ठसा : अभिराम भडकमकर

1

>>प्रशांत गौतम<<

संगीत नाटक अकादमीच्या सन्माननीय पुरस्काराचे मानकरी ठरलेले अभिराम भडकमकर यांचे मराठी, हिंदी लेखन, चित्रपटांच्या पटकथा, चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कसदार भूमिकेतील अभिनय या क्षेत्रांत लक्षणीय योगदान समजले जाते. नाटककार अशी ओळख असलेल्या भडकमकरांचे नाटय़ लेखन हिंदी, कानडी आणि गुजराती भाषांतही अनुवादित झाले. आलटून पालटून ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान, पाहुणा, प्रेमपत्र याच दिवशी याचवेळी, सुखाशी भांडतो आम्ही, स्थळ स्नेह मंदिर, हसत खेळत या मराठी नाटकांचे आणि कॉम्रेड का कोट, लाडी नजरीया, सवाल अपना अपना या हिंदी नाटकांचे त्यांचे लेखन खूप गाजले. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट आणि बालगंधर्व या चित्रपटांची पटकथा ही अभिराम यांची होती, तर आम्ही असू लाडके या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. विशेष म्हणजे या चित्रपटाचा अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मान झाला. देवकी, पछाडलेला यासारख्या अनेक चित्रपटांत त्याचप्रमाणे नाटक आणि मालिकांमधून भूमिका करून त्यांनी आपल्या अभिनयाची छापही सोडली. वाणिज्य शाखेचे एक पदवीधारक मराठी, हिंदी नाटकांचे कसदार लेखन करतात. नाटक, मालिका, चित्रपटांसारख्या तिन्ही प्रभावी माध्यमांतून भूमिका साकार करतात आणि बहुआयामी आपल्या प्रवासात अनेक चांगल्या बाबी आत्मसात करतात. अनेक कथा, कादंबऱया त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांची ही बहुपदरी वाटचाल अनेकांसाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार, यात शंकाच नाही. संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याने त्यांच्या समृद्ध आणि संपन्न वाटचालीत महत्त्वाची भर पडली आहे.