
>> महेश उपदेव
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आणि केंद्र तसेच राज्य सरकारनेही प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. सर्व बाजूंनी नक्षलवाद्यांची कोंडी केली तर नक्षलवाद्यांचा बीमोड करणे सहज शक्य होऊ शकते. बंदुकीच्या गोळीला त्याच पद्धतीने उत्तर देण्याची गरज असून नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिह्यांतून नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या तीन राज्यांची मदत घेऊन एकत्र नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई केली तर नक्षलवाद्यांची नाकाबंदी होऊ शकते.
संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन साजरा करीत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिह्यातील कुरखेडाजवळच्या जांभूरखेडा गावातून जाणाऱया महामार्गावर भूसुरुंग पेरून स्फोट केला. या नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 चे 15 जवान व एक खासगी वाहनचालक ठार झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नक्षलवाद्यांच्या संपूर्ण नांग्या ठेचून काढा अशी मागणी शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी केली आहे. नक्षलवाद्यांना मदत करणाऱया लोकांचा कायमचा बीमोड करण्याची वेळ आली आहे. जांभूरखेडा हल्ला हा 2009 नंतर नक्षलवाद्यांनी घडविलेला मोठा घातपात आहे. केंद्र व राज्य सरकारने एकत्र येऊन नक्षलवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
नुकत्याच विदर्भात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गावकऱ्यांनी सहभागी होऊ नये अशा धमक्या नक्षलवाद्यांनी दिल्या होत्या. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता मतदानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन 61 टक्के मतदान केले. 11 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी घातपात करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश न मिळाल्यामुळे नक्षलवाद्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यातूनच नक्षलवाद्यांनी हा घातपात घडवून आणला. 30 एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील अमर कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल 36 वाहने जाळून खाक केल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. नक्षलवाद्यांनी केलेल्या जाळपोळीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ताजी असतानाच सकाळी 11.30 च्या सुमारास जांभूरखेडा येथे शक्तिशाली स्फोट घडवून आणला. या दुर्घटनेत सी-60चे 15 जवान शहीद झाले. सी-60च्या जवानांनी नक्षलवाद्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले. त्याचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवून आणला.
22 एप्रिल 2018 रोजी सी-60 च्या जवानांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याचा विडा उचलून जहाल 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तेव्हापासून नक्षलवाद्यांना ठिकठिकाणी ठेचण्याचे काम आपले शूरवीर पोलीस जवान करीत होते. या घटनेचा बदला घेण्यासाठी महाराष्ट्रदिनी नक्षलवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला अशी चर्चा गडचिरोलीत सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या सूडाचा हा हादरा गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठा ठरला आहे. दुर्गम आदिवासी गडचिरोली जिह्यात विकासाची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. विकासकामांना नक्षलवाद्यांचा विरोध आहे. घातपाती स्फोटानंतर भ्याड नक्षलवाद्यांनी बॅनर लावून विकासकामाला विरोध असल्याचे बॅनरमध्ये नमूद केले आहे.
नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची आणि केंद्र तसेच राज्य सरकारनेही प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. सर्व बाजूंनी नक्षलवाद्यांची कोंडी केली तर नक्षलवाद्यांचा बीमोड करणे सहज शक्य होऊ शकते. काही राजकीय नेते निवडणुकीत गावकऱयांना धमकावण्याकरिता नक्षलवाद्यांची मदत घेतात अशी चर्चा आहे. सी-60 जवानांचा चमू कुरखेडा मार्गाने जाणार असल्याची माहिती नक्षलवाद्यांना कोणी दिली? अशा गद्दारांचा शोध घेऊन त्यांनाही ठेचण्याची गरज आहे. बंदुकीच्या गोळीला त्याच पद्धतीने पद्धतीने उत्तर देण्याची गरज असून नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिह्यांतून नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या तीन राज्यांची मदत घेऊन एकत्र नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई केली तर नक्षलवाद्यांची नाकाबंदी होऊ शकते. ही कारवाई करण्याकरिता राजकीय इच्छाशक्तीची गरज असून देशातील दहशतवाद संपविण्यासाठी एअर स्ट्राइक करण्याची गरज आहे. सी-60 व सीआरपीएफचे जवान नक्षलवाद्यांचा सफाया करू शकतात. याकरिता सरकारने या जवानांना अधिकार व अत्याधुनिक शस्त्रे देण्याची गरज आहे. नक्षलवाद्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे आहेत. त्यांचा मुकाबला करण्याकरिता आपल्या जवानांना सक्षम करण्याची गरज आहे.
नक्षलवादी चळवळ 1980 मध्ये सुरू झाली. आदिवासींवर अन्याय करणाऱया धनाढय़ लोकांविरुद्ध आवाज उठवून आदिवासींना नक्षलवादी संघटना मदत करीत होत्या. या चळवळीचे पाईक चारू मुजुमदार यांनी चांगल्या हेतूने ही चळवळ सुरू केली, पण आता ही संघटना निष्पाप आदिवासींच्या पोलिसांचे खबरे असल्याच्या कारणावरून हत्या करीत आहे. गेल्या 40 वर्षांत शेकडो निष्पाप आदिवासींचे नक्षलवाद्यांनी बळी घेतले आहेत. आता नक्षलवाद्यांच्या नांग्या ठेचायलाच पाहिजेत.
आतापर्यंत 240 जवान शहीद
गडचिरोलीत गेल्या 39 वर्षांत नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसक कारवायांमध्ये 240 पोलीस जवान, अधिकारी शहीद झाले आहेत. सर्वाधिक 42 जवान 2009 मध्ये शहीद झाले. या जवानांमध्ये केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलांच्या शहीद जवानांचा समावेश नाही.
वर्ष शहीद
2019 15
2010 10
2011 13
2012 14
2013 06
2014 11
2015 02
2016 03
2017 03