अमिताभ महानायकाची 50 वर्षे

अमिताभ बच्चन… महानायक, बिग बी. अनेक विशेषणं घेऊन त्यांची बहुरंगी वाटचाल दमदारपणे सुरू आहे. यंदा त्यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने…

अमिताभ… सुसंस्कृत… शालीन… वक्तशीर… हृदयस्पर्शी… भारदस्त… या साऱया विशेषणांना खरे पाहता ‘अमिताभ’ या चार अक्षरांमुळे एक वेगळाच रुबाब प्राप्त होतो. गेली 50 वर्षे तो ही सारी विशेषणे दागिन्यांगत मिरवत चित्रपटसृष्टीत वावरतोय. ‘अँग्री यंग मॅन’ या सुरुवातीच्या प्रतिमेनंतर तब्बल 4 दशके तो एकमेव बिरूद मिरवतोय… महानायक.

अनभिषिक्तपणे तो या महानायकाच्या सिंहासनावर विराजमान झालाय… अमर्याद… अनंत काळासाठी… कारण त्या सिंहासनावर आम्ही दुसऱया कुणाची कल्पनाही करू शकत नाही. अनेक वाद-प्रवाद झेलून, पेलून अतिशय ताठ कण्याने आणि मानेने हा महानायक आपल्या वाटेने चालला आहे. रुबाबात… डौलदार… दमदार वाटचाल करीत. तसे पाहता कोणतेही क्षेत्र त्याच्यासाठी वर्ज्य नाहीच. सर्वत्र त्याचा रुबाबात संचार सुरू असतो. अभिनयाव्यतिरिक्त निवेदन, लेखन, गायन, काव्य या साऱ्या क्षेत्रांत अमिताभ ही चारअक्षरी मोहोर उमटली की त्या कलाकृतीला एक वेगळीच झळाळी चढते… आणि अमिताभ तेजाने ते क्षेत्र झळाळून उठते. या वर्षी अमिताभच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘सात हिंदुस्थानी’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘बदला’चा ट्रेलर… ही अमिताभची वाटचाल अक्षरशः प्रत्येकासाठी केवळ प्रेरणादायी आणि आदर्शवत… अखंड काम करीत राहणं… आपल्या कामाने, कर्तृत्वाने चिरतरुण राहणं… जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःतील संवेदनशीलता जपणं… कितीही चढउतार आले तरी नर्म विनोदबुद्धी जागरूक ठेवणं… याची अनेक उदाहरणं अमिताभ आपल्या छोटय़ा छोटय़ा कृतींतून देत असतो. एरव्ही व्यक्तिगत आयुष्यात पै न् पैचा हिशोब काटेकोर ठेवणारा हा माणूस पुलवामातील शहीदांच्या कुटुंबीयांना सढळ हस्ते प्रत्येकी पाच लाखांची मदत सहज करतो. आपला देश, आपले जवान, क्रीडापटू… क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात त्याला विलक्षण रस आणि चिकित्सा. कोणत्याही बारीकसारीक घटनेवर तो तितक्याच तरलतेने व्यक्त होतो. यासाठी तो नेहमीच समाजमाध्यमांचा वापर करतो… यातून तो जणू प्रत्येकाच्या मनातलेच बोलत असतो. त्याच्या प्रत्येक कृतीतून काही ना काही शिकण्यासारखे असतेच… पाहूया त्याचे असेच काही माहीत नसलेले किस्से…

