व्रतस्थाला मिळालेली प्रेमाची पावती

2

ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी तसेच मालिकांत आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अविस्मरणीय करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर. गेली ६० दशके रंगभूमीची अविरत सेवा करणारे मा. सावरकर यंदा धाराशीव (उस्मानाबाद) येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवत आहेत. एक नाट्यकर्मी म्हणून घडत गेलेल्या वाटचालीकडे पाहतानाच अध्यक्षपदाची भूमिका मांडणारं त्यांचं हे मनोगत.

रंगभूमीवरील बॅकस्टेज आर्टिस्टपासून नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास माझ्यासाठीही तितकाच थक्क करणारा आहे. याचं एकमेव कारण म्हणजे या क्षेत्रावर असलेलं नितांत प्रेम. या क्षेत्राने मला दिलेली अमूल्य देणं म्हणजे रसिकांचं, सहकर्मींचं प्रेम आणि आदर. माझी अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणं हे त्याच प्रेमाचं एक प्रतीक आहे. माझ्यासारख्या व्रतस्थाला दिलेला सन्मान त्यांच्या प्रेमाची पावतीच आहे. कोणताही गुंता न होता बिनविरोध निवड व्हावी ही माझी इच्छा अशाप्रकारे पूर्ण झाल्याचा निश्चितच आनंद आहे. रंगभूमीची सेवा करायची या एकाच प्रेरणेने झपाटले असल्याने आतापर्यंतचा प्रवास सोपा झाला. या प्रवासात नाट्यक्षेत्रातील अनेक स्थित्यंतरं पाहिली. नाटकाच्या लेखनापासून सादरीकरणापर्यंत सर्वच बाबतीत कमालीचा बदल घडला आहे. मात्र कोणत्याही पिढीतला नाट्यकर्मी असो, त्याची या कलेतली आसक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही हेच या क्षेत्राचं यश आहे. रंगभूमीच्या ओढीने झपाटलेली आजची पिढी प्रयोगशीलता राखत ही कला जपेल आणि सर्व स्तरांपर्यंत पोहोचवेल यात मला अजिबात शंका वाटत नाही.

गिरगावातील कला-संस्कृतीने भारलेल्या वातावरणामुळे कलेचे संस्कार माझ्यावर आपसूकच झाले, मात्र आता वातावरण बदलत आहे. त्यामुळे हे कलासंस्कार जाणीवपूर्वक होणे गरजेचे आहे. रंगभूमीचा मान कलाकार राखतच असतात. प्रेक्षकांनीही या कलेला अशीच दाद देणं गरजेचं आहे. प्रेक्षक म्हणून दर्जेदार, अभिरुचीपूर्ण नाटकांना पसंती दिली तर तशा कलाकृती आपसूकच तयार होतील. प्रेक्षक हे आमच्यासाठी मायबाप असतात. म्हणूनच आम्हा कलाकारांवर प्रेम करण्याचा आणि रागावण्याचा प्रथम हक्क त्यांचाच असतो. या अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे जे आहे ते स्वीकारण्याऐवजी प्रयोगशीलतेला दाद देण्याचा आणि अभिजात कलाकृतींची मागणी करण्याचा प्रयत्न करा. मागच्या काही काळापासून थिएटरच्या दुरवस्थेबाबत अनेकदा प्रश्नचिन्हं उमटवली गेली आहेत. कोणतंही थिएटर हे त्या शहराचं, ठिकाणाचं सांस्कृतिक वैभव असतं. आपलं सांस्कृतिक वैभव जपताना प्रेक्षकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो.

