भराडी आईचा उत्सव

>>स्वप्नील साळसकर

दरवर्षी कोकणात जल्लोशात साजरी केली जाणारी आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा. प्रत्येक कोकणी माणसाच्या श्रद्धेचा विषय. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्कंठा लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील आंगणेवाडी जत्रोत्सवाची तारीख जशी जवळ येतेय तशी भक्तांची उत्सुकताही वाढली आहे. 25 फेब्रुवारी जत्रेची तारीख ठरल्यानंतर ‘जत्रेक जावकच होया’ या तयारीत प्रत्येकजण आहे.

कोकणात मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी यात्रा अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मालवण तालुक्यापासून 15 कि.मी.वर मसुरे गाव असून त्यातील आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे. त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर (माळरानावर) असल्यामुळे राज्यातच नव्हे, तर देशभरात नवसाला पावणारी ‘भराडी आई’ म्हणून ती प्रसिद्ध झाली. यात्रेचा दिवस हा नक्की नसतो. त्याची तारीखही विशिष्ट प्रकारे ठरली जाते.

दिवाळीनंतर शेतीची कामे आटोपली की देवीचे मानकरी एका डाळीवर (बांबूपासून बनवलेली चटई) बसतात. त्यालाच ‘डाळप स्वारी’ असे म्हटले जाते. डाळप स्वारीच्या बैठकीनंतर देवीचा कौल घेतला जातो. 25 वर्षांपूर्वी ही जत्रा काही हजारांत होती. मात्र ती दरवर्षी भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून ती लाखापर्यंत पोहोचली आहे. आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. येथे पाषाण मूर्ती असून नियमित पूजाअर्चा केली जाते. दररोज नवस फेडण्यासाठी येणाऱया भाविकांची मोठी गर्दी असते.

यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौन क्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जात दांपत्याकडून तो नैवेद्य देवीला दाखविला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो.

प्रसादवाटपाची पद्धत बदलली
यात्रोत्सवात पूर्वी एकाच वेळी प्रसाद वाटप करणे शक्य होत नव्हते. यामुळे प्रसाद उडवला जात असल्याने वाया जात होता. काही जणांना तो मिळत नव्हता. शिवाय तो पायाखालीही येत होता. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसादवाटपाची सोय केली. येणाऱया भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन वर्षांपासून बदललेल्या प्रसादवाटपाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अशाच प्रकारे यात्रेची तारीख ठरवण्यापूर्वी केली जाणारी शिकारीची प्रथा बंद व्हावी अशी अपेक्षाही भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.

लोकजीवन आणि प्रथा
भराडी आईवर श्रद्धा असलेले भाविक तिच्या पायावर नतमस्तक होतात. या लोकांच्या मनातील इच्छा देवीकडे नुसते पाहूनही पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या भाविकांचे लोकजीवनही त्यामुळेच येथील प्रथांमध्ये दिसून येते. या यात्रेत ओटी भरण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा तितका महाप्रसादाचाही क्षण महत्त्वाचा. ‘गावपारधी’साठी देवाचा कौल घेतला जातो. जंगलामध्ये ‘पारध’ म्हणजेच डुकराची शिकार झाल्यानंतर मोठय़ा उत्साहात या डुकराची मिरवणूक काढली जाते. मात्र कुठलीही आई आपल्या लेकराचा बळी कशाला घेईल?

या यात्रेला महत्त्व का?
श्री भराडीदेवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्क प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी आप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशिर्वाद लाभल्यामुळे त्यांनी 22 हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली होती. ‘भरड’ भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरुपी देवी अवतरली म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. या देवीची एक आख्यायिका सांगितली जाते की, ही देवी तांदळाच्या कडय़ातून भरडावर प्रकट झाली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात.

सुरुवात कधीपासून?
भराडी देवीची जत्रा नेमकी कधी सुरू झाली याविषयी निश्चित सांगता येत नसलं तरी साधारणपणे 300 वर्षांपूर्वी येथे पूजाअर्चा सुरू झाल्याचं म्हटलं जातं. या जत्रेचा दिवस ठरवण्याची पद्धत वेगळी आहे. त्यानुसार एकदा ठरवलेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलली जात नाही. यात्रेच्या दिवशी देवीची मूर्ती अलंकारांनी सजवली जाते. पाषाणाला मुखवटा बांधून साडीचोळी नेसवली जाते. मानकऱ्यांच्या ओट्या भरल्यानंतर देवीचं दर्शन भाविकांसाठी खुलं होतं. यात्रेच्या दिवशीची पहाट भाविकांच्या गर्दीनंच उजाडते. लगतच्या गावातील भाविक अगदी भल्या पहाटे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं असतात. देवीची ओटी, खण, नारळ, सोन्या-नाण्याने भरली जाते. ‘तुलाभार’ विधीही केला जातो.

[email protected]