‘अकोल्या’ची पैठणी उद्योगिनी

2

>> अश्विनी पारकर

मोठे उद्योगधंदे करण्याची स्वप्न पाहून ते पूर्ण करणाऱया गृहिणींची उदाहरणे आपल्याला क्वचितच पहायला मिळतात. या गृहिणींप्रमाणेच अकोल्यातील पैठणी व्यावसायिका माधुरी गिरी या एक आहेत. जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास.

गृहिणींनी फक्त घर सांभाळायचं या संकल्पनेला छेद देणाऱया अनेक महिला आहेत. बरेचदा त्याही नोकरी किंवा एखादा छोटासा व्यवसाय याच चौकटीत अडकतात. मोठे उद्योगधंदे करण्याची स्वप्न पाहून ते पूर्ण करणाऱया गृहिणींची उदाहरणे आपल्याला क्वचितच पहायला मिळतात. या गृहिणींप्रमाणेच अकोल्यातील पैठणी व्यावसायिका माधुरी गिरी या एक आहेत. त्यांनी केवळ व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्नच पाहिले नाही तर त्यातून कारखान्याची निर्मिती केली. येवल्याची पैठणी त्यांनी अकोल्यात पोहोचवली. त्यांच्या उद्योगाच्या स्वप्नामुळे पैठणीचा अकोल्यापर्यंत झालेला प्रवास त्यांच्याच शब्दांत…

दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे (डिक्कीचे) ‘पद्मश्री’ मिलिंद कांबळी यांनी माझ्या कारखान्याचे उद्घाटन केले. त्यावेळी माझ्या कारखान्यात झालेली पहिली पैठणी माझ्याकडे आहे. माझ्यासाठी ती पैठणी अत्यंत खास आहे, कारण माझ्या कारखान्यात माझ्या कष्टाने तयार झालेली ही पहिली पैठणी आहे. तशी पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्राrच्या मनाचा हळवा कोपरा असते. आपल्या कपाटात एकतरी पैठणी असावी असं प्रत्येक स्त्राrला वाटते. माझ्या पैठणीच्या व्यवसायाची सुरुवात ही अशाच विचारातून झाली. येवल्यात जर पैठणी तयार होऊ शकते तर अकोल्यातही होऊ शकतेच असा विश्वास मला वाटायचा. खरंतर माझ्या व्यवसायाची सुरुवात कारखान्यातून पैठणी तयार होण्याच्या आधीपासूनच झालेली. माझा महिलांच्या वस्त्रांचा लहान व्यवसाय सुरू असताना त्या सोबतीने मी पैठणीचा रिटेल व्यवसाय सुरू होता. त्यावेळी मी येवल्याची पैठणी विकायचे, पण त्याचे स्वरूप इतके मोठे नव्हते. सेंट्रल बँकेच्या स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमात मी दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यात मला चौकटी बाहेर कसा विचार करायचा, आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी काय करायचे अशा अनेक गोष्टी समजल्या. त्यावेळी सर्वांसमोर मी अकोल्यात पैठणी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याचे माझे स्वप्न आहे, असे मी सांगितले. माझे हे शब्द ऐकून तेथील डिस्ट्रीक्ट मॅनेजर तुकाराम गायकवाड यांनी मला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी मला याबाबत माहिती मिळवायला सांगितली, पण जेव्हा मी माहिती मिळवण्यासाठी येवल्यात गेले तेव्हा याबद्दल अधिक माहिती देण्यास तेथील कारागीर फार उत्सुक नव्हते. कारण पैठणी ही येवल्याची शान आहे आणि ती तयार करण्याची कला फक्त येवल्यातील कारागिरांपुरतीच सीमित राहावी असा काहीसा दृष्टिकोन मला जाणवला. तरीही मी ती माहिती मिळवलीच आणि अकोल्यात परतले. तुकाराम गायकवाड यांना मी सांगितले की, पैठणी तयार करणं हे सोपे काम नाही. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पाठिंबा असण्याची गरज आहे आणि तो माझ्याकडे नव्हता, पण माझ्या जिद्दीला चांगल्या वेळेचीही साथ होती. त्यावेळी 15 ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडियाची घोषणा केली होती. डिक्कीच्या सहकार्याने स्टार्टअप इंडिया या उपक्रमांतर्गत माझ्या व्यवसायातील आर्थिक अडथळा दूर झाला, पण तेवढय़ावरच अडचणी थांबणार नव्हत्या. एमआयडीसीमध्ये मला जागा मिळू नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न झाले, पण यातूनही मार्ग निघाला आणि माझ्या व्यवसायासाठी मला जागा मिळाली. हा उद्योग उभा करण्याचा काळ जवळजवळ 18 महिन्यांचा होता आणि त्यात अनेक चढउतार येऊन गेले.

या चढउतारात मला पाठिंबा मिळाला तो माझ्या पतींचा. असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी स्त्राrमागे एका पुरुषाचा हात असतो, पण माझ्या यशामध्ये एका कर्तुत्ववान पुरुषाचा हात आहे असं मी म्हणेन. या व्यवसायात भक्कमपणे उभे राहण्यासाठी त्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केले आणि त्यात सासरच्या मंडळींचाही वाटा होता. मला त्यांनी या व्यवसायानिमित्त प्रवास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच मी माल घेण्यासाठी तसेच इतर कामांसाठी ठिकठिकाणी जाऊ शकत होते. मी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले आहे. कष्टाच्या जीवनाची मला पूर्णपणे जाणीव असल्याने माझी जिद्दही या सर्व यशाच्या वाटचालीत महत्त्वाची होती.

आज माझी ‘अकोल्याची पैठणी’ अकोल्याच्या अनेक दुकानांमध्ये रिटेल पैठणीचा व्यवसाय करणाऱया महिला यांच्यामार्फत घरांमध्ये पोहोचते आहे. पैठणी घेण्यासाठी आता अकोल्यातील महिलांना येवल्याला जाण्याची गरज नाही. ती येथे अकोल्यातच तयार होते. त्यात सेमी पैठणीपासून किमती पैठणींचाही समावेश होतो. येथील महिलांनाही रोजगार मिळवून देण्याचं काम या उद्योगाच्या निमित्ताने होते आहे. माझ्या कारखान्यात सर्व महिला कामगार आहेत. महिलांनी उद्योगक्षेत्रात निश्चितच आपली ओळख निर्माण करावी असे मला वाटते. ‘महिला उद्योगिनी’ म्हणून वावरताना मला मिळणारा सन्मान अशापद्धतीने विचार करण्याची मला प्रेरणा देतो.

– parkar.ashwini[email protected]