नाट्यव्यवसायाचं गणित हे आजपर्यंत कोणालाही न उमगलेलं कोडं आहे. कारण या रंगमंचाची ओढ ही पैशाला नेहमीच दुय्यम मानत आली आहे. प्रेम आणि विश्वास यांनी बांधल्या गेलेल्या या क्षेत्रात म्हणून लेखी कराराला अजूनही तितकंसं महत्त्व नाही हे विशेष. या रंगमंचाला केलेलं अभिवादन हे नेहमीच कलेच्या श्रेष्ठत्वाकडे झुकलं आहे. त्यामुळे आजवर तरी नाट्यकलाकाराची श्रीमंती ही त्याच्या अभिनयातच जोखली जात आहे. मात्र तरीही कधी कधी खंत वाटते ती स्पर्धा, चढाओढ आणि विक्रम प्रस्थापित करण्याच्या अट्टहासाची. दिवसाला तीन प्रयोग, चार प्रयोग, अविरत काम, सततचे दौरे हे समीकरण कसोशीने पाळणाऱया कलाकारांची काळजी वाटते. अभिनयाची ओढ तुम्हाला हे करायला लावत असेलही पण मर्यादांचा अलार्म वेळीच ओळखायला हवा. आपलं अस्तित्व, आपलं जगणं हे या कलेच्या कोशात बांधलं आहे. तिला असं पणाला लावू नये आणि महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत होण्यासाठी कलाकारांनी कला राबवू नये इतकंच वाटतं. अखिल भारतीय नाटय़संमेलन आता काही वर्षांतच शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना या कलाकारांची, भावी पिढीतील कलाकारांची जबाबदारी आता अजूनच वाढत आहे. त्यामुळे चुकीचे पायंडे निर्माण होऊ नयेत असं वाटतं. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना निर्मितीचा दर्जा, प्रयोगशीलता, सातत्य, नाटय़-कलाविषयक जाणिवा या सर्वच बाबतीत आपली जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हे नाटय़संमेलन धाराशीवसारख्या भागात होत आहे. अशा ठिकाणी नाट्यसंमेलन आयोजित करताना या ग्रामीण स्तरातील नाट्यकर्मींना, लोककलांना, संस्कृतीला मुख्य प्रवाहात आणता यावं हाच हेतू असतो. यानिमित्ताने ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ मिळते. त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने याबाबत ठोस योजना होणं गरजेचं आहे. नाट्यक्षेत्राला मर्यादित वर्तुळाबाहेर काढत समाजातील सर्व स्तरांत पोहचवण्याचं काम ही संमेलनं करतात. मात्र यासाठी खरा पाठिंबा हवा असतो तो नाट्यकर्मी, नाटककार यांचा. या संमेलनातही ही सर्व रंगकर्मी मंडळी उपस्थित राहून त्यांचा विक्रमी सहभाग नोंदवतील अशी अध्यक्ष म्हणून माझी अपेक्षा आहे.

संमेलनाच्या अनुषंगाने आणखी काही गोष्टीही विचाराधीन आहेत त्या म्हणजे या संमेलनाला केवळ उत्सवी स्वरूप असू नये याचा. अर्थात हे एकहाती काम नसल्याने यात सर्वंकष सहभाग व कृती अपेक्षित आहे. नाट्यचळवळ, नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट, वृद्ध कलाकारांचे निवृत्ती वेतन अशा अनेक प्रश्नांवर नेहमीप्रमाणे चर्चा होणं अपेक्षित आहेच, मात्र या प्रश्नांची ठाशीव उत्तरं मिळतील का याचा प्रयत्नही यानिमित्ताने घेतला जाईल. अर्थात या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे. ही गरज आमच्याबरोबरच शासनानेही ओळखायला हवी इतकीच अपेक्षा आहे.

नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, त्याचा कालावधी हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असला तरी हे अध्यक्षपद मिळणं हीच मोठी सन्मानाची बाब आहे. म्हणूनच अध्यक्षपदाचा कालावधी माझ्यासाठी महत्त्वाचा नसून त्या मिळालेल्या कालावधीत कसे आणि किती काम करता येईल हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. इतक्या कमी कालावधीतही ठोस काहीतरी करता येते का याकडे माझाच कल आहे. नाट्यकलावंतांनी दाखवलेल्या या विश्वासास पात्र ठरण्याचा मी प्रयत्न करेन.

नाटकात काम करण्याचे माझे ध्येय होते. सतत काम करण्याची माझी विचारसरणी आहे. त्यामुळे कामात खंड पडलेला नाही. अन्य प्रत्येक क्षेत्राप्रमाणे नाट्यसृष्टीलाही बदलाला सामोरे जावे लागत आहे. या बदलांना सामोरी जाणारी आजची पिढी अतिशय हुशार, प्रयोगशील व मेहनती आहे. या रंगभूमीचा जिवंतपणा या कलाकारांच्या आविष्कारामुळे कायम राहील. त्यामुळेच नाटकाला ऊर्जितावस्था यायला हवी असे काही मला वाटत नाही. ही रंगभूमी तिचा आब, तिचं अस्तित्व जपत पुढची अगणित वर्षे रसिकांवर कायम अधिराज्य गाजवत राहील यात शंका नाही.

(शब्दांकन – शुभांगी बागडे)