व माहिती देत असतो.

‘सत्यमेव जयते’ची सिरीज संपल्यानंतर ‘आता पुढे काय?’ या प्रश्नातून पानी फाऊंडेशन अवतरली. महाराष्ट्रातील दुष्काळी गावांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण करायला लावून पाणी स्वावलंबी अर्थात पाणीदार बनवायचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘भगीरथ’ प्रयत्न चालू आहेत. पहिल्या दोन वर्षांत सुमारे १५०० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. यंदा तिसऱया वर्षात महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांमधील ७५ तालुक्यांतील चार हजारहून अधिक गावे सहभागी झालेली आहेत. ८ एप्रिल ते २२ मे या काळात होणाऱया या स्पर्धेत तीन अव्वल गावांना ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपये अशी रक्कम दिली जाते. इतके मोठे बक्षिस कशासाठी? या मुद्दय़ावर आमीर मिष्किलीने सांगतो की, कुठल्याही कामात थोडासा खेळ असेल तर त्याची मजा येते. बक्षिसामुळे चढाओढदेखील लागते.

एखाद्या गोष्टीत गेम असेल आणि ‘डेमो’ देऊन समजावले तर ती मनात रुजते, असं आमीर म्हणाला तेव्हा त्याच्या थ्री इडियट्समधील ‘ ये डेमो बहुत अच्छा देते है’ हय़ा करिनाच्या संवादाची आठवण करून देताच आमीर दिलखुलास हसला. पाण्याच महत्त्व पटवून देण्यासाठी आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात एक खेळ असतो. प्रत्येक घरातील आजोबा, मुलगा आणि नातू अशी टीम बनविली जाते. एका मोठ्या टबमध्ये पाणी भरलेले असते. मोठ्या ‘स्ट्रॉ’ने तोंडाने ओढून पाणी टबमधून दुसऱ्या एका भांड्यात जमवायचे असा हा खेळ असतो. सर्वात आधी आजोबा मग मुलगा, नंतर नातू अशी संधी टिमला दिली जाते. शिट्टी वाजताच आजोबा पाणी ओढतात. मग मुलगा पाणी ओढतो. जेव्हा नातवाची ‘टर्न’ येते तेव्हा तो तक्रार करतो की, ‘अरे माझ्यासाठी पाणी शिल्लक ठेवलेलंच नाही. नातवाची ती तक्रार खेळापुरती असली तरी सगळेच त्याक्षणी अंतर्मुख होतात. आपल्या आधीच्या पिढ्यांनी इतक पाणी जमीनीतून ओढलय की पुढच्या पिढीला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हे वास्तव त्या खेळातून मनात खोलवर परिणाम करतं.

पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी होणाऱया गावातील पाचजणांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारणेचे शास्त्रीय प्रशिक्षण देते. जमीनीत पाणी कसे टिकते याचेही डेमो दिले जातात. या पाचजणांनी गावात जाऊन इतरांना प्रशिक्षण द्यायचे. संपूर्ण गावाने श्रमदान करून गाव ‘पाणीदार’ बनवायचे. जर गावकऱयांना मदत म्हणून कुणी अत्याधुनिक यंत्रसामुग्री दिली तरीही चालते. फाऊंडेशनने निश्चित करून दिलेले काम प्रत्यक्ष जमीनीवर झालेले पाहिजे.

सलग नेटाने ४५ दिवस काम केले तर गाव नक्कीच ‘पाणीदार’ होते. यावर्षी केलेल्या कामाचा खरा निकाल पुढच्या वर्षीच्या मार्च-एप्रिल महिन्यात दिसतो.

परसालीचे थ्री इडियट
वॉटर कप स्पर्धेतील परसाली या गावाचा गमतीदार किस्सा आमीरने सांगितला. ‘मी जरी या संकल्पनेचा प्रसार करीत असलो तरी काही गावचे गावकरी वेगळेच असतात. परसाली गावात तीन जणच या योजनेत काम करत होते. बाकी अख्खं गाव लांबून बघत बसायचे. एकही जण श्रमदानासाठी येत नव्हता. त्या तिघांनीही हट्ट सोडला नाही. असं करत १५ दिवस झाले तरी ते तिघेच श्रमदान करीत होते. आमच्या टिमला हे कळल्यानंतर मी तिथे (परसालीला) गेलो. जिथे काम चालू होतं तिथे विष्णू भोसले या गावकऱयाची भेट घेतली. आमीर आलाय म्हटल्यावर अख्ख गाव जमा झालं. मीसुद्धा श्रमदानाला सुरुवात केली. तरीही एकही गावकरी पुढे येईना. शेवटी मी गावकऱयांजवळ जाऊन आवाहन केले. तेव्हा कुठे दहा-बारा गावकरी पुढे आले. आमीरकडून हा किस्सा ऐकताना वेगळाच अनुभव येत होता.

एकदा जंगलात आग लागली तेव्हा सगळे पशू प्राणी लांब पळून एका बाजूला उभे राहून आगीकडे पहात राहिले. फक्त एक चिमणी आपल्या चोचेतून थेंब थेंब पाणी घेऊन त्या आगीवर टाकत होती. तेव्हा एक प्राणी चिमणीला म्हणाला, एवढय़ा मोठ्या आगीला तुझ्या थेंबभर पाण्याने काय फरक पडणार आहे. तेव्हा चिमणी उत्तरादाखल म्हणाली, फरक पडणार नाही हे मलासुद्धा ठाऊक आहे, पण या जंगलाचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा आग लांबून बघणाऱयांच्या यादीत माझे नांव नसेल तर आग विझविण्यासाठी प्रयत्न करणाऱयांच्या यादीत माझे नाव असेल! तात्या भोसलेंची ही प्रेरणादायी गोष्ट त्या थ्री इडियट्सची शक्ती होती.

गावकरी आपल्या गावासाठी श्रमदान करीत असले तरी शहरी भागातील माणसाची गावाशी बांधिलकी जोडण्यासाङ्गी पाणी फांऊडेशनने ‘जलमित्र’ ही संकल्पना आणलेली आहे. शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी ‘पाणी’च्या वेबसाईटवर आपले नाव नोंदवून आपण जवळच्या कुठल्या तालुक्यात जाऊन श्रमदान करू शकतो ते नोंदवायचे आहे. महात्मा फुले यांच्या जन्मगावी जाऊन फेसबुक लाईव्ह करून आमीरने ‘जलमित्र’ होण्यासाठी आवाहन केले होते. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोक जलमित्र बनले असुन हा आकडा अडीच लाखापर्यंत जाईल अशी अपेक्षा सत्यजित यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रदिनी म्हणजेच येत्या १ मे रोजी जलमित्रांच्या सहभागाने महाश्रमदान केले जाणार आहे. अर्थात आमीरसुद्धा त्यादिवशी श्रमदान करणार आहे.

गावे पाणीदार करण्याच्या या मोहिमेबद्दल आमीर खान भरभरून सांगत असतो. सत्यजित भटकळ यांनाही त्यावर बोलायला लावतो. आपलं सगळ ‘स्टारडम’ विसरून आमीर महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा पाणीदार करण्याच्या मोहिमेवर सध्या आहे. आमीरच्या सिनेमांसारखी ही मोहिम ‘हिट’ ठरलेली आहे.
[email protected]