 • चित्रपटांइतकाच किंबहुना थोडा अधिक अमिताभ जाहिरात विश्वात मनापासून रमतो… पुन्हा चष्म्याआडून डोळे मिचकावत टिप्पणी करतो, ‘मेरी रोजीरोटी है भाई! इससे ही तो मेरा घर चलता है!’
 • अमिताभच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन (बालसुलभ) या टोपणनावाने ते कविता लिहीत.
 • चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभने हे नाव वापरण्यास सुरुवात केली… आणि ते साऱया कुटुंबाचेच आडनाव ठरले.
 • अमिताभचे वडील त्याला नेहमी सांगायचे ‘मन का हो तो अच्छा। मन का ना हो तो ज्यादा अच्छा!’
 • सुरुवातीच्या काळात ऑल इंडिया रेडिओसाठी अमीन सयानी यांनी अमिताभचा आवाज नाकारला होता. पण पुढे हाच आवाज त्याची ओळख बनला.
 • अमिताभला वायुदलात जायचे होते. पण काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही.
 • ‘भुवन शोम’ या बंगाली चित्रपटाने बिग बी ला पहिली ओळख दिली. या चित्रपटात अमिताभने सूत्रधाराला आपला आवाज दिला.
 • मायस्थेनिया ग्रॅव्हीससारख्या असाध्य आजाराला त्याने आपल्या स्वच्छ आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे सहज मात दिली आहे. गेली अनेक वर्षे तो केवळ 25 टक्के यकृतावर काम करतो आहे… अव्याहतपणे…
 • ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिसमुळे अमिताभने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
 • त्याच्या उतरत्या कारकीर्दीला अतिशय भक्कम आधार मिळाला तो ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे. त्यानंतर बिग बी ची दमदार दुसरी इनिंग सुरू झाली… आणि त्याने मागे वळून कधी पाहिलेच नाही. आजतागायत…
 • ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट अमिताभला डोळ्यांसमोर ठेवून लिहिला गेला होता.
 • अमिताभने अनेक अभिनेत्रींसोबत चित्रपटांत काम केले. पण त्याच्या दृष्टीने सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान.
 • अमिताभचे नाव त्याच्या वडिलांनी ‘इन्कलाब’ असे ठेवले. पण त्याच्या आईंना ते न आवडल्याने त्यांनी आपल्या लेकाचे नाव ‘अमिताभ’ ठेवले.
 • कारकीर्दीतील अतिशय चढउतार त्याने अनुभवले. एक काळ असा होता की अमिताभच्या हाती काहीच काम नव्हते. तेव्हा ज्येष्ठ दिग्दर्शक यश चोप्रांनी फक्त आणि फक्त अमिताभसाठी ‘मोहब्बतें’ या चित्रपटाची निर्मिती केली. मानधनाविषयी अमिताभने तोंडून ब्रही काढला नव्हता.

अमिताभ बोले…

 • तुम्हारा नाम क्या है बसंती? (शोले)
 • अगर अपनी मां का दूध पिया है तो सामने आ (लावारीस)
 • डॉन को पकड़ना मुश्कील ही नहीं, नामुमकीन है (डॉन)
 • मुंछे हो तो नथुलाल जैसी, वरना ना हो (शराबी)
 • रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहेनशाह (शहेनशाह)
 • कभी कभी मेरे दिल में खयाल आता है (कभी कभी)
 • है किसी माई के लाल में हिंमत, जो मेरे सामने आए? (नमक हराम)
 • मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं (सिलसिला)
 • डोन्ट मेस विथ द आर्मी (मेजर साब)
 • भून डालो इस कंबख्त को (सूर्यवंशम)
 • उफ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श, किस काम के है तुम्हारे उसूल? (शक्ती)
 • मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता (दीवार)
 • हम जहां खडे हो जाते हैं, लाइन वहीं से शुरू होती है (कालिया)
 • प्यार ही तो वो जादू है जो उम्रभर जवान बनाए रखता है (बागबान)
 • मुझे जो सही लगता है मैं करता हूं, फिर चाहे वो भगवान के खिलाफ हो, कानून के खिलाफ हो या पुरे सिस्टीम के खिलाफ (सरकार)
 • इन्सान का इमोशन उसका मोशन के साथ जुड़ा होता है (पिकू)
 • नो मिन्स नो (पिंक)